उमाकांत देशपांडे

एकनाथ शिंदे यांनी मूळ शिवसेना आपलीच असल्याचा दावा केल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेगळा गट करण्यासाठी मान्यता न दिल्यास मुख्यमंत्र्यांची कायदेशीर कोंडी करण्याची  रणनीती भाजपने पडद्याआड हालचाली करून आखली आहे. शिवसेनेतून बाहेर पडलेलो नाही, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणारे शिवसेना कार्यकर्ते आहोत. मूळ शिवसेना आमचीच असून विधीमंडळ गटनेताही मीच आहे, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्यांच्या गटाने मुख्य प्रतोद पदी सुनील प्रभू यांच्याऐवजी भरत गोगावले यांची निवड केली आहे व त्यास मान्यता देण्याची विनंती विधानसभा उपाध्यक्षांना केली आहे. शिंदे गटाने मागे फिरावे, याबाबत उद्धव ठाकरे यांनी केलेले आवाहनही फेटाळले आहे. 

ठाकरे यांनी शिंदे यांचा गट किंवा सेना फुटल्याचे मान्य न केल्यास विधीमंडळ व कायदेशीर मुद्दांवर न्यायालयात जाण्याची तयारी भाजपने शिंदे गटाच्या माध्यमातून आखली आहे.  महाविकास आघाडी व उद्धव ठाकरे  कशी पावले उचलतात आणि किती ताठर भूमिका घेतात, त्यानुसार शिंदे गटाकडून पावले टाकली जाणार आहेत. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपने शिंदे गटाला मंत्रिमंडळात चांगले प्रतिनिधित्व देण्याबरोबरच अन्य काही बाबींना मान्यता दिली आहे. शिंदे गटाकडे ३७ हून अधिक आमदार असल्याने ही शिवसेनेतील फूट मानली जाईल. पक्षांतरबंदी कायद्यानुसार कारवाई होणार नाही. ऐनवेळी गडबड झाली व काही आमदार माघारी गेले किंवा शिंदे गटातील आमदारांची संख्या ३७ हून कमी झाली, तरी उर्वरित आमदारांनी राजीनामे द्यावेत आणि त्यांच्या विरोधात  उमेदवार उभा न करता निवडून येण्यास भाजप मदत करेल, असेही आश्वासन देण्यात आले आहे. मात्र शिंदे गटाकडे ४० हून अधिक आमदार असल्याने पोटनिवडणुकीची वेळच येणार नाही, असे सूत्रांनी सांगितले.