अमेठी व रायबरेली या जागांवर गांधी घराण्यातील कुटुंबांनी निवडणूक लढवावी, अशी शिफारस उत्तर प्रदेश काँग्रेसच्या नव्याने स्थापना झालेल्या राज्य निवडणूक समितीद्वारे करण्यात आली आहे. रविवारी लखनौ येथे झालेल्या समितीच्या पहिल्याच बैठकीत उत्तर प्रदेशातील १७ जागांसाठी संभाव्य उमेदवारांच्या नावांवर प्रदीर्ष चर्चा झाली. या चर्चेनंतर समितीने अमेठी व रायबरेली या जागांबाबची शिफारस वरिष्ठांकडे केली आहे.

उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने युती केली असून, काँग्रेस १७; तर समाजवादी पक्ष ८० पैकी ६३ जागांवर निवडणूक लढविणार आहे. त्यानुसार काँग्रेस लढवीत असलेल्या १७ जागांमध्ये रायबरेली, अमेठी, कानपूर, फतेहपूर सिक्री, बांसगाव, सहारनपूर, प्रयागराज (अलाहाबाद) महाराजगंज, वाराणसी, अमरोहा, झाशी, बुलंद शहर, गाझियाबाद, मथुरा, सीतापूर, बाराबंकी व देवरिया या जागांचा समावेश आहे.

हेही वाचा – “ही कृती म्हणजे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा भाजपाला…” काँग्रेसची कडवट टीका!

रायबरेली व अमेठी हे काँग्रेसचे बालेकिल्ले आहेत. २०१९ मध्ये रायबरेलीतून काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी या विजयी झाल्या होत्या. तर, अमेठीत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा पराभव केला होता. अशातच आता सोनिया गांधी या राजस्थानमधून राज्यसभेवर निवडून गेल्या आहेत. तर, काँग्रेस नेते राहुल गांधी हे पुन्हा वायनाडमधून निवडणूक लढविणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे अमेठी व रायबरेली या जागा रिक्त आहेत.

यासंदर्भात बोलताना उत्तर प्रदेश काँग्रेस निवडणूक समितीचे अध्यक्ष अविनाश पांडे यांनी प्रतिक्रिया दिली. “रविवारी झालेल्या बैठकीत रायबरेली व अमेठी या जागांवर सविस्तर चर्चा झाली. या दोन्ही जागा नेहमीच काँग्रेसचे बालेकिल्ले राहिले आहेत. तसेच या दोन्ही जागांचा गांधी घराण्याशी जवळचा संबंध आहे. त्यामुळे अमेठी व रायबरेलीतून केवळ गांधी घराण्यातील सदस्यांनी निवडणूक लढवावी, अशी शिफारस आम्ही काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे. महत्त्वाचे म्हणजे अमेठी व रायबरेलीतील काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्यादेखील याच भावना आहेत. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील, असे ते म्हणाले.

हेही वाचा – टीडीपीची एनडीएमध्ये घरवापसी! याचा फायदा नेमका कुणाला? टीडीपी की, भाजपा?

दरम्यान, दोन तास चाललेल्या या बैठकीत अमेठी व रायबरेलीशिवाय इतर १५ जागांसाठी संभाव्य उमेदवारांच्या नावांवरही चर्चा झाली. त्यापैकी तीन जागांसाठी वाराणसीचे प्रदेशाध्यक्ष अजय राय, सहारनपूरचे माजी आमदार इम्रान मसूद व बाराबंकीचे तनुज पुनिया यांच्या नावाची चर्चा झाल्याची माहिती आहे. त्याशिवाय उर्वरित ११ जागांसाठी कार्यकर्त्यांची मते, स्थानिक जातीय समीकरणे, जिंकण्याची शक्यता या घटकांचा विचार करीत उमेदवारांच्या नावांवर चर्चा झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काँग्रेस पक्षातील अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, झाशीच्या जागेसाठी माजी खासदार प्रदीप जैन आदित्य, फतेहपूर सिक्रीसाठी माजी खासदार राज बब्बर व महाराजगंजसाठी आमदार वीरेंद्र चौधरी या नावांची चर्चा झाली आहे.