धुळे : राजकारणात संयम असणे महत्वाचे असते. धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपकडून सलग तिसऱ्यांदा उमेदवारी मिळालेले विद्यमान खासदार डाॅ. सुभाष भामरे यांनी नेमके तेच केले. विरोधी पक्षांपेक्षा पक्षाअंतर्गत विरोधकांनी डाॅ. भामरे यांना उमेदवारी मिळू नये म्हणून चालू केलेल्या मोहिमेविषयी प्रतिक्रिया देणे टाळलेल्या भामरे यांच्यावरच पक्षश्रेष्ठींनी पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. मतदार संघात केलेली कामे, सर्वांशी जुळवून घेण्याचा स्वभाव आणि संयम त्यासाठी त्यांच्या कामी आल्याचे मानले जात आहे.

धुळे लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी अनेक इच्छुक होते. त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या पध्दतीने दबाव आणणेही सुरु केले होते. २०१४ मध्ये देशभरात निर्माण झालेली मोदी लाट आणि सत्तेसाठी निर्माण झालेले पोषक वातावरण, या अनुषंगाने भाजपकडून उमेदवारी मिळविण्यासाठी अनेकांची रांग लागली होती. या स्पर्धेत संभाव्य उमेदवार म्हणून डॉ. भामरे यांचे नाव कुठेच नव्हते. भाजपने धक्कातंत्र वापरत भामरे यांना उमेदवारी जाहीर केल्यावर खुद्द भाजपच्या स्थानिक नेत्यांनाही धक्का बसला होता.

हेही वाचा : रायगडात तटकरे विरुद्ध गिते लढतीचा तिसरा अंक?

भामरे मोठ्या मताधिक्याने निवडून आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्याच मंत्रिमंडळात त्यांना संरक्षण राज्यमंत्रिपद मिळाले. हा राज्यातील भाजप नेतृत्वासह सर्वांनाच धक्का होता. मंत्रिपद भोगलेल्या भामरे यांना भाजपने २०१९ च्या निवडणुकीत पुन्हा एकदा उमेदवारी दिली. यावेळीही ते बहुमताने निवडून आले. मतदार संघात प्रामुख्याने रस्त्यांच्या कामांकडे त्यांनी अधिक लक्ष दिले. बहुचर्चित मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाच्या कामाला गती दिली.

पक्षातंर्गत करण्यात आलेल्या सर्व्हेंचा दाखला देत काही इच्छुकांनी आता लोकसभा निवडणुकीसाठी भामरे यांना उमेदवारी मिळणे शक्य नसल्याने आपलाच नंबर असल्याचा समज करुन घेतला. अनेकांनी तर प्रचारालाही सुरुवात केली होती. धुळे लोकसभा मतदार संघात उमेदवारी देतांना भाजप भाकरी फिरवेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली. त्यांच्या उमेदवारीबद्दल साशंकता निर्माण झाली असताना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने पुन्हा एकदा भामरे यांच्यावर विश्वास टाकत इच्छुकांच्या मनसुब्यावर पाणी फिरविले.

हेही वाचा : पालघरमध्ये राजकीय संभ्रम कायम, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उमेदवार भाजप पळविणार का?

इच्छुकांची निराशा

डॉ. भामरे यांना भाजप तिसऱ्यांदा उमेदवारी देणारच नाही, असे वातावरण पक्षातंर्गत तयार करण्यात आल्याने धुळे लोकसभेसाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले होते. इच्छुकांनी तीन महिन्यांपासून मतदार संघात विविध कार्यक्रम घेणे सुरु केले होते. बागलाण तालुक्यातील आणि नाशिक परिक्षेत्रात सेवा केलेले निवृत्त पोलीस अधिकारी प्रतापराव दिघावकर यांनी, गुजरात भाजप प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांची कन्या वन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे यांनी, माजी मंत्री तथा आमदार अमरिशभाई पटेल यांचे कट्टर समर्थक व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजी दहिते यांचे पुत्र जिल्हा परिषदेचे सदस्य हर्षवर्धन दहिते हे उमेदवारी मिळण्याची आस ठेवून होते.