अमरावती : विधानसभा निवडणुकीच्या वेळी बंडखोरी केल्यामुळे भाजपमधून निष्कासित झालेले माजी राज्यमंत्री जगदीश गुप्ता हे शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कात असून त्यांच्या पक्षप्रवेशाची औपचारिकता शिल्लक आहे. भाजपसाठी हा धक्का, तर महापालिका निवडणुकीच्या आधी शिंदे गटासाठी हा पक्षसंघटनात्मक बळ वाढविण्याची संधी ठरणार आहे.

याआधी शिवसेना ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्या प्रीती बंड यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. आता जगदीश गुप्ता हे शिंदे गटाच्या वाटेवर आहेत.

जगदीश गुप्ता यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीच्या उमेदवार सुलभा खोडके यांच्या विरोधात अमरावती मतदारसंघातून बंडखोरी केली होती. स्वत:ला भाजपचे अनधिकृत उमेदवार असे संबोधणाऱ्या जगदीश गुप्ता यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली होती.

निवडणुकीत जगदीश गुप्ता यांना पराभव पत्करावा लागला, त्यानंतर त्यांना भाजपमध्ये परतण्याचे वेध लागले होते. पण, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून कुठल्याही प्रकारचे संकेत न मिळाल्याने अखेर त्यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. जगदीश गुप्ता यांची बंडखोरी करण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. २०१२ च्या महापालिका निवडणुकीच्या वेळी जगदीश गुप्ता यांनी जनकल्याण आघाडी स्थापन करून भाजपला आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. या निवडणुकीत त्यांच्यात आघाडीला फारशी चांगली कामगिरी करता आली नव्हती, पण त्यांची ही बंडखोरी गाजली होती.

जगदीश गुप्ता यांचा गट हा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांपासून कायम अंतर ठेवत आला आहे. त्यांचा गट गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक राजकारणात सक्रीय आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी हिंदुत्वाच्या मुद्यावर ध्रुवीकरण घडवून आणण्याचा गुप्ता यांच्या गटाचा प्रयत्न होता, पण तो यशस्वी ठरू शकला नाही. आता त्यांच्या गटामुळे शिंदे गटाला काय लाभ मिळू शकतो, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

महापालिका निवडणुकीच्या आधी शिंदे गट शहरात संघटनात्मक बांधणी करण्याच्या प्रयत्नात आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनेचे माजी आमदार दिवंगत संजय बंड यांच्या पत्नी प्रीती बंड यांना शिवसेना शिंदे गटात सामावून घेण्यात आले. प्रीती बंड यांना बडनेरा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाची उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी बंडखोरी केली होती. त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते. ठाकरे गटात परतण्याची त्यांची इच्छा होती, पण मातोश्रीवरून बोलावणे न आल्याने त्यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.

जगदीश गुप्ता यांनी देखील भाजपमध्ये परतण्याचे प्रयत्न सुरू केले होते, पण पक्षनेतृत्वाकडून प्रतिसाद न मिळाल्याने अखेरीस त्यांनी शिंदे गटाला साथ देण्याचा निर्णय घेतला. आता त्यांच्या पक्षप्रवेशाची प्रतीक्षा समर्थकांना आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आपण शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षप्रवेशाची तारीख अद्याप ठरलेली नाही. मध्यस्थांसोबत चर्चा झाली आहे. भाजपकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने आपण हा निर्णय घेतला आहे. – जगदीश गुप्ता, माजी राज्यमंत्री