हार्दिक पटेल यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन सत्ताधारी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करून आता दीड महिन्यांचा कालावधी लोटला आहे.  पाटीदार समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल यांनी नुकताच आपला २९ वा वाढदिवस साजरा केला. पाटीदार आंदोलनातून पुढे आलेला हा तरुण सध्या भाजपामध्ये आपले पाय घट्ट रोवण्यासाठी धडपडताना दिसत आहे. 

गुजरातच्या राजकीय वर्तुळातील सर्वांच्या नजरा आता हार्दिक पटेल यांच्या भाजपामधील नव्या करकीर्दीवर खिळल्या आहेत. गुजरातमधील भाजपा नेत्यांच्या एका गटाने दावा केला आहे की हार्दिक पटेल यांना हळूहळू पक्षातून बाजूला केले जाण्याची शक्यता आहे. यावर बोलताना हार्दिक यांनी ठामपणे सांगितले की ” एवढ्या कमी कालावधीत कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोचणे योग्य नाही. आपण पक्षासाठी आपली योग्यता सिद्ध करू”.  हार्दिक पटेल यांनी २ जून रोजी भाजपाचे गुजरात अध्यक्ष सी.आर पाटील आणि माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा छोटा सैनिक म्हणून काम करेन आणि पक्षाच्या प्रगतीत खारीचा वाटा उचलेन असे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर मात्र, ते सोशल मीडियावर सक्रिय असले तरी बहुतांश पार्टी कार्यक्रमात दिसलेच नाहीत.

भाजपासोबतच्या आतापर्यंतच्या कारकीर्दीबद्दल ‘ द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना हार्दिक पटेल म्हणाले की “मी भाजपामधील माझ्या कारकिर्दीचा आनंद घेत आहे. आतापर्यंत माझ्यावर पक्षाकडून कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही. पण मी गुजरातच्या वेगवेगळ्या भागात जाऊन तेथील पक्षाच्या कार्यकर्त्यांना भेटत आहे आणि त्याचा आनंद घेत आहे. भाजपाने अद्याप त्यांच्यावर कोणतीही जबाबदारी दिली नसल्याबद्दल हार्दिक म्हणाले “मी भाजपमध्ये सामील होऊन नुकताच एक महिना झाला आहे. एक वर्ष कोणतेही पद न घेता काँग्रेसमध्ये काम केले. मला पद मिळालेच पाहिजे असे नाही. मला पक्षासाठी काम करायचे आहे आणि सध्या मी तेच  करतो आहे. मी विविध राजकीय, सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांना उपस्थित राहिलो आहे”.

हार्दिक यांच्याबाबत बोलताना, भाजपाच्या एका जेष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले की “हार्दिकला पक्षात सामील करून बाजूला टाकण्यात टाकण्यात आले आहे असे म्हणणे चुकीचे आहे. जेव्हा तुम्ही नवीन प्रवेश करता तेव्हा तुम्हाला संयम हा गुण दाखवावाच लागतो. संयम दाखवणे फार महत्वाचे आहे. पूर्वीच्या काँग्रेस सरकारमधील माजी उपमुख्यमंत्री आणि सध्याचे भाजप खासदार नरहरी अमीन यांनासुद्धा पक्षात आठ वर्षे संयम दाखवावा लागला”. ते पुढे म्हणाले की, “पक्ष तुमची निष्ठा स्वाभाविकपणे तपासेल. तुम्ही त्यांच्या रणनीतीला कसे सहकार्य करत आहात हे तपासून बघितले जाईल. कोणतीही जबाबदारी देण्यापूर्वी तुम्हाला जास्त महत्त्व दिल्यास पक्षांतर्गत असंतोष निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पक्ष सावध पाऊले टाकत आहे”.
भाजपच्या आणखी एका कार्यकर्त्याने सांगितले, “मला वाटते की सौराष्ट्रातील पाटीदारबहुल प्रदेशात हार्दिकचा अजूनही मोठा प्रभाव आहे. आणि २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत पाटीदार मतांची उणीव भरून काढण्यासाठी पक्ष त्याचा नक्कीच उपयोग करेल”.