अलिबाग- श्रीवर्धन मतदारसंघात इंडीया आघाडीची सभा घेऊन सुनील तटकरेंची कोंडी करण्याची खेळी शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी आखली होती. पण शरद पवारांसह, उध्दव ठाकरे आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या भाषणात सुनील तटकरेंचा उल्लेखही टाळला. राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीनंतर पक्षाध्यक्ष शरद पवार पहिल्यांदाच रायगड जिल्ह्यात आले होते. त्यामुळे ते काय बोलणार याची उत्सुकता सर्वपक्षीयांना होती. खासकरून सुनील तटकरे आणि आदिती तटकरे यांच्या श्रीवर्धन मतदारसंघात ही सभा होत असल्याने, शरद पवार यांच्या भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष होते. पण शरद पवार यांनी आपल्या भाषणात सुनील तटकरे आणि अदिती तटकरे यांच्याबद्दल एकही शब्द काढला नाही. दोघांनाही अनुल्लेखाने टाळले. त्यामुळे उपस्थितांचा आणि आयोजकांचा पुरता हिरमोड झाला.

रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या श्रीवर्धन येथील शाखेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनानिमित्ताने इंडिया आघाडीचे नेते, शेकाप सरचिटणीस आणि बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील एकाच व्यासपीठावर होते. कार्यक्रम सहकाराशी निगडीत असला तरी, राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीमुळे त्याला राजकीय स्वरूप प्राप्त झाले होते. इंडिया आघाडीची रायगडातील पहिली सभा असे स्वरूपही त्याला देण्यात आले होते.

Shinde Group Leader Criticized Uddhav Thackeray
“उद्धव ठाकरे काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले, सोनिया गांधींचे…”, शिंदे गटातल्या नेत्याची घणाघाती टीका
Devendra Fadnavis always telling lies Criticism of Sushilkumar Shinde
रेटून खोटे बोलण्याचे फडणवीसांवर संस्कार; सुशीलकुमार शिंदे यांचा टोला
shrikant shinde on devendra fadnavis
“देवेंद्र फडणवीसांनी माझ्या नावाची घोषणा केली असली तरी…” कल्याणच्या उमेदवारीवरून श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया
BJP leader conspiracy behind Arvind Kejriwal arrest
केजरीवालांच्या अटकेमागे भाजप नेत्याचे कारस्थान! संजय सिंह यांचा आरोप

हेही वाचा – तेलंगणा : काँग्रेसकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, माजी क्रिकेटपटू अझरुद्दीन यांना तिकीट!

विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाच्या उमेदवारांच्या पराभवानंतर शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील संबंध विकोपाला गेले होते. निवडणुकीत शेकापच्या पराभवाला सुनील तटकरे कारणीभूत असल्याचा दावा शेकापकडून केला जात होता. त्यामुळे या पराभवाचा बदला घेणार असल्याचे शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी पक्षाच्या वर्धापनदिनी जाहीर केले होते. याच भूमिकेतून तटकरेंचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीवर्धन मतदारसंघात इंडिया आघाडीच्या नेत्यांना त्यांनी एकत्र आणले होते. तटकरेंची त्यांच्याच बालेकिल्ल्यात कोंडी करावी हा त्यामागचा उद्देश होता. पण शरद पवारांनी आपल्या भाषणात सुनील तटकरेंबद्दल एकही शब्द काढला नाही. समविचारी पक्षांनी देशहीतासाठी एकत्र यायला हवे अशी भूमिका मांडत आपले भाषण आटोपतं घेतले. उद्धव ठाकरे यांनीही सुनील तटकरे यांचा जाहीर उल्लेख टाळला. कोणाचेही नाव न घेता गद्दारांना टकमक टोक दाखवा म्हणत आपल्या मनोगताचा समारोप केला. पृथ्वीराज चव्हाण यांनीही महत्त्वाच्या राजकीय लढाईसाठी, नवी समीकरणे तयार होत आहेत. विरोधी पक्ष मनाने एकत्र आले असल्याचे सांगत आपले भाषण आटोपते घेतले.

हेही वाचा – मध्य प्रदेशमध्ये भाजपला ‘लाडली बहना’ योजनेचा आधार!

शेकाप सरचिटणीस, जयंत पाटील अपवाद सोडला तर तिनही प्रमुख वक्त्यांनी तटकरेंचा उल्लेख टाळला. त्यामुळे या सभेच्या निमित्ताने तटकरेंवर निशाणा साधण्याचे शेकापचे मनसुबे यशस्वी होऊ शकले नाहीत. उलट सभेच्या पूर्वार्धात प्रेक्षकांची संख्या अत्यल्प असल्याने आयोजकांची कोंडी झाल्याचे पहायला मिळाले. शेवटी ही इंडिया आघाडीची सभा नाही बँकेचा कार्यक्रम आहे, इंडिया आघाडीची सभा रोह्यात होणार असल्याचे जयंत पाटील यांनी जाहीर केले.