महेश सरलष्कर, भोपाळ (म.प्र)
मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासाठी राजकीय भवितव्य निश्चित करणारी असेल. राज्यभर लोकांच्या नाराजीला तोंड द्यावे लागले असताना शिवराज मात्र ‘लाडली बहना योजने’च्या माध्यमातून निम्नआर्थिक स्तरावरील सुमारे सव्वाकोटी महिलांना भावनिक आवाहन करत आहेत. ही योजना भाजपसाठी निवडणुकीमध्ये प्रमुख आधार बनू लागली आहे.
शिवराजसिंह चौहान यांचा बुधनी मतदारसंघ भोपाळपासून तासाभराच्या अंतरावर आहे. बुधनीपासून ५० किमी अंतरावर नर्मदेच्या किनारी वसलेले जैत हे शिवराजांचे मूळ गाव. या परिसरात शिवराजसिंह लहानाचे मोठे झाले, राज्याच्या राजकारणात यशस्वी झाले. ते सुमारे दोन दशके मुख्यमंत्रीपद सांभाळत आहेत. वीस वर्षे शिवराजांचा चेहरा बघून लोक कंटाळले असल्याचे जाणवते. ‘महिलांसाठी ‘लाडली बहना योजना’ आणली. पण, आमच्यासाठी काय केले’, हा प्रश्न मुरैनामधील कृषि बाजारातील शेतकरी राजेंद्रसिंह सोळंकी यांनी विचारला. तर, ‘शिवराजांची स्वतःची दुग्ध योजना आणून सरकारी दुग्ध योजना नष्ट करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप भोपाळमधील दुकानदार विनयकुमार यांनी केला. शिवराजांनी ढीगभर योजना लागू केल्या असल्या तरी निवडणुकीच्या वेळी लोकांची कशी आठवण झाली, असा प्रश्न लोकांकडून हमखास विचारला जातो.
मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या कारभाराबद्दल नाराजी असली तरी, राज्यातील सुमारे १.२५ कोटी महिलांना त्यांचा भाऊ वा मामा शिवराजसिंह यांनी घातलेली साद ‘मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान’ यांची राजकीय चतुरता दाखवते. ‘लाडली बहना’ योजनेअंतर्गत यावर्षी मार्चमध्ये नोंदणी सुरू झाली. आत्तापर्यंत तीन टप्प्यांमध्ये नोंदणी झाली असून दरमहा दिली जाणारी रक्कम १ हजार वरून १२५० रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. भाजपची सत्ता आली तर महिलांना दरमहा ३ हजार रुपये मिळतील, असे आश्वासन शिवराजसिंह चौहान यांनी दिले आहे. शिवराजसिंह महिलांना माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांची भीती दाखवत आहेत. ‘कमलनाथ सत्तेवर आले तर ही योजना बंद होईल, तुम्हाला ३ हजार रुपयांवर पाणी सोडावे लागेल’, असे शिवराजसिंह भाषणात सांगतात. भाजपला पुन्हा सत्ता मिळाली आणि शिवराजांनी वचन पूर्ण केले तर महिलांना वार्षिक ३६ हजार रुपये मिळतील!
गावागावांत जनसंपर्कासाठी निघालेले शिवराजसिंह बुधनीपासून काही अंतरावर असलेल्या रुद्रधाम आश्रमातील शंकराच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी थांबले. या मंदिरात महिलांनी गर्दी केलेली होती. दरमहा १ हजार रुपये मिळत असल्याचा दावा या महिला करत होत्या. ‘मला पैसे मिळाले’, असे राधाकुमारी यांचे म्हणणे होते. राधाकुमारीचे कुटुंब चहा विकून गुजराण करते. या योजनेपासून अनेक लाभार्थी वंचितही राहिले आहेत. आता आचारसंहितेमुळे नवी नोंदणी बंद झाली आहे. रुद्रधाम आश्रमापासून दहा मिनिटांवर असलेल्या राला गावातील रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, गावातील ११०० महिला लाभार्थी असल्या तरी फक्त ६०० महिलांना दरमहा पैसे मिळतात. आचारसंहितेआधी महिलांनी नोंदणी केली होती, तरीही त्यांना पैसे मिळालेले नाहीत! गावकरी या योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटी दाखवत असले तरी, योजनेचे निकष पूर्ण करणाऱ्या महिलांना दरमहा पैसे बँक खात्यामध्ये जमा होत असल्याचे दिसते. संभाव्य लाभार्थी महिलांनी अर्ज केलेला नाही वा कागदपत्रांची पूर्तता केली नसल्याचेही आढळले आहे. या योजनेचा लाभ सर्व लाभार्थींना अजून मिळाला नसला तरी, गावा-गावांमध्ये योजनेची माहिती पोहोचल्याचे दिसते.
हेही वाचा – मध्य प्रदेशात काँग्रेसला १३० जागा मिळतील!
महागाई, बेरोजगारी आणि काका-पुतण्याचा गैरव्यवहार (व्यापम घोटाळा) या तीन मुद्द्यांभोवती काँग्रेसचा प्रचार केंद्रित झाला असून त्याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी महिला मतदारांना प्राधान्य देणारी ‘लाडली बहना’ योजना लागू केली. ही योजना मध्य प्रदेशातील आर्थिक मागास कुटुंबांच्या हाती थेट पैसे देते. २१ ते ६० वर्षे वयोगटातील सरकारी लाभ न मिळालेल्या महिलांना दरमहा १२५० रुपये दिले जात आहेत. पंतप्रधान आवास योजनेचा लाभ न मिळालेल्या कुटुंबाना जोडून घेणारी ही योजना आहे. दोनपेक्षा कमी खोल्यांचे घर, कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीपासून वंचित, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी, अशा विविध निकषांमध्ये पात्र ठरणाऱ्या विवाहित, विधवा, परितक्त्यांना ही योजना दरमहा पैसे देते. विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून चाणाक्षपणे शिवराजसिंह सरकारने या योजनेचा प्रचार केला आहे. हातात थेट पैसे आणि योजनेची रक्कमही दुप्पट, असा आशावाद मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी महिला मतदारांमध्ये निर्माण केला आहे. ‘तुमचा भाऊ कशासाठी मुख्यमंत्री झाला आहे? मी मुख्यमंत्री असताना माझ्या बहिणींच्या आयुष्यात काळोख होऊ देणार नाही’, असा प्रचार शिवराज चौहान करत आहेत.