पालघर: पालघर जिल्हा परिषदेवर दोन वेळा निवडून आलेल्या तसेच सव्वा वर्ष जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची धुरा सांभाळणाऱ्या भारती कामडी यांना शिवसेनेच्या ठाकरे गटाने उमेदवारी जाहीर केली आहे. पालघर नगर नगरपरिषदेच्या निवडणुकीत १९९९ मध्ये अपयश आल्यानंतर खचून न जाता त्यांनी शिवसेनेतर्फे काम करण्याचे सुरू ठेवले. २०१५ मध्ये वाडा तालुक्यातील मांडा गटामधून तर २०२० मध्ये विक्रमगड तालुक्यातील तलवाडा गटामधून त्यांनी विजय संपादन केला होता. त्यानंतर शिवसेनेने त्यांना १७.०२ २०२० ते ०७.०७.२०२१ या सव्वा वर्षाच्या कार्यकाळासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली होती. यादरम्यान करोना संक्रमण झाल्याने काम करण्यावर काही प्रमाणात निर्बंध आले असले तरी लोकसंपर्क कायम ठेवला होता.

अध्यक्ष पदाच्या कार्यकाळानंतर त्या शिवसेनेतून कार्यरत असून शिवसेनेतल्या फुटी नंतर त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत राहण्याचे प्रसंत केले. भारती कामडी यांच्याकडे ठाकरे गटाचे महिला लोकसभा संघटक पद आहे. भारती कामडी या पालघर शहरात वास्तव्य करत असून त्यांचा विक्रमगड, जव्हार, वाडा परिसरात दांडगा लोकसंपर्क आहे. त्यांच्या उमेदवारीला जिल्ह्यातील काही सामाजिक संस्थेने पाठिंबा दर्शवला असून प्रमुख राजकीय पक्षातून अलीकडच्या काळात प्रथमच एका महिलेला खासदारकीची उमेदवारी देण्यात आली आहे.

हेही वाचा : आपचे खासदार संजय सिंह यांना मिळालेल्या जामिनाचे कारण काय? त्यांच्या वकिलांकडून नेमका काय युक्तिवाद करण्यात आला?

पालघर लोकसभेची जागा सन २०१९ पासून शिवसेनेकडे असून शिवसेनेत फूट झाल्यानंतर अनेक स्थानिक शिवसेना नेते मंडळींनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता. पालघर ची जागा अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव असून भारती कामडी यांच्यासह जयेंद्र दुबळा, सुधीर ओझरे, दिनेश तारवी यांची नावे चर्चेत होती. मात्र जिल्हा जिल्हा परिषदेतील अनुभव व महिला असल्याचा फायदा घेण्याच्या दृष्टीन त्यांना उमेदवारी दिली गेली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.