अभिनेत्री कंगना रणौत तिच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी एरव्ही चर्चेत असायची. मात्र, आता भारतीय जनता पार्टीने तिला हिमाचलमधील मंडी जागेवरून लोकसभेची उमेदवारी दिल्याने राजकीय आखाड्यामध्येही आता ती चर्चेत आहे. या जागेवरून तिला उमेदवारी देण्यात आल्याने एरव्ही अत्यंत दुर्लक्षित वाटणाऱ्या या जागेलाही विशेष महत्त्व आले आहे. सध्या हिमाचल प्रदेशच्या राजकारणातही उलथापालथ घडत असून, मरगळ आलेल्या आणि निराश झालेल्या काँग्रेसमध्येही काही महत्त्वाच्या घडामोडी घडताना दिसत आहेत.

या जागेवरून काँग्रेसने कंगना रणौतच्या विरोधात विक्रमादित्य सिंह यांना उमेदवारी दिली आहे. विक्रमादित्य सिंह हे हिमाचल प्रदेशचे तब्बल सहा वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या दिवंगत वीरभद्र सिंह आणि विद्यमान खासदार प्रतिभा सिंह यांचे सुपुत्र आहेत. हे कुटुंब बुशहर राजघराण्याचे वंशज आहे.

कंगनाच्या उमेदवारीमुळे काँग्रेसमध्ये तीव्र हालचाली

कंगनाची उमेदवारी जाहीर होण्याआधी हिमाचल प्रदेश काँग्रेसमध्ये बरेच वाद सुरू होते. मंडीच्या विद्यमान खासदार प्रतिभा सिंह यांनी २०२४ ची लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याची घोषणा केली होती. राज्यातील वातावरण काँग्रेसला अनुकूल नसून, मंडीतील कार्यकर्त्यांमध्ये काँग्रेसला जिंकून आणण्याचा आत्मविश्वास नाही, असेही त्या म्हणाल्या होत्या. पण, मंडीमध्ये कंगनाची उमेदवारी जाहीर होताच प्रतिभा सिंह यांचा सूर बदलला. सरतेशेवटी या जागेवरून त्यांच्या मुलाला तिकीट देण्यात आले. त्यानंतर या जागेकडे आता सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. ही जागा भाजपा सहज जिंकेल, असे वातावरण असतानाच आता इथे अटीतटीचा सामना होणार असल्याची चर्चा रंगली आहे. हिमाचल हे तुलनेने लहान राज्य आहे. तिथून लोकसभेवर फक्त चार खासदार पाठविले जातात. त्यामुळे मंडीमध्ये कोण खासदार होईल आणि त्यावरून देशाच्या राजकारणावर खरेच काही मोठा परिणाम होईल का, हा प्रश्नही महत्त्वाचा ठरतो. मात्र, इथून कंगना रणौतसारखी मोठी बॉलीवूड अभिनेत्री आणि राजघराण्याचा वारस यांच्यात लढत होणार असल्याने ही एक ‘हाय प्रोफाईल’ निवडणूक मानली जात आहे.

हेही वाचा : उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच प्रचार सुरू, तीन टर्म खासदार राहिलेल्या हरसिमरत कौर बादल यांना लोकसभेचे तिकीट मिळणार का?

हिमाचलमध्ये २०२२ मध्ये काँग्रेसने कसे वाचवले होते आपले सरकार?

डिसेंबर २०२२ मध्ये हिमाचलमध्ये विधानसभेची निवडणूक पार पडली होती. भाजपाने आपली सगळी शक्ती पणाला लावूनही या ठिकाणी काँग्रेसचा विजय झाला. भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे हे होम ग्राऊंड आहे. या विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकांना भावनिक आवाहन केले होते. ते म्हणाले होते की, मी या राज्याशी जोडला गेलेला होतो. त्यामुळे भाजपाला मत देणे म्हणजेच मला मत दिल्यासारखे आहे.

भाजपामधील बंडाळी काँग्रेसच्या पथ्यावर

मात्र, स्थानिक नेत्यांनी केलेल्या बंडाळीमुळे भाजपाला इथे पराभवाची नामुष्की पत्करावी लागली. ही बंडाळी रोखण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी प्रयत्न करूनही त्यांना फार काही यश आले नाही. भाजपा हा पक्ष त्याच्या शिस्तीसाठी ओळखला जातो. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यापासून पहिल्यांदाच अशा प्रकारची पक्षाच्या विरोधात जाणारी कृती पाहायला मिळाली होती. हिमाचलमधील ६८ जागांपैकी २१ जागांवर पक्षातील बंडखोरांनी ‘अपक्ष’ म्हणून निवडणूक लढवली. स्वत: नरेंद्र मोदी आणि भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीही त्यातील काही जणांना फोन करून समजूत काढण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले जाते. मात्र, त्याचा फारसा उपयोग झाला नाही. त्यामुळे काँग्रेसला ४० जागांवर यश मिळाले.

