कोल्हापूर : निवडणूक महायुती म्हणून लढणार पण महापौर आमचाच असा घोषा कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी लावला असल्याने युतीत निवडणुकीआधीच तेढ निर्माण झाली आहे. प्रत्येक नेत्यांनी जोरदार दावे प्रतिदावे सुरू केले असले तरी महापालिकेत महायुतीची सत्ता येणार का आणि आलीच तर भाजप, अजित पवार राष्ट्रवादी की एकनाथ शिंदे शिवसेना यापैकी कोणाचा महापौर होणार याची उत्सुकता आतापासूनच ताणली गेली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत. आधी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका आणि नंतर महापालिका, नगरपालिका यांच्या निवडणुका होणार असल्याचे संकेत आहेत. तथापि ग्रामीण भागाच्या निवडणुकीपेक्षा शहरी भागातील निवडणुकीची चर्चा अधिक तावातावाने होत आहे.

कोल्हापूर महापालिकेत सत्ता आणण्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात संघर्ष रंगणार हे उघड आहे. पण त्याआधी महापौर पदावरून भाजप, अजित पवार राष्ट्रवादी व एकनाथ शिंदे शिवसेना या महायुतीच्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये दाव्याच्या तोफा डागल्या जात आहेत. त्यावरून वादाला तोंड फुटले आहे.

भाजपच्या एका बैठकीत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर महापालिकेची निवडणूक महायुती म्हणून लढणार असलो तरी महापौर भाजपचा होईल, असे विधान केले. याच विधानाला खासदार धनंजय महाडिक यांनीही पुष्टी दिली आहे. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना एकनाथ शिंदे सेनेचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी त्यांना भाजपचा महापौर करायचा असेल तर शिवसेना पक्षाचा महापौर केल्याशिवाय थांबणार नाही, असे ठणकावून प्रत्युत्तर दिले आहे. राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनीही हीच आग्रही भूमिका घेतलेली आहे.

भाजप – अजित पवार राष्ट्रवादीत महापौर पदावरून दावे रंगले असतानाच राष्ट्रवादीचे वजनदार नेते, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर महापालिकेत आम्ही संख्याबळात नेहमीच दुसऱ्या स्थानावर राहिलो आहे. कासवाच्या गतीने जात आहोत; पण महापौर राष्ट्रवादीचाच करू, असा निर्धार व्यक्त केला आहे.

यामुळे महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी व शिवसेना यांच्यात निवडणुकीच्या आधीपासूनच महापौर पदावरून वादाचा संघर्ष रंगला आहे. वादाची तीव्रता पाहता तो केवळ महापौर पदावर राहणार की उद्या जागा वाटपात पेच होऊन पुन्हा सगळेच वेगळ्या वाटेने लढणार असाही प्रश्न निर्माण झाला आहे.