माजी आमदार सुरेश वरपुडकर हे भारतीय जनता पक्षात दाखल झाल्यानंतर रिक्त असलेल्या काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. पक्षात नव्यानेच दाखल झालेले माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांचे नाव अचानकपणे जिल्हाध्यक्षपदासाठी पुढे आले आहे. माजी खासदार तुकाराम रेंगे यांनीही जिल्हाध्यक्ष पदाबाबत इच्छा प्रदर्शित केली असून आता जिल्हाध्यक्षपदी कोणाला संधी द्यायची यावरून पक्षीय पातळीवर जोरदार घडामोडी सुरू आहेत.
दीर्घकाळ काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असलेले सुरेश वरपूडकर भारतीय जनता पक्षात दाखल झाले. त्यानंतर जिल्हाध्यक्षपदासाठी काही नावे चर्चेत आली. बाळासाहेब देशमुख, बाळासाहेब रेंगे अशा अनेक नावांची चर्चा चाललेली होती. दरम्यानच्या काळात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी परभणी जिल्ह्यातील प्रमुख काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक जालना येथे घेतली होती. त्या बैठकीत जिल्हाध्यक्षपदाची चाचपणी करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच अतुल लोंढे हे परभणी जिल्ह्यात निरीक्षक म्हणून आले होते. जिल्हाध्यक्ष पदाबाबत प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भावना त्यांनी जाणून घेतल्या. एकीकडे काँग्रेस पक्षातील काही नावांची या पदासाठी चर्चा सुरू असतानाच बाबाजानी यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश झाला.
काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी बाबाजानी यांनी खासदार इमरान प्रतापगढी, कन्हैया कुमार यांच्याशी चर्चा केली होती. काँग्रेस पक्षातल्या काही राज्यातल्या नेत्यांशीही त्यांचे बोलणे झाले. पक्षाचे जिल्हाध्यक्षपद जर मिळाले तर आपण सर्व क्षमता वापरून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला पहिल्या क्रमांकावर आणू असा शब्द बाबाजानी यांनी या सर्वच नेत्यांना दिला.
एकीकडे जिल्ह्यातले अनेक नेते सत्ताधारी पक्षांमध्ये प्रवेश करत असताना दुसरीकडे काँग्रेससारख्या पक्षात प्रवेश करण्याचा बाबाजानी यांनी घेतलेला निर्णय हा काँग्रेससाठीही महत्त्वाचा मानला गेला. बाबाजानी यांच्या अनुभवी राजकारणाबरोबरच अल्पसंख्य असण्याचा पक्षालाही फायदा होईल त्यामुळे त्यांना जिल्हाध्यक्षपद दिले जावे याबाबत काही नेत्यांनी अनुकूलतही दर्शवली.
पक्षनिरीक्षक म्हणून आलेल्या अतुल लोंढे यांचीही बाबाजानी यांच्यासोबत चर्चा झाली. परभणी हे मुस्लिम बहुल शहर आहे. एकूण नगरसेवकांच्या एक तृतीयांश मुस्लिम नगरसेवक या शहरातून निवडून येतात. परभणी शहर महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून बाबाजानी यांच्याकडे जर पक्षाची सूत्रे आली तर काँग्रेसला त्याचा फायदा होईल असाही युक्तिवाद यानिमित्ताने केला जात आहे.
एकीकडे बाबाजानी यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्यानंतर काँग्रेस पक्षातलेच काही स्थानिक नेते नव्याने सक्रिय झाले. माजी खासदार तुकाराम रेंगे हे काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीत उपाध्यक्षपदावर आहेत. जिल्हाध्यक्ष पदासाठी त्यांनी यापूर्वी इच्छा प्रदर्शित केली नव्हती पण बाबाजानी यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्यानंतर रेंगे यांनी पुन्हा जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छा प्रदर्शित केली आहे.
आपले प्रदेश उपाध्यक्षपद बाबाजानी यांना देण्यात यावे आणि जिल्हाध्यक्षपदावर आपली वर्णी लावण्यात यावी अशी अपेक्षा रेंगे यांनी प्रदेश नेतृत्वाकडे व्यक्त केली आहे. आता बाबाजानी की तुकाराम रेंगे या दोन नावाभोवतीच काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची चर्चा सध्या सुरू आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने लवकर काय तो निर्णय घ्यावा अशी अपेक्षा कार्यकर्ते व्यक्त करू लागले आहेत.