सातारा : माझ्याकडे चाळीस आमदार आहेत आणि तसेच अन्य तीस जागांसाठी आमच्याकडे चांगले उमेदवार आहेत. यामुळे साहजिकच एवढ्या जागा लढवण्यासाठी त्यांच्याकडे पोकळी तयार झालेली आहे. यामुळे ही पोकळी भरून काढण्यासाठी मिळेल त्या मार्गाने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्याकडे दिसणारे इच्छुक हे यातूनच आहेत. परंतु आमचे उमेदवार हे गेली अनेक वर्षे त्यांच्या मतदारसंघात काम करत आहेत. त्यांचे कामासोबतच कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे, यामुळे ‘पलीकडे’ होणाऱ्या पक्षप्रवेशाची चिंता करू नका, अशा शब्दांत राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी नाव न घेता राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षावर टीका केली.

जनसन्मान यात्रेनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार साताऱ्याच्या दौऱ्यावर आले आहेत. याअंतर्गत वाई येथील सभा संपल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आमदार मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा: भूतकाळाच्या चष्म्यातून…बेशिस्तीचे वळणावर ‘शिस्तबद्ध’ पक्ष

पवार म्हणाले, की आपल्या पक्षाचे विद्यामान आमदार आणि नवीन जागा निवडून आणणे मला अवघड नाही. कोणीही कोणतेही भावनिक आवाहन केले तरी असे भावनिक आवाहन आता चालणार नाही. लोकांना माझ्या कामाची पद्धत माहिती आहे. समाजामध्ये गैरसमज पसरवून माझ्या विरोधात वातावरण यापुढे करता येणार नाही. ज्यांच्याकडे विधानसभेसाठी जागांची पोकळी तयार झाली आहे, ही पोकळी भरून काढण्यासाठी मिळेल त्या मार्गाने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे माझ्यावर टीका करून माझ्या पक्षासह इतर अनेकांशी संपर्क साधून पक्षात येण्याचे आवाहन केले जात आहे.

यासाठी सगळी पळापळ आणि खटाटोप सुरू आहे. यापेक्षा दुसरे काही नाही. राज्यात महायुतीचेच सरकार मोठ्या मताधिक्याने निवडून येईल याबाबत मला पूर्ण खात्री आहे.

हेही वाचा: जम्मू-काश्मीर, हरियाणात आज मतमोजणी, दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होण्याची अपेक्षा

विरोधकांच्या आरोप प्रत्यारोपाकडे लक्ष द्यायला आमच्याकडे वेळ नाही, आम्ही आमची भूमिका मांडत राहू. आमची भूमिका ही सुसंकृत महाराष्ट्रात राजकीय लोकांनी कसं वागलं पाहिजे ही आहे. मी बोलताना चुकलो त्यावेळी मी प्रायश्चित्त घेतले होते. त्यामुळे मी विरोधकांच्या अयोग्य टीका, आरोपांना उत्तर देत नाही, असेही पवार म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रामराजेंसोबत उद्या चर्चा

दरम्यान रामराजे निंबाळकर यांच्या पक्ष सोडण्याच्या चर्चेबद्दल विचारले असता अजित पवार म्हणाले, की रामराजे दुसरीकडे (शरद पवारांकडे) जातील असे वाटत नाही, तरीही मी त्यांच्याशी बोलणार आहे. त्यांच्याशी संपर्क झाला असून उद्या त्यांची माझी मुंबईत भेट होणार आहे.