BMC Election Uddhav Thackeray : एकसंध शिवसेनेची दोन शकले झाल्यापासून उद्धव ठाकरे यांना एकापाठोपाठ एक पराभवाचे धक्के बसले. निष्ठावंतांनी साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर लोकसभा आणि त्यापाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं अपयश आलं. आता आगामी काळात महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरे गटासाठी अत्यंत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. गेली पंचवीस-तीस वर्षे मुंबई महापालिकेवर सत्ता गाजवणाऱ्या शिवसेनेचं या निवडणुकीत राजकीय भवितव्य ठरू शकतं, असं मत राजकीय विश्लेषक व्यक्त करीत आहेत.
१९९७ पासून मुंबईवर शिवसेनेचं वर्चस्व
१९९७ ते २०२२ पर्यंत सलग २५ वर्षे शिवसेनेने बृहन्मुंबई महानगरपालिकेवर (BMC) निर्विवाद वर्चस्व ठेवलं आहे. मात्र, पक्षाची दोन शकले झाल्यापासून एकेक करीत माजी नगरसेवक ठाकरे गटाची कास सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. २०१७ ते २०२२ या अलिकडच्या काळातील पन्नास टक्के नगरसेवक ठाकरेंच्या पक्षातून बाहेर पडले आहेत. दुसरीकडे ठाकरेंनी उरलेल्या माजी नगरसेवकांची एकही बैठक गेल्या वर्षभरात बोलवली नसल्यामुळे ते देखील नाराज असल्याची चर्चा आहे. यामुळेच ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत अनिश्चिततेची भावना वाढल्याचं दिसून येत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्यानंतर मार्च २०२२ पासून मुंबई महापालिकेवर ‘प्रशासकराज’ आहे. या काळात पक्षातील ४३ माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. शिंदे गटाकडे शिवसेनेचं अधिकृत धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं नाव वापरण्याचा अधिकार आहे. तसेच शिंदे गटात अमेय घोले, समाधान सरवणकर, शीतल म्हात्रे, यशवंत जाधव, राजू पेडणेकर, सुवर्णा करंजे आणि स्नेहल शिंदे यांसारख्या प्रमुख नगरसेवकांचा समावेश आहे.
हेही वाचा : Maharashtra Politics : महायुतीमध्ये छगन भुजबळांचं महत्व का वाढलं?
कोणकोणत्या नगरसेवकांनी सोडली ठाकरेंची साथ?
मुंबई महानगरपालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणूकीत एकसंघ शिवसेनेचे ८४ नगरसेवक निवडून आले होते. चार अपक्षांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे ही संख्या ८८ झाली. मनसेच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ही संख्या ९४ झाली होती. त्यात जात पडताळणीमध्ये तसेच पोटनिवडणूकीमुळे शिवसेनेचे आणखी पाच नगरसेवक वाढले. त्यामुळे प्रत्यक्षात मार्च २०२२ मध्ये महापालिकेची मुदत संपेपर्यंत शिवसेनेचे सुमारे शंभर नगरसेवक होते. त्यापैकी आता ठाकरेंबरोबर सुमारे ४८ नगरसेवक उरले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
उद्धव ठाकरेंसमोर कोणकोणती आव्हानं?
“शिवसैनिकांची पुन्हा एकजूट करून त्यांना कामाला लावणे हे ठाकरे गटासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे”, असं मुंबई विद्यापीठाचे संशोधक आणि शिवसेनेचे अभ्यासक डॉ. संजय पाटील यांनी सांगितलं. “नगरसेवकांचा पक्षत्याग ही केवळ एक प्रतिकात्मक गोष्ट नाही, तर यामुळे पक्षाची प्रभाग स्तरावरील यंत्रणाही कमकुवत झाली आहे. कितीही करिष्माई नेतृत्व असलं तरी, लोकप्रियतेला मतांमध्ये रूपांतरित करणं कठीण जातं. त्यामुळेच ठाकरेंच्या शिवसेनेतील अनेक नेते आपली राजकीय प्रतिष्ठा टिकवून ठेवण्यासाठी पक्षांतर करण्याचा विचार करत आहेत,” असंही डॉ. संजय पाटील म्हणाले.
महाविकास आघाडीचा भाग असलेल्या शिवसेनेला (ठाकरे गट) गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोठा फटका बसला. त्यानंतर मुंबईतील माजी नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंची कास सोडल्यामुळे पक्षाचं स्थानिक पातळीवरचं संघटन अधिकच पोखरलं गेलं. शाखाप्रमुखांपासून ते बूथ पातळीवरील कार्यकर्त्यांपर्यंत पक्षाची रचना विस्कळीत झाल्यामुळे ठाकरे गटाला महापालिका निवडणुकीसाठी सक्षम उमेदवार शोधण कठीण जात असल्याचं दिसून येत आहे.
