कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड विधानसभा मतदारसंघातील राजकारण धक्कादायक वळणे घेत आहे. या तालुक्यातील भाजप समर्थक आमदार शिवाजी पाटील यांना शह देण्यासाठी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या कन्या नंदा बाभुळकर यांना एकत्रित आणले. मात्र, आता शिवाजी पाटील यांनी नंदा बाभुळकर यांच्याशी राजकीय आघाडी करण्यासाठी चर्चा केल्याचा दावा केला आहे. परिणामी, बाभुळकर या भाजप समर्थक आमदाराशी हात मिळवणी करणार की अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे माजी आमदार पाटील राजेश पाटील यांच्या सोबत जाणार हे लक्षवेधी ठरले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात महायुती व महाविकास आघाडी स्वरूपातच निवडणूक लढवण्याची विधाने राजकीय नेत्यांकडून केली जात आहेत. प्रत्यक्षात त्यांची पावले सोयीचे राजकारण करण्याच्या दिशेने पडत आहेत. त्याची पहिली सुरुवात चंदगड तालुक्यात झाली. येथे भाजप समर्थक आमदार शिवाजी पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतील प्रतिस्पर्धी दौलत साखर कारखाना चालवायला घेतलेले मानसिंग खोराटे व काँग्रेसचे जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष विनायक तथा अप्पी पाटील यांना सोबत घेत जुन्या शत्रूंना मित्र बनवले. याचवेळी आमदार पाटील यांनी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजेश पाटील यांना शह दिला. त्यावर अजित दादा गटाकडूनही प्रतिशह देण्याच्या हालचाली सुरू झाल्या.
या तालुक्यात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस व अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस हे विळ्या भोपळ्याचे सख्य असलेली नेतेमंडळी हातात हात घालून निवडणुकीला सामोरे जाण्याच्या तयारीत आहेत. तशी घोषणा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी या पक्षाचे माजी आमदार राजेश पाटील व विधानसभेचे दिवंगत अध्यक्ष बाबा कुपेकर यांच्या कन्या, राष्ट्रवादी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्या नंदा बाभुळकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याचा कोल्हापूर जिल्ह्यातला हा प्रयोग पुढे वेगळ्या वळणावर येऊन ठेपला. आमदार शिवाजी पाटील यांनी हसन मुश्रीफ यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा आमदार पाटील यांनी आपण नंदा बाबुळकर यांच्या सोबत एकत्र येण्याची चर्चा सुरू केली असल्याचे सांगितले. या विधानाने मुश्रीफ यांना धक्का बसला. त्यावर मुश्रीफ यांनी राजेश पाटील व नंदा बाभुळकर यांनी एकत्र येण्याचा निर्णय आधीच घेतला होता. त्याला मी केवळ होकार भरण्याचे काम केले. राजेश पाटील व बाभुळकर यांच्यात झालेली चर्चा मला माहित नव्हती. त्यांनीही तशी कल्पनाही दिलेली नव्हती, असे म्हणत बाजू सावरावी लागली.
चंदगड मतदार संघात भाजप आमदार शिवाजी पाटील यांना कोंडीत पकडण्याची दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची राजकीय खेळी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या कितपत पचनी पडणार याचीही चर्चा सुरू झाली आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस खरेच एकत्र येणार की भाजप समर्थक आमदार हे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाशी हात मिळवणी करणार, यापैकी नेमके काय घडणार याची उत्सुकता शिगेला गेली आहे.
