नाशिक: महायुतीत असूनही एकमेकांशी अंतर ठेवून असलेले घटक पक्षांचे नेते, पदाधिकाऱ्यांमुळे जिल्ह्यातील नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघात धुसफूस सुरुच आहे. नाशिक मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे यांना मित्रपक्षांकडून फारसे सहकार्य मिळत नसल्याचे जाणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्वत: मैदानात उतरावे लागले. दुसरीकडे, दिंडोरीत भाजपच्या उमेदवार डाॅ. भारती पवार यांना पक्षांतर्गत नाराजी तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाची संदिग्ध भूमिका यांना तोंड द्यावे लागत आहे.

नांदगावचे शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावर तुतारीसाठी काम करत असल्याचा केलेला आरोप, सिन्नरचे अजित पवार गटाचे आमदार माणिक कोकाटे यांची महायुतीच्या बैठकांना अनुपस्थिती, या घटनांमुळे महायुतीतील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे.

हेही वाचा : राहुल गांधींचे निवडणुकीच्या घोषणेपासून अदाणी-अंबानींवर मौन, पंतप्रधान मोदींच्या या दाव्यात किती सत्य?

महिन्यापेक्षा अधिक काळ मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केल्यानंतर, अयोध्येतील श्रीराम, पंचवटीतील श्री काळाराम, त्र्यंबकेश्वर यांचे दर्शन घेतल्यानंतर उमेदवारी मिळालेले शिंदे गटाचे हेमंत गोडसे यांचा संघर्ष अजूनही कायम आहे. उमेदवारीसाठी पक्षांतंर्गत तसेच महायुतीतील घटक पक्षांशी त्यांना स्पर्धा करावी लागली. तोच संघर्ष उमेदवारीनंतरही त्यांना करावा लागत आहे. उमेदवारी जाहीर होण्याआधी भाजपच्या स्थानिक आमदारांसह पदाधिकाऱ्यांनी गोडसे यांना विरोध केला होता. महापालिकेतील माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी तर उघडपणे गोडसे यांची निष्क्रिय खासदार अशी निर्भत्सना केली असून अजूनही त्यांचे ते मत कायम आहे. दिल्लीहून नाव पुढे आल्यानंतरही उमेदवारीसाठी स्वपक्षाकडूनच विशेष प्रयत्न न झाल्याने नाराज अजित पवार गटाचे छगन भुजबळ, सिन्नरचे आमदार माणिक कोकाटे यांची नाराजी, अशी नाराजवंतांची फौज तयार झाली असताना त्यातच शांतिगिरी महाराज यांच्या अपक्ष उमेदवारीची भर पडल्याने गोडसे यांचा मार्ग खडतर झाला. हे ध्यानात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बुधवारी नाशिक गाठणे भाग पडले. प्रथम शिंदे गटाचा मेळावा घेण्यात आला. नंतर महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीस भुजबळ आणि कोकाटे दोघेही अनुपस्थित राहिले. त्याआधी गोडसे यांनी भुजबळ फार्मवर जाऊन भुजबळ यांच्याशी चर्चा केली होती. गोडसे हे भाजपच्या स्थानिक आमदारांच्या कार्यक्षेत्रात लुडबूड करीत असल्याच्या तक्रारींची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी गोडसे यांनाही फटकारले. शांतिगिरी महाराजांमुळे मतविभाजन होऊ नये, यासाठी त्यांची मनधरणी करण्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

हेही वाचा : ५,७०५ कोटींची संपत्ती, ब्रँडेड गाड्या अन् बरंच काही! कोण आहेत लोकसभेचे सर्वात श्रीमंत उमेदवार?

नाशिक मतदारसंघात ही स्थिती असताना दिंडोरीत कांदाप्रश्नाने आधीच जेरीस आलेल्या डाॅ. भारती पवार यांना महायुतीतील अंतर्गत विरोधालाही तोंड द्यावे लागत आहे. शिंदे गटाचे नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी नांदगाव येथे पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात नाराजी तर आहेच, पण ती व्यक्त करण्याची ही वेळ नसल्याची पुष्टी जोडली होती. त्यानंतर बुधवारी शिंदे गटाच्या कार्यकर्ता मेळाव्यात कांदे यांनी भुजबळ हे युतीधर्म पाळत नसल्याचे टिकास्त्र सोडले. भुजबळ यांचे कार्यकर्ते शरद पवार गटाच्या तुतारीचा प्रचार करीत असून भुजबळ यांनी राजीनामा देवून तुतारी हातात घ्यावी, असे आवाहनही कांदे यांनी केले. भाजपचे पदाधिकारीही त्यांच्या उमेदवाराच्या प्रचारात सक्रिय नसल्याचीही टीका त्यांनी केली. डाॅ. भारती पवार यांच्या कार्यशैलीवर टीका केल्याने याआधीच नाशिक जिल्हा दक्षिण युवा मोर्चाचे अध्यक्ष योगेश बर्डे यांना निलंबित करण्यात आले आहे.