Jagdeep Dhankhar Resignation Reason : संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू असताना उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सोमवारी संध्याकाळी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला. प्रकृतीच्या कारणास्तव आपण राजीनामा देत असल्याचं त्यांनी सांगितलं. धनखड यांच्या अनपेक्षित निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. काँग्रेससह विविध पक्षांच्या नेत्यांनी या निर्णयावर आश्चर्य व्यक्त करीत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. या राजीनाम्याच्या मागे काहीतरी अधिक गंभीर कारण असावं, जे सहजपणे लक्षात येत नाही, असं काँग्रेसनं त्यांच्या एक्स अकाउंटवरून शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, सोमवारी दुपारी अधिवेशन सुरू असताना सभागृहात नेमकं काय घडलं? उपराष्ट्रपतींनी तडकाफडकी राजीनामा का दिला? काँग्रेसच्या खासदारांनी त्यासंदर्भात काय म्हटलं? याबाबत सविस्तर जाणून घेऊ…
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश म्हणाले, “उपराष्ट्रपती व राज्यसभा अध्यक्ष म्हणून जगदीप धनखड यांचा अचानक दिलेला राजीनामा अत्यंत धक्कादायक आणि समजण्यापलीकडचा आहे. सोमवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मी आणि माझे इतर सहकारी त्यांच्याबरोबर होतो. त्यानंतर रात्री ७:३० वाजता माझे त्यांच्याशी फोनवरून संभाषणही झाले. त्यांनी आरोग्याला दिलेलं प्राधान्य नक्कीच महत्त्वाचं आहे; पण त्यांच्या या अनपेक्षित निर्णयामागे काहीतरी गंभीर गोष्ट आहे. तरीही सध्या अंदाज बांधण्याची ही वेळ नाही.”
धनखड यांनी राजीनामा मागे घ्यावा : जयराम रमेश
जयराम रमेश पुढे म्हणाले, “मंगळवारी दुपारी १ वाजता जगदीप धनखड यांनी बिझनेस अॅडव्हायझरी कमिटीची बैठक बोलावली होती. तसेच न्यायव्यवस्थेशी संबंधित काही मोठ्या घोषणा करण्याचंही त्यांच्या बाजूने ठरलेलं होतं. आम्ही धनखड यांना उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा देतो; पण त्यांना निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती करतो. पंतप्रधानांनीही त्यांना आपला निर्णय बदलायला प्रवृत्त करावं, अशी अपेक्षा आहे. देशाच्या हितासाठी ही आवश्यक बाब आहे. जगदीप धनखड यांनी राजीनामा मागे घेतल्यास शेतकरी समुदाय यामुळे खूपच सुटकेचा श्वास टाकेल.”
आणखी वाचा : पाकिस्तानमधून आलेल्या २० हजार कुटुंबांना जमिनीचा मालकी हक्क मिळणार; भाजपानं असा निर्णय का घेतला?
उपराष्ट्रपतींचा राजीनामा राजकीय दबावामुळे : काँग्रेसचा आरोप
काँग्रेसचे खासदार इमरान मसूद म्हणाले, “एकाच तासात असं काय झालं की, उपराष्ट्रपतींना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला? आम्ही त्यांच्या दीर्घ व निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करतो, पण त्यांनी अचानक असा निर्णय का घेतला हा समजण्यापलीकडचा मुद्दा आहे.” काँग्रेसचेच दुसरे खासदार सुखदेव भगत म्हणाले, “राजकारणात दोन अधिक दोन नेहमी चारच होत नाहीत. सगळं काही सरळ नसतं आणि काही ना काही कारणं असतात. मला वाटतं की, धनखड यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव होता आणि सर्वकाही नियोजनानुसार ठरवण्यात आलं होतं.”
