राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी ‘ऑर्गनायझर’ आणि ‘पंचजन्य’ला दिलेल्या मुलाखतीत देशाची सुरक्षा आणि हिंदूंची भूमिका यांविषयी आपले मत व्यक्त केले. भारत हे हिंदू राष्ट्र आहे आणि हा संघटनेचा शाश्वत विचार आहे, असे त्यांनी रविवारी प्रकाशित झालेल्या संघटनेशी संबंधित साप्ताहिक ‘ऑर्गनायझर’ आणि ‘पंचजन्य’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले. भागवत यांनी भारताशेजारील भागात असणारी दुष्टता नष्ट करण्यासाठी शक्तीचा वापर आणि काही देशांमध्ये होणाऱ्या छळापासून संरक्षण करण्यासाठी हिंदू समाजाच्या शक्तीचा वापर करण्याचेही म्हटले. राष्ट्रीय सुरक्षेबाबत मोहन भागवत नक्की काय म्हणाले? जाणून घेऊ…
मोहन भागवत यांनी हिंदूंच्या भूमिकेविषयी नक्की काय म्हटले?
मोहन भागवत म्हणाले, “बाळासाहेबांनी एकदा म्हटले होते, ‘हिंदुस्थान हे हिंदू राष्ट्र आहे.’ संपूर्ण हिंदू समाज या राष्ट्राचा जबाबदार संरक्षक आहे. या देशाचे स्वरूप आणि संस्कृती हिंदू आहे आणि म्हणूनच हे हिंदू राष्ट्र आहे,” असे ते म्हणाले. ही मूळ कल्पना कायम ठेवून सर्व काही करावे लागेल, अशी भागवत यांची भूमिका आहे. त्यामुळेच ‘पवित्र हिंदू धर्म, हिंदू संस्कृती आणि हिंदू समाजाचे रक्षण करताना हिंदू राष्ट्राचा सर्वांगीण विकास,’ असे म्हणत संघ स्वयंसेवक शपथ घेतात, असे भागवत म्हणाले.
राष्ट्रीय सुरक्षेवर मोहन भागवत काय म्हणाले?
पहलगाम हल्ला आणि त्यानंतर ऑपरेशन सिंदूरला मिळालेल्या प्रतिसादावर मोहन भागवत यांनी राष्ट्रीय सुरक्षेबद्दल आपले विचार व्यक्त केले. भारताने सद्गुण आणि शक्ती दोन्हीची पूजा केली पाहिजे, असे त्यांचे मत आहे. “चांगल्या लोकांच्या संरक्षणासाठी, दुष्टांचा नाश करण्यासाठी, आपली शक्ती महत्त्वाची आहे. जेव्हा कोणताही पर्याय उपलब्ध नसतो, तेव्हा दुष्टतेचा शक्तीने नायनाट करावा लागतो. आपल्या सर्व सीमांवर वाईट शक्तींचा दुष्टपणा असल्याने आपल्याकडे शक्तिशाली होण्याशिवाय पर्याय नाही,” असे ते म्हणाले. ऑपरेशन सिंदूरनंतर संघ प्रमुख भागवत यांनी पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवरील लष्करी कारवाईबद्दल सरकारचे कौतुक केले होते. त्यांनी भारताच्या सुरक्षेसाठी हे हल्ले अपरिहार्य असल्याचे म्हटले होते. लष्करी हल्ल्यामुळे संपूर्ण देशाचा स्वाभिमान आणि मनोबल वाढले, असेही ते म्हणाले.
