कोल्हापूर : इचलकरंजी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांत खांदेपालट करण्यात आला आहे. अध्यक्षपदावर दावा करणाऱ्या दोघांची वर्णी राज्यपातळीवर लावण्यात आली. तर पक्षात नव्याने प्रवेश केलेल्या तरुण नेतृत्वाकडे शहराध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली. यावरून राष्ट्रवादीत फुटीची बीजे पेरले गेली असून मावळते महानगर अध्यक्ष भाजपच्या वाटेवर आहेत. नूतन शहर अध्यक्षाच्या नेतृत्व क्षमतेवर प्रश्नचिन्ह लावले जात आहे.

भाजप , एकनाथ शिंदे शिवसेनेच्या तुलनेने इचलकरंजीतील अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद तशी मर्यादित राहिली. अशाही स्थितीत महानगराध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी पक्षाची बांधणी करण्यास सुरुवात केली. विधानसभेवेळी त्यांनी मंत्र्यांशी सल्लामसलत करून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. त्यांना फार मोठी मजल घेता आली नाही.

चोपडे अपक्ष मैदान उतरल्यावर विरोधकांनी संधी साधली. त्यातून सेवा दल सेवा दलाची जिल्हाप्रमुख बाळासाहेब देशमुख यांची महानगर अध्यक्षपदावर निवड करण्यात आली. निवडणुकीनंतर शहराध्यक्षपदावर चोपडे व देशमुख या दोघांनीही दावा सुरू ठेवल्याने कार्यकर्त्यांना नेमके नेतृत्व कोणाकडे आहे याचा पेच पडला.

पक्षांतर्गत वाद चिघळत राहिल्याने अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या समवेत एक बैठक होऊन पदाधिकारी निवडीत फेरबदल करण्यात आला. चोपडे यांना राज्य चिटणीस तर देशमुख यांना सेवा दल प्रदेश उपाध्यक्ष करण्याचा निर्णय घेण्यात आला. पक्षात नव्याने प्रवेश केलेले माजी आमदार अशोक जांभळे यांचे पुत्र सुहास जांभळे यांच्याकडे शहराध्यक्ष पद देण्यात आले.

ही निवड जाहीर होताच चोपडे यांनी महानगर कार्यालयावरील फलक झाकून टाकला. परिणामी या गटाला आता इचलकरंजीत कार्यालयाचा शोध घेण्याची वेळ आली आहे. सुहास जांभळे यांच्या पक्ष संघटन बांधणीबाबत मुदलाताच आनंद आहे.

पक्षांतर्गत वादाला उकळी

असमंजस नेतृत्वाकडे अध्यक्षपद सोपवल्याने नाराजीला तोंड फुटले आहे. याच मुद्द्यावर विठ्ठल चोपडे यांनीही टीकास्त्र सोडले आहे. इचलकरंजी राष्ट्रवादी वातावरण अजिबात नसताना चांगली बांधणी करून सुसज्ज पक्ष कार्यालय सुरू केले. त्याच्या उद्घाटनास अजित पवार आले होते. तेव्हा हसन मुश्रीफ यांच्या विरोधात इचलकरंजीत पाणी प्रश्नावरून संतप्त भावना होत्या. ज्यांनी मुश्रीफ यांच्यावर सातत्याने टीका केली. त्यांच्या आगमनाच्या वेळी काळे झेंडे दाखवले अशांच्याकडेच आता नेतृत्व सोपवले आहे. दिवंगत नितीन जांभळे हे धडाडीचे होते, पण सुहास जांभळे यांचा राजकीय जन्म वर्षभराचाही नसतानाही अशा अनुनभवीस थेट अध्यक्ष कसे केले , उद्या नव्याने कोणी बडे लोक पक्षात आले तर त्यांच्याकडे पुन्हा नेतृत्व सोपवले जाणार का, असे प्रश्न उपस्थित करीत त्यांनी सुहास जांभळे यांच्या अकार्यक्षमतेवर बोट ठेवले आहे. अशोक जांभळे यांच्या प्रकृती स्वास्थामुळे त्यांच्याही राजकीय मर्यादा स्पष्ट केल्या जात आहेत.

खांदेबदलाने साध्य काय ?

याच वेळी विठ्ठलाच्या हाती भाजपचा झेंडा येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. चोपडे यांनी नुकतीच माजी मंत्री प्रकाश आवाडे, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांच्याशी चर्चा केली आहे. इचलकरंजी भाजपातील एकूण नेतृत्वाची गर्दी पाहता त्यांनी एकनाथ शिंदे शिवसेनेचा पर्याय ठेवला आहे. खासदार धैर्यशील माने, जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्या संपर्कात ते असल्याची चर्चा आहे. यामुळे इचलकरंजी राष्ट्रवादीला चोपडे सारख्या अभ्यासू तरुणास गमवावे लागणार असताना दुसरीकडे अपरिपक्व नव्या नेतृत्वाच्या आधारे महापालिका निवडणुकीत झेंडा रोवण्याचेच तर राहो पण किमान अस्तित्व दाखवणेही कठीण होऊन बसणार आहे. पदाधिकारी फेरबदलाची गणिते अंगलट येणार की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.