शिवसैनिकांनी व्यक्त केली खंत
“पक्ष सत्तेत नसला आणि स्थानिक पातळीवरील नेतृत्व मजबूत नसलं, तर नगरसेवकांना निवडून येणं कठीण जातं. कारण, कार्यकर्ते व मतदार यांना प्रेरित करणं जवळपास अशक्य होतं,” असं ठाकरे गटाच्या एका माजी नगरसेवकाने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितलं. शहरातील दादर परिसरातील एका माजी शाखाप्रमुखानेही हीच भावना व्यक्त केली, “आम्हाला अनेकदा असं वाटतं की, पक्षाने आम्हाला सोडलं आहे. ठोस मार्गदर्शन किंवा स्थानिक नेतृत्वाचा पाठिंबा नसताना कार्यकर्त्यांना उत्साही ठेवणं फारच कठीण आहे.” असंही ते म्हणाले.
शिवसेना फुटीची झळ आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील युवासेनेलादेखील बसल्याचे दिसून येत आहे. युवासेनेचे अनेक कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा आहे. “आदित्य ठाकरे हे युवासेनेचे करिष्माई नेते आहेत. परंतु, निवडणुका जवळ आल्यानंतरच ते कार्यकर्त्यांशी संवाद साधतात. यादरम्यान, विरोधी गटातील नेते मात्र प्रत्येक स्थानिक कार्यक्रमाला उपस्थित राहतात आणि आपले वर्चस्व मजबूत करतात,” असं युवासेनेच्या एका कार्यकर्त्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं.
“मुंबईतील मराठी मतदारांचा ठाकरेंना पाठिंबा”
भाजपाशी फारकत घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाबरोबर हातमिळवणी केली. त्यांची ही भूमिका पक्षातील नेत्यांना व शिवसैनिकांना फारशी रुचलेली नसल्याचं दिसून येत आहे. ठाकरेंच्या या निर्णयाचा परिणाम शिवसेनेच्या पारंपरिक मराठी-हिंदुत्ववादी मतदारांवर झाल्याची शंका अनेकांनी व्यक्त केली आहे. “शिवसेनेचा मूळ मतदार हा शहरी मध्यमवर्गीय असून हिंदुत्वाच्या विचारसरणीशी जोडलेला आहे. परंतु, पक्षात दोन गट पडल्यामुळे शिंदेंना साथ द्यावी की ठाकरेंना? असा दुहेरी पेच आमच्यासमोर आहे”, असं मत परळ भागातील एका शिवसेना मतदाराने व्यक्त केलं. त्यांच्या मते मुंबईतील अनेक मराठी मतदारांचा उद्धव ठाकरे यांना अजूनही भावनिक पाठिंबा आहे. या भावना मतांमध्ये परावर्तित होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
आणखी वाचा : भुजबळांच्या मंत्रिमंडळ प्रवेशामुळे धनंजय मुंडेची दारे बंद
दरम्यान, “जे नगरसेवक पक्ष सोडून गेले होते, त्यांनी काहीच काम केलेलं नव्हतं. खरे मुंबईकर आणि शिवसैनिक अजूनही उद्धव साहेबांच्याच पाठीशी आहेत. कोरोना महामारीच्या काळात आणि २५ वर्षात उद्धवजींनी मुंबईसाठी काय काम केलं, ते सर्वांनीच बघितलं आहे. आगामी महापालिका निवडणुकीत त्याचा परिणाम दिसून येईल”, असं मत ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अनिल कोकीळ यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना म्हटलं. पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांचं असं मत आहे की, जर उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र आलेत तर मुंबईतील मराठी मतांचं संघटन होऊ शकतं आणि ती एक मोठी राजकीय घडामोड ठरू शकते.
“जर ठाकरे बंधू एकत्र आले, तर…”
मनसेचा राज्यातील राजकीय प्रभाव मर्यादीत असला तरी, गेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाने ७.७३% मते घेतली होती. त्यावेळी पक्षाचे एकूण सात नगरसेवक निवडून आले होते. नंतर त्यांनी एकसंध शिवसेनेत प्रवेश केला. “जर ठाकरे बंधू एकत्र आले, तर पक्षात नवचैतन्य येईल आणि महापालिका निवडणुकीत आमचा दणदणीत विजय होईल. आम्हाला माहिती आहे की, दोन्ही पक्षाची राजकीय स्थिती सध्या कमकुवत आहे. मराठी मतांचं विभाजन दोघांनाही (उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे) परवडणारं नाही,” असं एका शिवसेनेच्या (ठाकरे गट) एका पदाधिकाऱ्यानं सांगितलं. दरम्यान लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला दारुण पराभव स्वीकारावा लागला. आता आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकून पुनरागमन करण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. त्यामुळे या निवडणुकीआधी ठाकरे बंधू एकत्र येणार की स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.