scorecardresearch

‘गोकुळ’च्या सभेच्या निमित्ताने सतेज पाटील-महाडिक परिवारातील संघर्षाची नवी घुसळण

महाडिक यांच्या ताब्यात गोकुळची सूत्रे असताना तेथील गैरकारभाराविरोधात पाटील यांनी मोहीम चालवली होती. सत्तांतर घडल्यानंतर पाटील यांना लक्ष्य करून महाडिक परिवाराने गोकुळ विरोधातील लढाईला हात घातला आहे.

‘गोकुळ’च्या सभेच्या निमित्ताने सतेज पाटील-महाडिक परिवारातील संघर्षाची नवी घुसळण

दयानंद लिपारे

गोकुळ दूध संघाच्या वार्षिक सभेच्या निमित्ताने सतेज पाटील आणि महाडिक परिवारातील संघर्षाची नवी घुसळून सुरू झाली आहे. महाडिक यांच्या ताब्यात गोकुळची सूत्रे असताना तेथील गैरकारभाराविरोधात पाटील यांनी मोहीम चालवली होती. सत्तांतर घडल्यानंतर पाटील यांना लक्ष्य करून महाडिक परिवाराने गोकुळ विरोधातील लढाईला हात घातला आहे. परिणामी गोकुळच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतील वादाची परंपरा सत्ताबदल झाला तरी कायम राहिली आहे.

हेही वाचा- प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोर अमोल मिटकरींविरोधात आरोपसत्र

 कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक हा राज्यातील सर्वात मोठा संघ आपली उत्पादने गोकुळ या नाममुद्रेने विकत असतो. त्यामुळे ही संस्था गोकुळ या नावानेच प्रसिद्ध आहे. गोकुळ दूध विक्रीने १५ कोटी लिटरचा टप्पा ओलांडला आहे. सत्तेला उब देणारा प्रभावी सत्तामंच म्हणून गोकुळकडे पाहिले जाते. एक वेळ खासदारकी- आमदारकी गेली तरी बेहत्तर पण गोकुळवर वर्चस्व राहिले पाहिजे, हा जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या राजकीय रणनीतीचा मुख्य भाग राहिला आहे.

  गेली ३० वर्ष गोकुळवर प्रामुख्याने माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व राहिले आहे. या काळात गोकुळ दूध संघाची वाढ झाली खरी. पण त्यातील गैरव्यवहार हा सातत्याने चर्चेत राहिला. हाच मुद्दा घेऊन गेली आठ वर्षे सतेज पाटील यांनी रान उठवले. वार्षिक सर्वसाधारण सभेत ते स्वतः उपस्थित राहून गोकुळच्या कारभाराची पिसे काढत असत. अशातच गोकुळने संघाच्या कारभाराची व्याप्ती वाढवण्यासाठी बहुराज्य दर्जा आणण्याचा प्रयत्न केला. याच मुद्द्यावरून फासे उलटले. पाटील यांनी हा मुद्दा इतक्या जोरकसपणे लावून धरला की गोकुळ बहुराज्य झाले तर सामान्य दूध उत्पादक संघाचे अस्तित्वच उरणार नाही, असे चित्र त्यांनी रंगवले. त्यावर गोकुळच्या निवडणुकीत भर दिला. परिणामी दीड वर्षांपूर्वी सत्तांतर होऊनही महाडिकांचा सत्तासूर्य मात्र मावळला.

गोकुळचा सत्तासंघर्ष रंगला

 आता गोकुळचे नेतृत्व मुख्यत्वे सतेज पाटील व हसन मुश्रीफ या दोन्ही माजी मंत्रांकडे आहे. दीड वर्षाच्या कालावधीत सहा वेळा दूध दरवाढ, एक लाख म्हैस खरेदीसाठी प्रोत्साहन, महालक्ष्मी पशुखाद्य खाद्य प्रकल्पाचा विस्तार असे काही निर्णय घेऊन दूध उत्पादकांमध्ये प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करण्यात आला. तथापि, गोकुळच्या वार्षिक सभेच्या निमित्ताने महाडिक परिवार प्रथमच आक्रमक संघर्षाच्या पावित्र्यात आला. खासदार धनंजय महाडिक, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक, त्यांचे पती माजी आमदार अमल महाडिक यांनी नव्या सत्ताधाऱ्यांच्या कारभाराचा पंचनामा पत्रकार परिषदेत केला. दूध दरवाढ, वासाचे दूध परत करणे यासारख्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याची रणनीती त्यांनी आखली. पण सभेच्या मैदानात ती यशस्वी ठरू शकली नाही. एकतर सभेवेळी धनंजय महाडिक व अमल महाडिक हे मुख्य नेतेच अनुपस्थितीत राहिले. त्यांच्या समवेत निवडून आलेले तीन संचालक सत्ताधाऱ्यांसमवेत सभामंचावर राहिल्याने ही ताकदही गमवावी लागली. परिणामी विरोधकांच्या संघर्षाची धार बोथट झाली. एकट्या शौमिका महाडिक या सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न करत होत्या. विरोधकांनी सभेची आखणी अशी केली की महाडिक यांचा आवाज दबला गेला.

थंडावलेला संघर्ष तापला

 समांतर सभेत महाडिक यांच्या टीकेचा रोख पाटील यांच्यावर राहिला. ‘ समाधानकारक उत्तरे न देता हुकुमशाही पद्धतीने सभा चालवली. महाडिक यांच्या व्यंकटेश्वरा कंपनीने रीतसर सेवा देवून बिले घेतली आहेत. पाटील यांनी स्वतः देवस्थानच्या किती जमिनी लाटल्या याची आकडेवारी जाहीर करावी,’ असे आव्हान दिले आहे. गोकुळमध्ये सत्ता असताना महादेवराव महाडिक यांचे ३२ टक्के टँकर सुरू होते. त्यातून मिळवलेले ४०० कोटी रुपयांचे उत्पन्न बंद झाल्याने महाडिक यांनी सभेत गोंधळ घातला, असे सांगत पाटील यांनी महाडिक यांचा संघर्ष हा आर्थिक व्यवहाराशी निगडित असल्याचा मुद्दा अधोरेखित केला. 

सभेनंतरही वाद संपला नाही

 गोकुळमधील बेबंदशाही कारभाराविरोधात लढा उभारणार असल्याचे महाडिक यांनी म्हटले आहे. आधीच धनंजय महाडिक आणि सतेज पाटील यांनी रामायण – महाभारत याचे संदर्भ घेऊन एकमेकांवर शरसंधान सुरू केले आहे. थंडावलेला दोन परिवारातील संघर्ष नव्याने तापला असताना गोकुळच्या सभेने त्याला फोडणी दिली असून संघर्षाचे पडसाद पुढेही उमटत राहणार याची चुणूक पाहायला मिळाली.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.