अमरावती : विधानसभा निवडणुकीच्या वेळी बंडखोरी केल्यामुळे भाजपमधून निष्कासित झालेले माजी राज्यमंत्री जगदीश गुप्ता यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भगवा हाती घेत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. भाजपसाठी हा धक्का, तर महापालिका निवडणुकीच्या आधी शिंदे गटासाठी ही पक्षसंघटनात्मक बळ वाढविण्याची संधी मानली जात आहे. तीन महिन्यांआधी शिवसेना ठाकरे गटातून निष्कासित नेत्या प्रीती बंड यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला होता.

मुंबई येथे सोमवारी रात्री जगदीश गुप्ता यांच्यासह माजी महापौर नितीन वानखडे, माजी स्थायी समिती सभापती नितीन चांडक, राजू राठी, विलास रोंधे, माजी विरोधी पक्ष नेते सुरेंद्र पोपली माजी नगरसेवक मनीष जोशी, सुभाष रत्नपारखी, प्रशांत महाजन, अनिल कडू, भास्कर मानमोडे, वासुदेव देऊळकर, डॉ.राजेश जयपूरकर यांनीही उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. अग्रवाल समाजाचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष किशोर गोयंका, खामगाव अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष मनोज खंडेलवाल, मराठा महासंघाचे गणेशराव रेखे, साहू समाजाचे अमरावती अध्यक्ष रामचंद्र गुप्ता यांनी देखील शिंदे यांची साथ देण्याचा निर्णय घेतला. याप्रसंगी माजी खासदार आनंदराव अडसूळ, कॅप्टन अभिजीत अडसूळ, प्रिती बंड, उपस्थित होते.

जगदीश गुप्ता यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीच्या उमेदवार सुलभा खोडके यांच्या विरोधात अमरावती मतदारसंघातून बंडखोरी केली होती. स्वत:ला भाजपचे अनधिकृत उमेदवार असे संबोधणाऱ्या जगदीश गुप्ता यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली होती. निवडणुकीत जगदीश गुप्ता यांना पराभव पत्करावा लागला, त्यानंतर त्यांना भाजपमध्ये परतण्याचे वेध लागले होते. पण, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून कुठल्याही प्रकारचे संकेत न मिळाल्याने अखेर त्यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

जगदीश गुप्ता यांची बंडखोरी करण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. २०१२ च्या महापालिका निवडणुकीच्या वेळी जगदीश गुप्ता यांनी जनकल्याण आघाडी स्थापन करून भाजपला आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. या निवडणुकीत त्यांच्यात आघाडीला फारशी चांगली कामगिरी करता आली नव्हती, पण त्यांची ही बंडखोरी गाजली होती.

जगदीश गुप्ता यांचा गट हा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांपासून कायम अंतर ठेवत आला आहे. त्यांचा गट गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक राजकारणात सक्रीय आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी हिंदुत्वाच्या मुद्यावर ध्रुवीकरण घडवून आणण्याचा गुप्ता यांच्या गटाचा प्रयत्न होता, पण तो यशस्वी ठरू शकला नाही. आता त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे शिंदे गटाला काय लाभ मिळू शकतो, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

महापालिका निवडणुकीच्या आधी शिंदे गट शहरात संघटनात्मक बांधणी करण्याच्या प्रयत्नात आहे. जगदीश गुप्ता यांनी भाजपमध्ये परतण्याचे प्रयत्न सुरू केले होते, पण पक्षनेतृत्वाकडून प्रतिसाद न मिळाल्याने अखेरीस त्यांनी शिंदे गटाला साथ देण्याचा निर्णय घेतला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अमरावतीचे असंख्य कार्यकर्ते अमरावतीच्या विकासाचे शिवधनुष्य पेलण्यास सज्ज झाले आहेत. या सर्वांच्या सहकार्याने आम्ही १९८२ पासून राजकीय क्षेत्रात कार्य केले. विपरित परिस्थितीत काहीच नसताना पक्षाचे मजबुतीने कार्य केले. भविष्यात देखील हे शिवधनुष्य पेलण्याची जबाबदारी एकनाथ शिंदे यांनी द्यावी, पक्षात आम्हाला सामावून घेतल्याबद्दल आभार व्यक्त करतो. – जगदीश गुप्ता, माजी राज्यमंत्री