अमरावती : ज्या किमतीत हातरुमाल मिळत नाही, त्या १७ रुपये किमतीत खरेच साडी मिळू शकेल का, हा प्रश्न कुणालाही पडू शकेल. नवनीत राणा यांनी मतदारांना १७ रुपये किमतीच्या साड्या वाटल्या, परंतु या साड्यांमुळे येथील लोकांचे मतपरिवर्तन होणार नाही, असा दावा आमदार बच्चू कडू यांनी केला, त्यामुळे हा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे.
अमरावती लोकसभा मतदार संघात प्रचारादरम्यान आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण तापले आहे. भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी दिली आहे. पण, महायुतीत असलेल्या आमदार बच्चू कडू यांनी मात्र त्यांच्या पक्षातर्फे दिनेश बुब यांना त्यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरवले आहे. कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांना टोला लगावला. दोन कोटींच्या वाहनातून फिरायचे आणि १७ रुपयांची साडी वाटायची, हे बरे नव्हे असे सांगत साडी वाटप करून लोकांना गुलामीकडे नेण्याची व्यवस्था तोडून टाका, हे आवाहन बच्चू कडूंनी केले.
हेही वाचा : तुरुंगात अरविंद केजरीवालांचं ४.५ किलो वजन घटलं, आप नेत्या आतिशी म्हणाल्या, “त्यांना काही झालं तर…”
दरवर्षी मेळघाटात होळी सणाच्या निमित्ताने नवनीत राणा यांच्याकडून आदिवासी महिलांना साडी वाटप, किराणा वाटप केले जाते. ते यावर्षीही करण्यात आले. पण काही गावांमध्ये निकृष्ट दर्जाच्या आणि पारदर्शी कापड असलेल्या साड्यांचे वाटप करण्यात आल्याच्या तक्रारी समोर आल्या. नेमका हाच धागा पकडून बच्चू कडूंनी नवनीत राणांवर टीका केली.
सुरतमधील घाऊक बाजारातून मोठ्या संख्येन साड्या खरेदी केल्यास त्या अत्यंत कमी किमतीत उपलब्ध होऊ शकतात. घरगुती वापराच्या साड्या या तीस ते चाळीस रुपयांमध्ये या ठिकाणी मिळतात, असे स्थानिक कापड व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे दरवर्षी दिवाळी सणाच्या निमित्ताने किराणा वाटप करतात. होळीच्या सणाच्या निमित्ताने साडी वाटप केले जाते. जाहीरपणे सर्वकाही केले जाते. त्यांच्या दातृत्वाची चर्चा समाजमाध्यमांवर रंगते. यंदा निवडणुकीचे वर्ष असल्याने हळदी-कुंकू कार्यक्रमातूनही हे दान दिसले. विरोधकांनी त्याविषयी टीका केली. पण या टीकेची पर्वा राणा यांच समर्थक करीत नाहीत. इतर कुणा नेत्यांमध्ये ही दानत आहे का, असा उलट सवाल ते करतात. यंदा सुमारे ३ लाख साड्यांचे वाटप करण्यात आले आहे, असे युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
हेही वाचा : उमेदवारी जाहीर होताच महुआ मोईत्राना झटका; ईडीकडून मनी लाँडरिंगचा खटला दाखल
मतदारांना प्रलोभन दाखविणे हा सर्वच राजकीय पक्षांसाठी आवडीचा विषय. कुणी उघडपणे तर कुणी छुप्या पद्धतीने हे काम करताना दिसतात. निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापुर्वी केलेले दान हे प्रलोभन ठरत नाही, हा एक सामान्य निष्कर्ष. त्यातूनच अमरावतीत साडी वाटपाचा विषय चर्चेत आला आहे.
मेळघाटासह संपूर्ण जिल्ह्यात चांगल्या दर्जाच्या साड्यांचे वाटप करण्यात आले. कुठूनही तक्रारी आल्या नाहीत. केवळ मेळघाटातील काही गावांमध्ये तलम साड्या पोहचल्या. त्या आदिवासी महिलांना पसंत पडल्या नाहीत, त्या लगेच बदलून देण्यात आल्या. विरोधक या प्रकरणाचे भांडवल करीत आहेत.
जयंत वानखडे, राष्ट्रीय सचिव, युवा स्वाभिमान पक्ष.