सांगली : लोकसभा निवडणुकीच्या सांगली मतदार संघाच्या जागेवरून ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात सुरू असलेल्या रस्सीखेचामागे कोणत्या तरी अदृष्य शक्तीचा हात असल्याची जोरदार चर्चा मतदार संघात सुरू आहे. कालपरवा म्हणजे निवडणुक जाहीर होण्याअगोदर सांगलीत काँग्रेस आणि भाजप अशी लढत होणारा असा समज राजकीय पक्षांनीच नव्हे तर सामान्य मतदारांनीही केला होता. मात्र, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील वंचित बहुजन आघाडीला वळसा घालून मातोश्रीवर पोहचल्यानंतर सगळेच राजकीय मंचावरचे पत्तेच उलटे सुलटे होउ लागले आहेत. कोणत्याही स्थितीत भाजपला पराभूत करायचेच या जिद्दीने एकत्र आलेल्या महाविकास आघाडीत सांगलीवरून बिघाडी दिसत आहे.

सांगली मतदार संघासाठी भाजपने पहिल्या यादीतच उमेदवार जाहीर करून विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांना तिसर्‍यांदा लोकसभेत जाण्याची संधी दिली आहे. मात्र, स्थानिक राजकारणाचा सूर पाहता भाजप अंतर्गत असलेली नाराजी, प्रस्थापिताविरूध्द असलेला सुप्त सूर आणि वसंतदादा घराण्याची मतदार संघात असलेले स्थायी स्वरूपाचा मतांचा गठ्ठा या जोरावर यावेळी कोणत्याही स्थितीत काँग्रेस बाजी मारेल असे चित्र निर्माण करण्यात काँग्रेस यशस्वी झाली होती. मात्र, अखेरच्या टप्प्यात ठाकरे शिवसेनेने कोल्हापूरची जागा काँग्रेसला देण्याच्या बदल्यात सांगलीवर हक्क सांगत असताना पंधरा दिवसापुर्वी शिवबंधन हाती बांधणार्‍या पैलवान पाटील यांच्या हाती मशाल दिली.

Antule, Raigad, campaign of Raigad,
रायगडाच्या प्रचारात बॅ. अंतुले यांचे वलय आजही कायम
Maratha reservation protest Manoj Jarange Patil Antarwali Sarathi politics
मराठा आरक्षणाचं केंद्रबिंदू असलेल्या अंतरवाली सराटीत ऐन निवडणुकीत शुकशुकाट; मनोज जरांगे दौऱ्यावर
congress still searching candidate in dhule for upcoming lok sabha election
Lok Sabha Election 2024 : धुळ्यात काँग्रेसमध्ये अजून उमेदवाराचा शोध सुरू
chandrapur lok sabha marathi news, vijay wadettiwar supporters joining bjp marathi news
विजय वडेट्टीवार समर्थकांच्या भाजप प्रवेशाने तर्कवितर्क; लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत काँग्रेसला गळती

हेही वाचा : हिंगोलीत शिवसेनेचा नवा चेहरा

प्रारंभीच्या काळात खा. संजय राउत यांनी सांगलीवर हक्क सांगत असताना महाविकास आघाडीची ताकद गृहित धरली. मतदार संघात असलेल्या ५१०गावांमध्ये एकही ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेची सत्ता नाही. ग्रामपंचायत सदस्य असले तरी ती संख्या दुहेरीही होणार नाही. मतदार संघात असलेल्या चार नगरपालिका, चार नगरपंचायतीमध्ये आणि एकमेव असणार्‍या महापालिकेत एकही सदस्य नाही. तरीसुध्दा शिवसेना कोणत्या बळावर सांगलीवर हक्क सांगत आहे हेच कळायला मार्ग नाही. तरीही सेनेचे नेते सांगलीसाठी आग्रह कायम धरत आहेत.एवढेच नव्हे तर मातोश्रीवरून पैलवानांना दिलेला शब्द कदापि मागे घेतला जाणार नाही असे सांगत मिरजेतील जनसंवाद मेळाव्यात पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी पैलवानांच्या उमेदवारीची घोषणाही केली. या मेळाव्यावर काँग्रेसने बहिष्कार तर टाकला होताच, पण राष्ट्रवादीचे बडे नेते या मेळाव्याकडे फिरकले नाहीत. जी गर्दी जमली होती ती शिवसेनेचीच होती असे ठामपणे म्हणता येणार नाही.

हेही वाचा : सांगलीत दादा घराण्याच्या अस्तित्वाचा लढा

सांगलीच्या जागेचा वाद अखेरच्या टप्प्यात निर्माण झाला आहे. प्रारंभीच्या काळात काँग्रेसने हा अन्य जागेसाठी दबावाचा भाग असेल अशी समजूत करून दुर्लक्ष केले. मात्र, आता काँग्रेसलाच निवडण्ाुक मैदानात उतरण्यासाठी प्रतिबंध करण्याचा राजकीय डावच असल्याचा दृढ समज होत आहे. यामागे आघाडीतीलच एक नेता कारणीभूत असल्याचे उघडपणे सांगितले जात आहे. यामुळेच हा वाद टोकाला पोहचला आहे. यदाकदाचित काँग्रेस आणि ठाकरे शिवसेनेत तडजोड झालीच तर एकोपा मतदारांना दिसणार आहे का? दिसलाच तर महाविकास आघाडी एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाईल याची गॅरंटी मिळेल का? मैत्रीपूर्ण लढतीची काँग्रेसने तयारी केली आहे. अशावेळी आघाडी धर्म म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार हा पक्ष पाळणार असे जर सांगितले तर तो काँग्रेससाठी नुकसानदायी होईल. ठाकरे शिवसेनेसाठी ही मंडळी काम करतील का असे विविध प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. जसजसा निवडणुकीचा रंग चढू लागेल तसतशा ही अदृष्य शक्ती आपले प्रताप दाखविल्याविना राहणार नाही. महाविकास आघाडीतील गोंधळाचा फायदा घेण्यास मात्र भाजप उताविळ नसेल तरच नवल.