Mahagathbandhan Bihar Election 2025 Strategy : महाराष्ट्र व हरियाणापाठोपाठ दिल्ली विधानसभा निवडणूक जिंकून विजयाच्या गतीवर स्वार झालेल्या भाजपाने आता आपलं लक्ष्य बिहारच्या निवडणुकीकडं वळवलं आहे. बिहारमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार असून नितीश कुमार हे मुख्यमंत्री आहेत. आगामी निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना शह देण्यासाठी लालू प्रसाद यादव यांनी महाआघाडीची मोट बांधली आहे. या आघाडीत राष्ट्रीय जनता दलासह काँग्रेस व इतर मित्रपक्षांचा समावेश आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी महाआघाडीत जागावाटपावर जवळपास तडजोड होत असल्याची माहिती ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

काँग्रेसने २०२० मधील निवडणुकीप्रमाणेच ७० जागा लढवण्याचा आग्रह धरला आहे. मात्र, आरजेडी अधिकाधिक जागा स्वतःकडे ठेवू इच्छित आहे. सूत्रांच्या मते, दोन्ही पक्षांमध्ये तडजोडीचा सूर असून काँग्रेसला ५८ ते ६० जागा देण्यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. बिहार विधानसभेत एकूण २४३ जागा आहेत. २०२० च्या निवडणुकीत महाआघाडीकडून आरजेडीने १४४ जागांवर निवडणूक लढवली होती आणि त्यापैकी ७५ जागा जिंकल्या होत्या, तर काँग्रेसने ७० जागा लढवूनही त्यांना केवळ १९ मतदारसंघातच विजय मिळवता आला होता.

आरजेडीच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले, “यावेळी महाआघाडीत मुकेश सहनी यांची विकासशील इंसान पार्टी (VIP) आणि पशुपती कुमार पारस यांची लोक जनशक्ती पार्टी (LJP) यांचाही समावेश झाला आहे, त्यामुळे काँग्रेसनेही दुसऱ्या क्रमांकाचा भागीदार म्हणून समजूतदारपणा दाखवावा, असा आमचा प्रयत्न आहे.” ते पुढे म्हणाले, “चर्चा सौहार्दपूर्ण वातावरणात सुरू आहे. कोणत्याही पक्षाला मागच्या वेळेस जितक्या जागा मिळाल्या होत्या, तितक्याच जागा यावर्षीच्या निवडणुकीतही मिळाव्यात अशी इच्छा असते; पण सध्याच्या घडीला जागावाटपाचे सूत्र अधिकच कठीण झालं आहे आणि हे काँग्रेसने लक्षात घ्यायला हवे.”

आणखी वाचा : मोदी-शाहदेखील त्यांना वाचवू शकणार नाहीत; मुख्यमंत्र्यांना तुरुंगात जावं लागणार? राहुल गांधी काय म्हणाले?

महाआघाडीत कोणाला किती जागा मिळणार?

  • सूत्रांच्या मते, लालू प्रसाद यादव यांचा पक्षाला आगामी विधानसभा निवडणुकीत १४० च्या आसपास जागांवर लढण्याची इच्छा आहे.
  • गेल्या निवडणुकीतील कामगिरी व लोकसभा निवडणुकीत वाढलेल्या मताधिक्यामुळे आरजेडीचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे.
  • काँग्रेसकडून ७० ते ८० जागांची मागणी केली जात असून त्यांना ५८-६० जागा देण्यात तडजोड होऊ शकते, असं सूत्रांनी सांगितलं.
  • आरजेडीच्या एका दुसऱ्या नेत्याने सांगितले की, काँग्रेसने जर ५० जागांवर समाधान मानले तर आम्हाला आनंदच होईल.
  • आम्ही शक्य तितकी लवचिकता दाखवत आहोत आणि काँग्रेसला ५८ ते ६० जागा सोडण्याचा अंतिम निर्णय होऊ शकतो, असंही ते म्हणाले.

