Karnataka Congress minister resigns : बंगळुरूच्या महादेवपुरा विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीतील कथित अनियमितता काँग्रेस सरकारच्या काळात झाल्या, असं विधान करणारे कर्नाटकचे सहकारमंत्री के. एन. राजन्ना यांनी सोमवारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. माझ्याविरोधात कटकारस्थान करून मला जाणीवपूर्वक मंत्रिपदावरून हटविण्यात आलं आहे, असा आरोप त्यांनी माध्यमांशी बोलताना केला. यासंदर्भात आपण दिल्लीतील पक्षश्रेष्ठींबरोबर चर्चा करून त्यांचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करू, असंही ते यावेळी म्हणाले. एकीकडे लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये कथितरित्या मतांची चोरी झाल्याचा आरोप इंडिया आघाडीचे नेते करीत असताना काँग्रेसच्या मंत्र्यानेच आपल्या सरकारच्या कार्यकाळात मतदार यादीत अनियमितता झाल्याचा आरोप केल्यानं विरोधकांची चांगलीच कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे.
नेमकं काय म्हणाले के. एन. राजन्ना?
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महादेवपुरा मतदारसंघातील तब्बल एक लाखांहून अधिक मते चोरली गेली आणि त्यामुळेच भाजपाला बेंगळुरू मध्य लोकसभा मतदारसंघात विजय मिळवता आला, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार राहुल गांधी यांनी केला होता. त्यावर “मतदार यादी तयार होत असताना काँग्रेस नेते आक्षेप नोंदवण्याऐवजी डोळे झाकून शांत बसले. या अनियमितता होत असताना पक्षानं त्यावर लक्ष दिलं नाही, असं विधान राजन्ना यांनी ९ ऑगस्टला केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळं राज्य काँग्रेसमधील काही नेते नाराज झाले आणि त्यांनी पक्षाच्या उच्च नेतृत्वाकडे राजन्ना यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली. सूत्रांच्या माहितीनुसार, सोमवारी संध्याकाळपर्यंत राजन्ना यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचे निर्देश देण्यात आले. यानंतर राजभवनाला त्यांच्या राजीनाम्याची माहिती देणारे पत्र पाठवण्यात आले.
माझ्या राजीनाम्यामागं मोठं कटकारस्थान- राजन्ना
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर ७४ वर्षीय राजन्ना म्हणाले, “मी राजीनामा नेमका का आणि कुणाच्या दबावाखाली दिला, त्या संदर्भात अजिबात भाष्य करणार नाही; कारण मला काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाला अडचणीत आणायचे नाही. माझ्या राजीनाम्यामागं एक मोठं कटकारस्थान आहे. त्यामागे नेमका कुणाचा हात आहे आणि मला मंत्रिपदावरून हटविण्यासाठी कोणकोणत्या नेत्यांनी पक्षश्रेष्ठींच्या भेटीगाठी घेतल्या हे सर्व तपशील मी योग्य वेळी उघड करीन.” राजधानी दिल्लीत जाऊन मी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खरगे, खासदार राहुल गांधी व के. सी. वेणुगोपाल यांची भेट घेऊन त्यांचा गैरसमज दूर करणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भाजपाकडून काँग्रेसला चिमटे
दरम्यान, काँग्रेसच्या अखिल भारतीय समितीनं (AICC) राजन्ना यांच्या वक्तव्यावर अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. सोमवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांशी चर्चा केली, तर दुसरीकडे विरोधात असलेल्या भाजपा आमदारांनी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा सभागृहात हा मुद्दा उपस्थित केला. राज्यातील विरोधी पक्षनेते आर. अशोक म्हणाले, “यापूर्वी राजन्ना यांच्याकडून हसन जिल्ह्याचं पालकमंत्रिपद काढून घेण्यात आलं होतं आणि आता त्यांचं मंत्रिपदही गेलं आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या निकटवर्तीय मंत्र्यांच्या एकापाठोपाठ एक विकेट्स पडत आहेत.”

अशोक पुढे म्हणाले, “राजन्ना हे नेहमीच मुख्यमंत्र्यांचे समर्थन करीत होते. आता काँग्रेसच्या नेतृत्वानं त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यास सांगितलं आहे. मतदार यादीतील अनियमितता काँग्रेस सरकारच्या काळातच झाली आणि त्याला राज्यातील नेतेच कारणीभूत आहेत, असं राजन्ना म्हणाले होते. ते खरे बोलल्यामुळेच त्यांना पदावरून हटविण्यात आले. यावरून स्पष्ट होते की, काँग्रेसमध्ये लोकशाही नाही.” भाजपा आमदार एस. सुरेश कुमार यांनीही याच मुद्द्याला हाताशी धरून काँग्रेस सरकारला कोंडीत पकडलं. राजन्ना यांनी केलेल्या खळबळजनक आरोपांवर सत्ताधाऱ्यांनी स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी त्यांनी केली. त्यावर राज्याचे कायदा आणि संसदीय कार्यमंत्री एच. के. पाटील म्हणाले, “सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि ही चर्चा अनावश्यक आहे. मुख्यमंत्री या विषयावर सभागृहात भाष्य करतील.”
राजन्ना यांच्यामुळे काँग्रेसची कोंडी?
दरम्यान, राजन्ना यांच्यामुळे काँग्रेसचे सरकार अडचणीत सापडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी मार्चमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान त्यांनी पक्षातील काही नेत्यांनी आपल्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा गंभीर आरोप केला होता. राज्यातील विविध पक्षांतील ४८ नेत्यांना अशाच पद्धतीनं लक्ष्य करण्यात आलं होतं, असेही ते म्हणाले होते. मात्र, सीआयडीने केलेल्या तपासात या प्रकरणात कोणतेही तथ्य आढळले नाही. त्यावेळी हे आरोप राज्य काँग्रेसमधील सत्तासंघर्षाचे परिणाम असल्याचे मानले जात होते.
हेही वाचा : जगदीप धनखड, सत्यपाल मलिक यांना पाठिंबा देणं भाजपा प्रवक्त्याला भोवलं; काय आहे नेमका प्रकार?
डी. के. शिवकुमार यांच्या हकालपट्टीची केली होती मागणी
आमदार राजन्ना यांनी यापूर्वी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी केली होती. शिवकुमार यांचा प्रभाव कमी करण्यासाठी पक्ष नेतृत्वाने आणखी तीन उपमुख्यमंत्री नेमावेत, असंही ते म्हणाले होते. मागील महिन्यात राजन्ना यांनी काँग्रेसचे कर्नाटक प्रभारी आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे (AICC) सरचिटणीस रणदीप सिंह सुरजेवाला यांनी राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीला आक्षेप घेतला होता. सुरजेवाला यांनी घेतलेली बैठक ही घटनाविरोधी असल्याचं ते म्हणाले होते. राजन्ना यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. “पक्षश्रेष्ठींनी राजन्ना यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगितले याचे मला दु:ख होत आहे. ते माझे चांगले मित्र असून आम्ही गेल्या २५ वर्षांपासून एकत्रित काम करीत आहोत,” असं उपमुख्यमंत्री म्हणाले.