हार्दिक पटेल यांनी बुधवारी काँग्रेसला रामराम ठोकला. गेल्या काही महिन्यांपासून बंडाचे निशाण फडकविणारे पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी अखेर बुधवारी गुजरात प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्षपदासह पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. गुजरातमध्ये वर्षांअखेर विधानसभा निवडणुका होणार असताना काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जातोय. आता पक्ष सोडल्याच्या दुसऱ्याच दिवशी हार्दिक पटेल यांनी काँग्रेसवर निशाणा साधलाय. काँग्रेस हा ‘सर्वात मोठा जातीयवादी पक्ष’ आहे, अशी टीका हार्दिक पटेल यांनी केली आहे.
अहमदाबादमध्ये पत्रकार परिषदेला संबोधित करताना हार्दिक पटेल यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले, “काँग्रेस हा सर्वात मोठा जातीयवादी पक्ष आहे आणि राज्य युनिटच्या कार्यकारी अध्यक्षांनी त्यांना कोणतीही कर्तव्ये न सोपवली नाही. कार्याध्यक्षांच्या जबाबदाऱ्या केवळ कागदावर आहेत. मला दोन वर्षे कोणतीही जबाबदारी देण्यात आली नाही.”
हार्दिक पटेल यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी
यावेळी हार्दिक पटेल यांनी भाजपात प्रवेश करण्याच्या अफवा फेटाळून लावल्या आहेत. भाजपामध्ये प्रवेश करण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी पाटीदार नेत्यांची माफी मागितली. “मी ज्येष्ठ पाटीदार नेत्यांची आणि मित्रांची माफी मागतो. त्यांनी मला काँग्रेसमध्ये न जाण्याचा सल्ला देत सावध केले होते. परंतु मी ऐकलं नाही. त्यांच्या सल्ल्याचा अर्थ आता मला कळला आहे,” असं पटेल यांनी म्हटलंय.
हार्दिक पटेल यांनी बुधवारी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना पाठवलेल्या राजीनामा पत्रात प्रदेश काँग्रेस नेत्यांबरोबरच शीर्ष नेतृत्वालाही लक्ष्य केले. ‘‘गुजरात आणि गुजरातींबद्दल द्वेष असल्यासारखे पक्षाच्या नेतृत्वाचे वर्तन होते. मी अनेकदा गुजरातमधील समस्यांकडे नेतृत्वाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र, जेव्हा-जेव्हा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना भेटून काही मुद्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे मोबाइलवर अधिक लक्ष असल्याचे आढळले. काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे गांभीर्याचा अभाव असल्याचे दिसले’’, अशी टीका करत हार्दीक पटेल यांनी राहुल गांधी यांना लक्ष्य केले. देशाला किंवा पक्षाला गरज असताना काही नेते परदेशात मौजमजा करत होते, असंही हार्दिक पटेल यांनी या पत्रात म्हटलं होतं.