उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील विशेष न्यायालयाने गुरुवारी माजी खासदार धनंजय सिंह यांची १५ वर्षे जुन्या दुहेरी हत्याकांड प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आहे. खासदार-आमदार न्यायालयाचे विशेष न्यायाधीश सादिक सिद्दीकी यांनी या निकालाची सुनावणी केली आहे. पुरावे तपासल्यानंतर आणि दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर धनंजय सिंह यांना निर्दोष ठरविण्यात आले आहे. हा खटला प्रथम अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एम. पी. सिंह यांच्या न्यायालयात सुनावणीला आला आणि त्यानंतर तो विशेष खासदार-आमदार न्यायालयात पाठविण्यात आला. नेमके हे प्रकरण काय होते? कोण आहेत धनंजय सिंह? जाणून घेऊयात.

२०१० चे दुहेरी हत्याकांड प्रकरण

  • सरकारी वकील लाल बहादूर पाल यांच्यानुसार हा खटला १ एप्रिल २०१० रोजीचा आहे.
  • केरकट पोलीस ठाण्याच्या परिसरातील बेलावा घाट येथे कंत्राट वादातून संजय निषाद आणि नंदलाल निषाद यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.
  • त्या वेळी बसपाचे खासदार असलेले धनंजय सिंह, आशुतोष सिंह, पुनीत सिंग आणि इतर दोघांचे या प्रकरणात आरोपी म्हणून नाव समोर आले होते.
  • सुरुवातीला पोलिसांनी सर्व आरोपींना या प्रकरणात क्लीन चिट दिली; परंतु नंतर सीबीसीआयडीने त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले.
माजी खासदार धनंजय सिंह यांची १५ वर्षे जुन्या दुहेरी हत्याकांड प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

कोण आहेत धनंजय सिंह?

धनंजय सिंह यांचा जन्म १९७५ मध्ये कोलकातामध्ये झाला. त्यांचे कुटुंब त्यांच्या जन्मानंतर जौनपूरला स्थलांतरित झाले. पोलिसांच्या नोंदीनुसार, सिंह शाळेत असताना त्यांचा संबंध गुन्हेगारीशी आला. नुकसान पोहोचवणे आणि गुन्हेगारी धमकी देणे या आरोपाखाली त्यांच्यावर पहिला खटला दाखल करण्यात आला, असे वृत्त ‘द प्रिंट’ने दिले. मीडिया रिपोर्टसनुसार, १९९२ मध्ये हत्येच्या प्रयत्नात त्यांचे नाव समोर आले आणि त्यांनी पोलीस कोठडीत असतानाच महाविद्यालयीन परीक्षाही दिल्या. त्यावेळी ते जौनपूरच्या तिलक धारी सिंह इंटर कॉलेजमध्ये शिकत होते. उत्तर प्रदेश पोलीस महासंचालक म्हणून निवृत्त झालेले आणि आता सर्वोच्च न्यायालयात वकील असलेले सुव्रत त्रिपाठी यांनी ‘द प्रिंट’ला सांगितले की, सिंह १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला एक लहान गुन्हेगार होते. परंतु, काही वर्षांनंतर ते मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार झाले आणि त्यानंतर ते राजकारणात सामील झाले.

सिंह त्यांच्या कॉलेज काळात मंडल आयोगाविरुद्ध (सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी) आंदोलन करणारे सक्रिय विद्यार्थी होते. लखनौ विद्यापीठाचे माजी प्राध्यापक व कानपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू जे. व्ही. वैशंपायन सांगतात, “१९९० ते २००६ हा काळ विद्यार्थी राजकारणासाठी सर्वांत अशांत काळ होता. विद्यार्थी संघटनांच्या निवडणुकांमध्ये पूर्व उत्तर प्रदेशातील अनेक गुन्हेगारी घटक लखनौ विद्यापीठात येत असत. मतदानाचे प्रमाण खूप कमी असायचे. कारण- मोठ्या संख्येने विद्यार्थी, विशेषतः मुली निवडणुकांपासून दूर राहायच्या.”

सिंह यांनी निवडणूक आयोगाला सांगितले की, त्यांनी १९९५ मध्ये लखनौ विद्यापीठातून पदवी पूर्ण केली आहे; परंतु ७ मार्च १९९७ रोजी लखनौच्या प्रतिष्ठित ला मार्टिनियर कॉलेजच्या सहायक वॉर्डनच्या हत्येच्या खळबळजनक प्रकरणात त्यांचे नाव समोर आले होते. या प्रकरणाने संपूर्ण राज्याला हादरवले होते. ही हत्या उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट असताना झाली होती; पण गुन्ह्याच्या दोन आठवड्यांनंतर, बसपा प्रमुख मायावती यांची राज्यात पुन्हा सत्ता आली.

या कठीण काळात (१९९० च्या दशकात) लखनौमध्ये काम करणारे पोलीस अधिकारी सांगतात की, त्या काळात सिंह गुंडांप्रमाणे टेलिफोन केबल लाइन टाकण्याचे, भंगाराचे रेल्वे कंत्राट, नगर निगमशी संबंधित कंत्राट आणि जिल्हा पंचायतीच्या कामाचे टेंडर मिळविण्यासाठी अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करीत असत. पोलिसांच्या माहितीनुसार, एप्रिल २०१० मध्ये जौनपूरच्या केरकट भागात पीडब्ल्यूडी कंत्राटांवरील शत्रुत्वामुळे ठार झालेल्या कंत्राटदार आणि चहाच्या टपरीमालकाच्या दुहेरी हत्याकांडात सिंग यांना डिसेंबर २०११ मध्ये अटक करण्यात आली होती. सिंह आणि बसपा नेतृत्व यांच्यात मतभेद झाल्यानंतर ही अटक झाली होती. त्याच प्रकरणात न्यायालयाने सिंह यांची निर्दोष मुक्तता केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२००२ मध्ये धनंजय सिंह यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती. जौनपूर जिल्ह्यातील रारी (आता मल्हानी) मतदारसंघातून ते निवडून आले. २००७ मध्ये ते पुन्हा त्याच मतदारसंघातून जनता दल (संयुक्त) च्य तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांनी पक्ष बदलला आणि ते बसपामध्ये सामील झाले. ते २००९-२०१४ पर्यंत खासदार होते.