काँग्रेसमुळे झाला होता महाआघाडीचा पराभव?

दरम्यान, २०२० च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला जास्त जागा दिल्यामुळे महाआघाडीचा पराभव झाला असा काहींचा दावा आहे. मात्र, आरजेडीने हा दावा फेटाळून लावला असून ही धारणा चुकीची असल्याचं म्हटलं आहे. “गेल्या निवडणुकीत काँग्रेसला फारशा मजबूत जागा देण्यात आल्या नव्हत्या. जिथे आरजेडीची ताकद कमी होती, त्याच जागा त्यांना देण्यात आल्या होता, त्यामुळे यंदा जागावाटपाचा हा मुद्दा महत्त्वाचा ठरत नाही. यावेळी आम्हाला १३५ ते १४० जागांवर लढण्याची इच्छा आहे, कारण पुढील सरकार स्थापन करण्याची आमची शक्यता खूप चांगली आहे.”

lalu prasad yadav and rahul gandhi photo
राहुल गांधी व लालू प्रसाद यादव (छायाचित्र पीटीआय)

महाआघाडी मित्रपक्षांसाठी किती जागा सोडणार?

मुकेश सहनी यांच्या विकासशील इंसान पार्टीला (VIP) सध्या केवळ १२ जागा दिल्या जाण्याची शक्यता आहे. मात्र, सहनी हे सार्वजनिक कार्यक्रमांमधून ६० जागांची मागणी करीत आहेत. २०२० च्या निवडणुकीत विकासशील इंसान पार्टीने एकूण ११ जागांवर निवडणूक लढवली होती आणि त्यापैकी चार मतदारसंघात विजय मिळविला होता. त्यावेळी मुकेश सहनी हे भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा भाग होते, मात्र आता त्यांनी महाआघाडीत येण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा : शिंदे गटाची रिपब्लिकन सेनेबरोबरची युती नेमकी कशासाठी? काय आहेत यामागची कारणं?

दुसरीकडे पशुपती कुमार पारस हे पूर्वी एनडीएबरोबर होते, मात्र काही महिन्यांपूर्वी त्यांनी महाआघाडीत प्रवेश केला. त्यांच्या पार्टीला दोन ते तीन जागा मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. आरजेडीच्या एका नेत्याने सांगितले, “डाव्या पक्षांकडूनही जागा वाढवण्याची मागणी केली जात आहे. त्यांनी मागच्या विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केली होती आणि यंदा दोन लोकसभा जागाही जिंकलेल्या आहेत, त्यामुळे सीपीआयच्या (ML) अपेक्षाही लक्षात घ्याव्या लागतील.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरजेडीने एमआयएमची ऑफर का नाकारली?

दरम्यान, एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी काही दिवसांपूर्वी आरजेडीला युतीसंदर्भात प्रस्ताव दिला होता. मात्र, लालू प्रसाद यादव यांनी त्यांच्याबरोबर युती करण्याला नकार दिला आहे. विशेष बाब म्हणजे यादव समाजानंतर मुस्लीम समाज हा आरजेडीचा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा मतदार वर्ग मानला जातो. २०२० च्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमने सर्वांनाच आश्चर्यचकित करत बिहारमधील पाच जागा जिंकल्या होत्या. मात्र, यातील चार आमदारांनी आरजेडीत प्रवेश केला आहे. पक्षाच्या एका नेत्याने सांगितले की, एमआयएमबरोबर युती करण्यास लालूंनी नकार दिला आहे, कारण त्यांच्यावर धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा नेहमीच आरोप होतो. आमचे पक्षनेतृत्व यावर ठाम असून अशा कोणत्याही ध्रुवीकरण करणाऱ्या पक्षांशी युती केली जाणार नाही.” दरम्यान, महाआघाडीने जागावाटपासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्या संदर्भातील अंतिम निर्णय काय होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.