बांगलादेशमधील हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांवर त्यांची भूमिका
गेल्या वर्षी शेख हसीना यांनी देशातून पलायन केल्यानंतर बांगलादेशमध्ये हिंदूंवरील अत्याचारांच्या अनेक बातम्या समोर आल्या. याचा उल्लेख करीत भागवत, “हिंदू मजबूत असतील तेव्हाच कोणीतरी हिंदूंची चिंता करील. हिंदू समाज आणि भारत एकमेकांशी जोडलेले आहेत . तसेच हिंदू समाजाचे वैभवशाली स्वरूप भारताला गौरव देईल. असा मजबूत हिंदू समाज भारतातील लोकांना एकत्र आणण्यासाठी एक आदर्श तयार करू शकतो,” असे म्हणाले. भागवत यांच्या मते, भारतातील हिंदू समाज मजबूत झाला, तर जागतिक स्तरावर हिंदूंना आपोआपच ताकद मिळेल.
“हे काम सुरू आहे; पण अद्याप पूर्ण झालेले नाही. हळूहळू का होईना; परंतु निश्चितच तशा स्वरूपाची परिस्थिती विकसित होत आहे. यावेळी, बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचारांविरुद्ध ज्या पद्धतीने संताप व्यक्त केला गेला आहे, तो अभूतपूर्व आहे. स्थानिक हिंदूदेखील आता म्हणतात की, आम्ही पळून जाणार नाही. आम्ही राहू आणि आमच्या हक्कांसाठी लढू,” असे भागवत म्हणाले. ते पुढे म्हणाले, “आता हिंदू समाजाची अंतर्गत ताकद वाढत आहे. संघटना वाढत आहे आणि त्याचा प्रभाव स्वाभाविकपणे दिसून येईल. तोपर्यंत आपण लढत राहायला हवे.”
“भारताने जगाला मार्गदर्शन करावे”
मोहन भागवत म्हणाले की, जग भारताकडून नवीन मार्ग दाखविण्याची वाट पाहत आहे आणि हे एक दैवी कर्तव्य आहे. त्यांनी आपल्या मुलाखतीत, “जग एका नवीन मार्गाची वाट पाहत आहे आणि भारत म्हणजेच हिंदू समाजाला ते कार्य एक दैवी कर्तव्य म्हणून करावे लागेल. कृषी, औद्योगिक व वैज्ञानिक क्रांती संपल्या आहेत. आता जगाला धार्मिक क्रांतीची आवश्यकता आहे. मी धर्माबद्दल बोलत नाही, तर मानवी जीवनावर आधारित सत्य, करुणा आणि तपस्येवर आधारित पुनर्रचना करण्याची आवश्यकता आहे,” असेही म्हटले आहे.
आपल्या मुलाखतीत संघटनेच्या गुणात्मक विस्ताराबाबत ते म्हणाले, “एखाद्या व्यक्तीला त्याच्या स्वभावानुसार विकसित करण्यासाठी आणि अशा व्यक्तींसह एकत्रितपणे कसे काम करावे यासाठी आम्ही काही मानके तयार केली आहेत. आपल्याला मानके न मोडता किंवा त्यांच्याशी तडजोड न करता पुढे जावे लागेल आणि याचा अर्थ मुळीच असा होत नाही की, लोकांना संघटनेतून वगळले पाहिजे.” काही दशकांपूर्वी संघात सामील झालेल्या आणि धूम्रपान करण्याच्या सवयीशी झुंजणाऱ्या एका समाजवादी नेत्याबद्दल त्यांनी सविस्तरपणे सांगितले. त्यांनी सांगितले की, संघटनेने नेत्याला थोडेसे धूम्रपान करण्याची परवानगी दिली होती; मात्र त्यानंतर त्यांची सवय सुटली.
“लोकांना जसे आहेत तसे स्वीकारा. आपल्याकडे ही मोकळीक आहे; परंतु त्याच वेळी गरजेनुसार त्यांना बदलण्याची कलादेखील आपल्याकडे आहे. तसेच, आपल्याकडे असे धैर्य आणि ताकदही आहे. गुणवत्ता टिकवून ठेवत संघटना वाढली आहे, याचे हेच कारण आहे. आम्हाला संघटनेत गुणवत्ता हवी आहे; परंतु आम्ही हेदेखील लक्षात ठेवतो की, आपल्याला संपूर्ण समाजाच्या हितासाठी काम करायचे आहे,” असेही ते म्हणाले.