आगामी काही महिन्यांत तेलंगणाच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. निवडणुकीची घोषणा होण्याआधीच भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) सर्वेसर्वा के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी आपल्या ११५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या निवडणुकीत ते स्वत: दोन मतदारसंघांतून उभे राहणार आहेत. दरम्यान, निवडणुकीची घोषणा होण्याआधीच केसीआर यांनी आपल्या उमेदवारांची घोषणा केल्यामुळे भाजपाने त्यांच्यावर टीका केली आहे. केसीआर हे भेदरले आहेत, त्यांना असुरक्षित वाटत आहे, असे भाजपाच्या नेत्याने म्हटले आहे.
“यादीत २० नवी नावे असतील असे वाटले होते, पण…”
ज्या आमदारांवर भ्रष्टाचाराचा आरोप आहे, त्यांना आगामी निवडणुकीत तिकीट देणार नाही, असे केसीआर म्हणाल्याचा दावा भाजपाचे नेते तरुण चुग यांनी केला. हाच मुद्दा घेऊन चुग यांनी केसीआर यांच्यावर टीका केली. “साधारण २० आमदार हे दलित बंधू योजनेत ३० टक्के कमिशन घेत आहेत असे मला समजले आहे, असे केसीआर या बैठकीत म्हणाले होते. केसीआर यांच्या या विधानानंतर विधानसभा निवडणुकीसाठी घोषित करण्यात आलेल्या यादीत कमीत कमी २० नवी नावे असतील असे आम्हाला वाटले होते. मात्र, तसे झाले नाही. म्हणजेच भ्रष्टाचार करणाऱ्या आमदारांना केसीआर यांनी संरक्षण दिले आहे,” अशी टीका चुग यांनी केली.
“बीआरएस पक्षात सध्या चिंतेचे वातावरण”
केंद्रीय मंत्री तथा तेलंगणाचे भाजपा प्रदेशाध्यक्ष किशन रेड्डी यांनीदेखील केसीआर यांच्यावर सडकून टीका केली. केसीआर यांनी ११५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यातील काही आमदार भ्रष्ट असल्याचे विधान त्यांनीच यापूर्वी केले होते. केसीआर हे सध्या दोन जागांवर निवडणूक लढवणार आहेत. यावरून बीआरएस पक्षात सध्या चिंतेचे वातावरण निर्माण झाल्याचे स्पष्ट होते, असे किशन रेड्डी म्हणाले.
अमित शाह २७ ऑगस्ट रोजी तेलंगणा दौऱ्यावर
भाजपाच्या आगामी राजकारणाबद्दलही रेड्डी यांनी सविस्तर सांगितले. योग्य वेळी आम्ही भाजपाच्या उमेदवारांची यादी जाहीर करू, असे रेड्डी म्हणाले आहेत. मात्र, कर्नाटक राज्यात झालेल्या पराभवाचा फटका भाजपाला तेलंगणा या राज्यातही बसला आहे. त्यामुळे आगामी रणनीतीसंदर्भात केंद्रातून सूचना मिळण्याची रेड्डी वाट पाहात आहेत. येत्या २७ ऑगस्ट रोजी भाजपाचे नेते अमित शाह तेलंगणाचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात भाजपाचे उमेदवार आणि आगामी रणनीती यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. भाजपाने संजय कुमार यांना हटवून रेड्डी यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवलेली आहे. हा निर्णय काही दिवसांपूर्वीच घेण्यात आलेला आहे.
“केसीआर यांना ऑस्कर पुरस्कार द्यायला हवा”
आगामी निवडणूक जिंकण्यासाठी सर्व ११९ मतदारसंघांत बैठका, रोड शो, पदयात्रा कशा आणि कधी आयोजित करायच्या? याचा रोडमॅप आम्ही तयार केला आहे, अशी माहिती रेड्डी यांनी दिली. “लोकांच्या मनात केसीआर सरकारविषयी प्रचंड राग आहे. लोक भ्रष्टाचाराला कंटाळले आहेत. केसीआर हे स्वत:च भ्रष्ट आहेत. भ्रष्टाचाराच्या नवनवीन कल्पना शोधून काढल्यामुळे त्यांना ऑस्कर पुरस्कार द्यायला हवा,” अशा शब्दांत रेड्डी यांनी केसीआर यांचा समाचार घेतला.
“बीआरएस पक्ष दांभिक”
“बीआरएस हा पक्ष फक्त भ्रष्ट नसून दांभिक आणि खोटारडा आहे. काही दिवसांपूर्वी केसीआर यांची कन्या के. कविता यांनी दिल्लीमध्ये आंदोलन केले. या आंदोलनाच्या माध्यमातून त्या महिलांना लोकसभा आणि राज्यसभेत ३० टक्के आरक्षण मागत होत्या. बीआरएस पक्ष याचे पालन करेल असे आम्हाला वाटले होते; मात्र या पक्षाने जाहीर केलेल्या ११५ उमेदवारांच्या यादीत फक्त चार महिला आहेत. यातून बीआरएसची दांभिक वृत्ती स्पष्ट होते,” असेही रेड्डी म्हणाले.
“केसीआर लोकांचा वापर करून घेतात”
बीआरएस पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत केसीआर यांचा संधीसाधूपणा उघड होतो, असा आरोप चुग यांनी केला. “मोनुगोडी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत केसीआर यांनी सीपीआय आणि सीपीएम पक्षांशी मैत्री केली. कारण त्या मतदारसंघात या दोन्ही पक्षांचे प्राबल्य होते. सहा महिन्यांनंतर केसीआर यांनी या दोन्ही पक्षांची साथ सोडली. केसीआर हे स्वत:च्या फायद्यासाठी लोकांचा वापर करून घेतात, काम संपताच ते अशा लोकांना सोडून देतात. वेगळ्या तेलंगणाची मागणी करतानादेखील केसीआर यांनी हेच केले. त्यांनी विद्यार्थी, शासकीय कर्मचारी यांचा या आंदोलनासाठी वापर केला. मात्र, तेलंगणा स्वतंत्र राज्य म्हणून अस्तित्वात आल्यानंतर त्यांनी या सर्वांनाच धोका दिला. तेलंगणातील लोकांना केसीआर यांची ही दांभिक वृत्ती माहीत झाली आहे,” असेही चुग म्हणाले.