अंतर्गत राजकारणामुळे काँग्रेसने गमावली राज्यसभेची जागा

मात्र, फेब्रुवारीमध्ये झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला फटका बसला. भाजपाने सत्ताधारी काँग्रेस पक्षातील अनेक नेत्यांना आपल्या पक्षात घेतले. त्यामुळे अभिषेक मनू सिंघवी यांच्यासारख्या दिग्गज काँग्रेस नेत्याला राज्यसभा निवडणुकीमध्ये पराभव पत्करावा लागला. काँग्रेसच्या सहा आमदारांनी भाजपाचे उमेदवार हर्ष महाजन यांना आपली मते दिली. हे हर्ष महाजनदेखील आधी काँग्रेसमध्येच होते. अभिषेक मनू सिंघवी यांच्या या पराभवामध्ये दिवंगत वीरभद्र सिंह यांच्या पत्नी प्रतिभा सिंह व मुलगा विक्रमादित्य यांची भूमिका महत्त्वाची होती. कारण, हर्ष महाजन हे वीरभद्र सिंह यांचे निष्ठावान मानले जातात. त्यानंतर प्रतिभा सिंह आणि विक्रमादित्य सिंह यांनीही बंड करण्याची भाषा बोलून दाखवली. त्यामुळे काँग्रेस सरकार पडेल की काय, अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र, वरिष्ठ पातळीवर केल्या गेलेल्या हालचालींमुळे सरकार शाबूत राहिले.

सोनिया गांधींच्या डावपेचांमुळे ‘मंडी’च्या निवडणुकीत चुरस

या सगळ्या प्रकरणामध्ये सोनिया गांधी यांनी स्वत:हून हस्तक्षेप केला. त्यांनी प्रतिभा सिंह यांच्यासोबत दोन खासगी बैठका घेतल्या, असे सांगितले जाते. पक्षाने स्वत:कडे पडती बाजू घेत मंडी लोकसभेची जागा त्यांच्या मुलाला देण्याचे कबूल केले. सोनिया गांधी यांनी अचानक केलेल्या या खेळीमुळे भाजपालाही आश्चर्याचा धक्का बसला आणि मंडी लोकसभेची निवडणूक अधिक चुरशीची झाली.

या जागेच्या निकालाला इतके महत्त्व का?

भाजपा अशा आविर्भावात होते की, मंडी लोकसभेची निवडणूक आपल्याला सहजपणे जिंकता येईल. कंगना रणौतची स्वत:ची असलेली लोकप्रियता आणि वीरभद्र सिंह यांच्या कुटुंबाचा पाठिंबा मिळण्याची शक्यता ही दोन कारणे त्यांच्या आत्मविश्वासामागे होती. मात्र, आता स्वत: वीरभद्र सिंह यांचा मुलगाच तिच्याविरोधात या जागेवरून उभा आहे. त्यामुळे कंगना रणौतला तिच्या स्वत:च्या जोरावर आणि नरेंद्र मोदींच्या नावावर ही निवडणूक लढवावी लागणार आहे.

हेही वाचा : काँग्रेससारखे डावे पक्ष अल्पसंख्याकांचे संरक्षण करू शकत नाहीत, केरळच्या IUML प्रमुखांना विश्वास

कंगनाच्या उमेदवारीला भाजपा नेत्यांचाच विरोध

दुसरीकडे कंगनाला मिळालेली उमेदवारीही तिला सहजगत्या मिळालेली नाही. तिच्या उमेदवारीच्या पुनर्विचाराची मागणी हिमाचल प्रदेश भाजपातीलच अनेक नेते करीत आहेत. पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष महेश्वर सिंह यांनी तिच्या उमेदवारीवरून नाराजी व्यक्त करीत पुनर्विचार करण्याची मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. त्यांच्यामागे मंडी मतदारसंघाचा भाग असलेल्या ‘कुल्लू’ या राजघराण्याची पार्श्वभूमी आहे. हिमाचलमध्ये विधानसभेच्या सहा जागांवर पोटनिवडणूकदेखील होत आहे. भाजपा नेते व माजी मंत्री राम लाल मारकंडा यांनी विधानसभेच्या या पोटनिवडणुकीमध्ये तिकीट न मिळाल्याने पक्षाला राम राम केला आहे. त्यांनी अनेक कार्यकर्त्यांसोबत पक्ष सोडल्यामुळे लाहौल व स्पिती या दोन जिल्ह्यांमधील पक्षाची ताकद कमी झाली आहे. हे दोन्ही जिल्हे याच मंडी मतदारसंघात येतात.

कंगना रणौत निवडणुकीच्या राजकारणात नवखी आहे. ती बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध व गुणी अभिनेत्री असली तरीही ती वाचाळवीर म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक वर्षांपासून ती भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्या विचारांची पाठराखण करीत आली आहे. मात्र, ही निवडणूक जिंकण्यासाठी तेवढे पुरेसे ठरणार नाही, असे राजकीय विश्लेषक सांगतात. दुसऱ्या बाजूला विक्रमादित्य सिंह हे राज्यात मोठे राजकीय वजन असलेल्या एका मोठ्या राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमीचे आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे सगळ्या देशाचे लक्ष लागले आहे.