खासदार म्हणतात, धनखड यांच्या राजीनाम्याचं कारण खरं नाही
समाजवादी पक्षाचे राज्यसभा खासदार जावेद अली खान म्हणाले, “मी उपराष्ट्रपतींना आज सभागृहात पाहिलं, ते पूर्णपणे ठणठणीत वाटत होते. आज त्यांच्या आरोग्यावरून त्यांंना काहीही त्रास होत असल्यासारखं दिसलं नाही; पण जर काही असलं तर आम्ही त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करतो. लवकरच सगळं स्पष्ट होईल.” आरजेडीचे खासदार सुधाकर सिंह म्हणाले, “धनखड साहेब आज राज्यसभेचं कामकाज पाहताना पूर्णपणे स्वस्थ दिसत होते, त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यामागचं कारण खरं वाटत नाही. भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारमध्ये सध्या एक घटनात्मक पेच निर्माण झाला असावा. मला हा राजकीय ताण वाटतो आणि खरी गोष्ट मंगळवारीच समोर येईल. जगदीप धनखड हे खरोखरच आजारी असतील तर आम्ही त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करतो.”

धनखड यांच्या राजीनाम्यावर कपिल सिब्बल काय म्हणाले?
राज्यसभा खासदार कपिल सिब्बल म्हणाले, “मी जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याच्या कारणांवर तर्क लावू इच्छित नाही. त्यांनी स्वतः आरोग्याचं कारण दिलं आहे, त्यामुळे मी त्यावर काही बोलणार नाही. मात्र, एवढं नक्की सांगू शकतो की, गेल्या काही वर्षांतील सर्वात सक्रिय राज्यसभा अध्यक्षांपैकी धनखड एक होते. ते नेहमीच दोन्ही बाजूच्या खासदारांना एकत्र काम करण्यासाठी प्रोत्साहित करायचे.” शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते आनंद दुबे म्हणाले, “आरोग्याच्या कारणाने उपराष्ट्रपतींनी राजीनामा दिल्याची बातमी चिंताजनक आहे. आम्ही त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो. मात्र, एक प्रश्न उभा राहतो — आज संसदेत मान्सून अधिवेशनाचा पहिला दिवस होता आणि त्याच दिवशी उपराष्ट्रपतींनी राजीनामा दिला. सरकारमध्ये नेमकं सुरू काय आहे? हा निर्णय कुठलीही सल्लामसलत किंवा चर्चा न करता घेण्यात आला आहे. जर धनखड यांना खरंच आरोग्याचा त्रास असता, तर त्यांनी अधिवेशनाच्या काही दिवस आधी किंवा नंतर राजीनामा दिला असता.”
हेही वाचा : सीआयडीच्या आरोपपत्रात माजी मुख्यमंत्र्यांचा ‘लाचखोर’ असा उल्लेख; नेमकं काय आहे प्रकरण?
जगदीप धनखड यांच्यावर विरोधकांनी काय आरोप केले होते?
दरम्यान, जगदीप धनखड यांच्याशी विरोधकांचं पूर्वीपासूनच पटत नव्हतं. त्यांनी राज्यसभा अध्यक्ष म्हणून घेतलेल्या भूमिकेवर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. इतकंच नाही तर डिसेंबर २०२३ मध्ये विरोधी पक्षांनी धनखड यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप करीत त्यांच्या विरोधात राज्यसभेत अविश्वासदर्शक ठराव आणण्याचा निर्णय घेतला होता. घटनात्मक पदावर असूनही धनखड हे भाजपा सरकारचे प्रवक्ते झाले आहेत, असं इंडिया आघाडीच्या नेत्यांनी ठरावात म्हटलं होतं. धनखड यांची सभागृहातील वागणूक पक्षपाती असून ते राज्यसभेचे कामकाज एकतर्फी पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न करीत आहेत. विरोधी पक्षातील खासदारांचा ते सभागृहात अपमान करतात व सरकारच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांवर टीका करतात, असंही ठरावात नमूद करण्यात आलं होतं.