तुकाराम झाडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हिंगोलीमध्ये काँग्रेस अंतर्गत गटबाजीला उधाण आले असून दिवंगत काँग्रेसचे नेते राजीव सातव यांच्या पत्नी व पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्यामध्ये बेबनाव असल्याचा संदेश कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचला आहे. गेली अनेक वर्षे सातव यांची पाठराखण करणारे भाऊ पाटील गोरेगावकर त्यांच्याविरोधात गेल्यावर त्यांना सतत डावलले जात होते. आता पुन्हा पालकमंत्री गायकवाड यांनी त्यांना सक्रिय करताच हिंगोलीतील काँग्रेस अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर येऊ लागली आहे.

गेल्याकाही दिवसांपासून हिंगोलीत सातव विरुद्ध गायकवाड अशी गटबाजी दिसू लागली आहे. सातव यांच्या जयंती निमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमातही प्रज्ञा सातव व पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी एकत्र येणे टाळले. आता या गटाच्या समर्थकांनाही दूर सारल्याचे दिसून येत आहे. आता हिंगोली जिल्ह्यातील काँग्रेसच्या राजकारणात भाऊ पाटील गोरेगावकर यांचे वजन वाढू लागले आहे. सातव व गोरेगावकर हे दोघेही मुळात २००९ मध्ये आमदार असताना पालकमंत्री म्हणून वर्षाताई गायकवाड याच होत्या. आजही त्या पालकमंत्री आहेत. पूर्वी सातव आणि त्यांच्या समर्थकांवर पालकमंत्री वर्षा गायकवाड यांची मेहरनजर असायची. त्यामुळे भाऊ पाटील गोरेगावकर व त्यांचे समर्थक यांची कोंडी केली जात असे. त्यांना नवीन कामे मिळणे तर सोडाच पण होणारी दोन कामेही रोखली जात असे. त्यामुळे गोरेगावकर पालकमंत्र्यांवर नाराज असायचे. २०१४ ला सातव खासदार झाले. विधानसभेच्या निवडणुकीत गोरेगावकरही पराभूत झाले. मात्र तोपर्यंत सातव व गोरेगावकर यांच्यातही बेबनाव निर्माण झाला होता. जिल्हा स्तरावर सर्व ठिकाणी सातव गटाचा वरचष्मा तयार झाला. ॉ

पुढे सत्ता गेली काँग्रेसचा शक्तिपात झाला. सातव यांचेही निधन झाले. विधानसभेच्या निवडणुकीत पक्ष, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा कोणताही फौजफाटा सोबत नसताना भाऊ पाटील यांची मतांची शक्ती ४५ हजारांवरून ७४ हजारांवर पोहोचली. ते पराभूत झाले. मात्र त्यांचे मतदान वाढल्याने त्यांचाही गट राजकारणात सक्रिय झाला आहे.गेले काही दिवस सातव व गोरेगावकर या दोन्ही गटाला डावलून पालकमंत्री स्वतंत्रपणे कारभार करत असल्याचे दिसून आले. आता ऑनलाइन नोंदणीमध्येही गटबाजीचे दर्शन सुरूच आहे.

कळमनुरी विधानसभा मतदार संघात तीन हजार, वसमत विधानसभा मतदार संघात दोन हजार डिजिटल सदस्य नोंदणी झाल्यानंतर डिजिटल सदस्य नोंदणीत जिल्हामागे असल्याची दखल पक्षश्रेष्ठींनी घेतली. त्यांनी डिजिटल सदस्य नोंदणी वाढविण्यासाठी पक्षनिरीक्षक गोरेगावकर यांच्याकडे एक माणूस पाठवून सदस्य वाढविण्याची विनंती केली. त्यानंतर हिंगोली विधानसभा मतदार संघात १५ एप्रिलपर्यंत सुमारे २५ हजार सदस्य नोंदले. एका बाजूला हे काम सुरू असतानाच काँग्रेस जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. आता त्यांची जागी कोणत्या गटाचा नेता नेमायचा यावरून चर्चा सुरू झाल्या आहेत. हे पद सातव यांच्या समर्थकांना मिळावे असे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यामुळे काँग्रेस अंतर्गत गटबाजीची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hingoli congress got divided into twointernal groups and facing organizational complication pkd
First published on: 20-05-2022 at 17:06 IST