मुंबई : उद्धव ठाकरे गटातील १४ आमदारांवर अपात्रतेची कारवाई तूर्तास टाळण्यामागे भाजप-शिंदे गटाची राजकीय खेळी आहे. या आमदारांना अपात्र ठरविल्यास त्यांना जनतेची सहानुभूती मिळेल आणि मेहेरनजर दाखविल्याने त्यापैकी काही आमदार आपल्या गटाकडे वळविण्यात यश मिळू शकेल, असा दुहेरी हेतू यामागे असल्याचे सूत्रांनी ‘ लोकसत्ता ‘ ला सांगितले.

विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी अपेक्षेप्रमाणे निकाल देत ठाकरे गटाच्या याचिका फेटाळल्या आणि शिंदे गट हाच खरा शिवसेना पक्ष असल्याचा निर्वाळा दिला. मात्र ठाकरे गटातील आमदारांवर अपात्रतेची कारवाई टाळण्यात आली आहे. शिवसेना फुटली, तेव्हा जनतेमध्ये दीर्घ काळ ठाकरे गटासाठी सहानुभूतीची लाट होती. आताही त्यांचे आमदार अपात्र ठरले असते, तर पुन्हा सहानुभूती मिळाली असती व त्याचा फटका आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजप-शिंदे गटाला बसण्याची भीती होती. त्यामुळे सरकारवरील विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने बजावण्यात आलेले पक्षादेश ( व्हीप) योग्यप्रकारे बजावले गेले नाहीत, त्यांना ते मिळाले नाहीत, अशी तकलादू कारणे देत नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या याचिका फेटाळल्या.

हेही वाचा : काँग्रेस आणि विरोधकांच्या यशापयशाची मालिका खंडित होणार का ?

या याचिकांवर स्वत: अभ्यास, संशोधन करून व माहिती गोळा करून अध्यक्षांनी निर्णय देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. आमदाराला अपात्र ठरविण्यासाठी केवळ विधिमंडळातील मतदानासाठी पक्षादेश पाळला नाही, एवढा एकच निकष नाही. आमदाराचे वर्तन, कृती, सार्वजनिक व्यासपीठावर भूमिका, पक्षविरोधी कारवाई किंवा कृती आदी कारणांसाठीही त्यांना अपात्र ठरविण्याची तरतूद आहे. त्यांचे असे वर्तन म्हणजे पक्षाचे सदस्यत्व स्वत:हून सोडल्यासारखे असल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आहेत.

हेही वाचा : भाजप अन् RSSच्या राम मंदिर उद्घाटन कार्यक्रमाला जाण्यास काँग्रेसचा नकार; ममता अन् मायावतींची भूमिका काय?

शिंदे गट हीच खरी शिवसेना व मुख्य मंत्री शिंदे हे पक्षाचे प्रमुख नेते असल्याचा निर्वाळा केंद्रीय निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी दिला आहे. शिंदे यांनी भाजपबरोबर सत्ता स्थापन केली आहे. या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरेंसह सर्व आमदारांनी शिंदेंविरोधात गेली दीड वर्षे सातत्याने टीका केली आहे, खोके सरकार म्हणून हिणवले आहे, विधानसभेतही ठाकरे गटातील आमदार सत्ताधारी बाकांवर नव्हे, तर विरोधी बाकांवर बसतात, सरकारविरोधात सभागृहात भाषणे करतात, ही कृती किंवा वर्तन त्यांना पक्षविरोधी भूमिका किंवा कारवायांसाठी अपात्र ठरविण्यासाठी पुरेसे आहे. पण शिंदे गटाने त्यांना अपात्र ठरविण्यासाठी शिंदे गटाने या मुद्द्यांवर सुनावणीत भर दिला नाही आणि अध्यक्षांनीही स्वत:हून ते विचारात घेतले नाहीत.

हेही वाचा : शिंदे यांच्या बाजूने निकाल लागल्याने अजित पवार गट निश्चिंत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाकरे व शिंदे गटातील आमदारांमध्ये एकमेकांबद्दल दीड वर्षांपूर्वी जो द्वेष किंवा राग होता, तो आता कमी झाला असून ते हास्यविनोदातही सहभागी होतात. त्यामुळे स्नेहसंबंध ठेवून आणि अपात्र न ठरविता ठाकरे गटातील आमदारांना आपल्या गटाकडे ओढण्याची धूर्त राजकीय खेळी खेळण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले.