सतरा वर्षांपूर्वी डॉ. वर्गीस कुरियन यांनी ‘गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन’ (GCMMF) चे संस्थापक-अध्यक्षपद सोडलं होतं. कुरियन यांनी पाच दशकांहून अधिक काळ संपूर्ण समर्पण आणि एकनिष्ठेनं सहकारी डेअरी क्षेत्र वाढवण्यासाठी काम केलं. आता GCMMF ची वार्षिक उलाढाल ६१ हजार कोटींच्या घरात गेली आहे. गुजरातमधील १८ जिल्ह्यातील ३४.४ लाख दूध उत्पादक शेतकरी या संघटनेशी जोडले गेले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बिगर राजकीय व्यक्तीने सुरू केलेली ही डेअरी आता राजकीय व्यक्तीच्या हाती गेली आहे. सध्याच्या घडीला महासंघाच्या बोर्डावर भारतीय जनता पार्टीचे सर्वाधिक सदस्य आहेत. डॉ. वर्गीस कुरियन हे GCMMF चे शेवटचे बिगर-राजकीय अध्यक्ष होते. कुरियन यांच्यानंतर GCMMFचे अध्यक्ष झालेले पार्थी भटोल दोन वेळा महासंघाचे अध्यक्ष राहिले. त्यांनी २०१९ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली. तर त्यांचा मुलगा वसंत भटोल याने २००९ मध्ये भाजपाच्या तिकिटावर दांता मतदार संघाची पोटनिवडणूक जिंकली. पण २०१९ च्या लोकसभा निवडणुकीआधी ते काँग्रेसमध्ये सामील झाले. गेल्या वर्षी ते पुन्हा भाजपामध्ये परतले.

भटोल यांच्यानंतर मेहसाणाच्या दूधसागर डेअरीचे तत्कालीन अध्यक्ष आणि शंकरसिंह वाघेला यांच्या सरकारमधील माजी मंत्री विपुल चौधरी यांनी GCMMF चे अध्यक्षपद भूषवले. दरम्यान, विपुल चौधरी यांची यूपीए सरकारशी जवळीकता वाढली. त्यांनी २०१३ मध्ये २२ कोटी रुपयांचा जनावरांचा चारा महाराष्ट्राला मोफत पाठवला होता. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर GCMMF ने विपुल चौधरी यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणत त्यांना पदावरून दूर केलं.

अमूल डेअरीचे अध्यक्ष आणि मध्य गुजरातमधील थसराचे सातवेळा काँग्रेस आमदार रामसिंह परमार यांची कारकीर्दही सारखीच आहे. २०१७ मध्ये, तत्कालीन विरोधी पक्षनेते शंकरसिंह वाघेला यांच्या पावलावर पाऊल ठेवून काँग्रेस सोडणाऱ्या १४ आमदारांमध्ये रामसिंह परमार यांचा समावेश होता. पक्ष सोडल्यानंतर पुढच्या वर्षी, परमार यांची एकमताने GCMMF चे अध्यक्ष म्हणून निवड झाली. तसेच अमूल डेअरीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांची पुन्हा निवड झाली. २००२ पासून ते हे पद सांभाळत होते. नुकत्याच पार पडलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत त्यांचा मुलगा योगेंद्र भाजपाच्या तिकीटावर थसरा मतदारसंघातून निवडून आला आहे.

GCMMF च्या सदस्य असलेल्या १८ डेअरी संघांपैकी अमूल डेअरी किंवा कैरा जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड ही काँग्रेसचा अध्यक्ष असलेली एकमेव डेअरी आहे. बाकी सर्व डेअरी संघ भाजपाच्या ताब्यात आहेत. परमार आणि चौधरी हे दोघेही आधी कुरियन यांचे समर्थक होते.

गुजरात विधानसभेचे विद्यमान सभापती शंकर चौधरी हे बनास डेअरीचे अध्यक्ष आहेत. तर उपसभापती जेठा भारवड पंचमहाल डेअरीचे अध्यक्ष व जिल्हा सहकारी संस्थांचे प्रमुख आहेत. दोघेही GCMMF चे बोर्ड सदस्य आहेत. अलीकडेच २४ जानेवारी रोजी विद्यमान अध्यक्ष शामल पटेल आणि उपाध्यक्ष वलमजी हुंबल यांची GCMMF वर पुन्हा निवड झाली आहे. या निवडणुकीत शामल पटेल आणि वलमजी हुंबल यांच्या फेरनिवडणुकीसाठी थेट भाजपाकडून जनादेश देण्यात आला, अशी माहिती सूत्रांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिली.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gujarat dairy world controlled by bjp once allegiance to congress rmm
First published on: 26-01-2023 at 18:59 IST