पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणसंग्रामासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे रणांगणात उतरले असून, पुण्यात ‘जनसंवाद’च्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधून रणशिंग फुंकणार आहेत. अजित पवार यांचे पुणे जिल्हा हे कार्यक्षेत्र असून, पालकमंत्री या भूमिकेतून ते जनसंवादातून थेट नागरिकांचे प्रश्न सोडविणार आहेत. या जनसंवादातून राज्यभरातील लाडक्या बहिणींबरोबरच लाडके भाऊ खुश आहेत की नाराज, याचा अंदाज घेणार आहेत. मात्र, पक्षातील इच्छुक शिलेदारांवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रारुप प्रभाग रचनेतून झालेल्या अन्यायाच्या विरोधात तोफ डागणार का, याबाबत उत्सुकता असणार आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने तिसऱ्यांदा मतदारांशी संवाद साधणार आहेत. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून ‘जनसंवाद’ हा उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यातून लोकांचे पक्षाविषयक अभिप्राय जाणून घेण्याबरोबरच जागेवरच तक्रार निवारण करण्यात येणार आहे.
नागरिकांचे गाऱ्हाणे, तक्रारी ऐकल्यानंतर अजित पवार हे तत्काळ समस्या सोडविणार आहेत. या ‘जनसंवादा’ला आजपासून (१३ सप्टेंबर) हडपसर विधानसभा मतदारसंघापासून आरंभ करण्यात येणार आहे. त्यामध्ये पवार हे नागरिकांच्या समस्या ऐकून घेणार असून,स्थानिक प्रशासनातील अधिकारीही उपस्थित असणार आहेत. या उपक्रमातून अजित पवार हे मतदारांशीच संवाद साधत आगामी निवडणुकांचे रणशिंग फुंकणार आहेत.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाले. तसाच प्रतिसाद महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये मिळेल का, याचाही आढावा या ‘जनसंवाद’ उपक्रमातून घेतला जाणार आहेत.
पुण्यात प्रारुप प्रभाग रचना करताना भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांनी अनेक प्रभागांचे तुकडे केले आहेत. त्याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला बसणार आहे. याबाबत मागील आठवड्यात पदाधिकाऱ्यांनी तक्रारी केल्यानंतर अजित पवार यांनी याबाबत भाजपच्या संबंधित पदाधिकाऱ्यांनी संवाद साधून त्यांची कानउघाडणी केली आहे. या ‘जनसंवादा’तून नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्याबरोबरच इच्छुक उमेदवारांचीही चाचपणी करणार आहेत.
पुण्यातील विधानसभा मतदार संघांपैकी हडपसर या एकाच मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला यश मिळाले आहे. त्या मतदार संघातून चेतन तुपे निवडून आले. पक्षाचे या भागात प्राबल्य आहे. मात्र, प्रभाग रचनेत हक्काची मते असलेल्या प्रभागांची रचना बदलण्यात आल्याने इच्छुक उमेदवार नाराज आहेत. त्यांच्याशी संवाद साधून अजित पवार हे आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीचाही अंदाज घेणार आहेत.
समस्या नोंदवण्यासाठी संपर्क क्रमांक
राज्यभरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्याचे निवारण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी ७८८८५६६९०४ हा संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यावर नागरिकांनी संपर्क साधण्यास संबंधित नागरिकांच्या तक्रारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पोहोचणार आहेत. त्यानंतर अजित पवार हे संबंधित नागरिकांच्या समस्या सोडविणार आहेत.