Shivsena Bala Darade on Rahul Gandhi : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये वाद निर्माण झाला आहे. लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी हे नाशिकमध्ये आल्यानंतर त्यांच्या तोंडाला काळं फासणार, असा थेट इशारा शिवसेना (उद्धव ठाकरे) नेते बाळा दराडे यांनी दिला आहे. मी ठाकरेंचा शिवसैनिक असून मागे हटणार नाही, असं दराडे यांनी म्हटलं आहे. तर राहुल गांधी हे कोणत्याही भ्याड धमक्यांना घाबरणारे नाहीत. जर कोणी त्यांना धमक्या देत असेल तर आमचा सामान्य कार्यकर्ता त्याला पुरून उरेल”, असं प्रत्युत्तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दराडे यांना दिलं आहे.
२८ मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी केली जाते. त्याच दिवशी सावरकरांच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे. लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी वीर सावरकरांविषयी विधानं केली होती. यानंतर त्यांच्याविरोधात राज्यातील विविध ठिकाणी तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. नाशिकमध्ये मनोज पिंगळे नावाच्या वकिलांनी न्यायालयात धाव घेऊन राहुल गांधींविरोधात याचिका दाखली केली होती. या याचिकेसंदर्भात बोलताना शिवसेना (उद्धव ठाकरे) नाशिक शहर उपप्रमुख बाळा दराडे यांनी बुधवारी (तारीख २९ मे) काँग्रेस नेते राहुल गांधी यांना इशारा दिला.
नेमकं काय म्हणाले बाळा दराडे?
नाशिकमध्ये २८ मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला संबोधित करताना बाळा दराडे म्हणाले, “सावरकरांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींना नाशिक कोर्टाने समन्स बजावलं आहे. येत्या एक-दोन महिन्यात ते शहरात येणार असल्याची माहिती मला मिळाली आहे. माझा राहुल गांधींना विनंतीवजा इशारा आहे की, नाशिकमध्ये येण्याआधी त्यांनी महाराष्ट्रातील जनतेची, हिंदुत्ववाद्यांची माफी मागावी. जर ते माफी न मागता नाशिकमध्ये आले तर आम्ही त्यांच्या तोंडाला काळं फासणार. तसं करणं शक्य न झाल्यास त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करणार. ही माझी वैयक्तिक भूमिका असून पक्षाच्या त्याच्याशी काहीही संबंध नाही. तरीही शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा आदेश अंतिम राहील. ते मला जो आदेश देतील तो मी मान्य करेन.”
दराडे यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस आक्रमक
शिवसेना (उद्धव ठाकरे) नेते बाळा दराडे यांनी राहुल गांधी यांना काळं फासण्याचा इशारा दिल्यानंतर महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते आक्रमक झाले आहेत. राहुल गांधी हे कोणत्याही भ्याड धमक्यांना घाबरणारे नेते नाहीत. जर कोणी त्यांना धमक्या देत असेल, तर आमचा सामान्य कार्यकर्ता त्यांना पुरून उरेल, असा इशारा महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे. “राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल कोणतेही आक्षेपार्ह विधान केलेले नाही, त्यांनी फक्त इतिहासाचे दाखले दिलेले आहेत. अरुण शौरी हे दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते, त्यांनी सावरकरांवर एक पुस्तक लिहिलं आहे. राहुल गांधी जे बोलले ते त्याच पुस्तकात नमूद आहे. धमक्या देणाऱ्यांना आम्ही पाहून घेऊ”, असंही सपकाळ यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : Manipur Government : मणिपूरमध्ये पुन्हा एनडीएचं सरकार; भाजपाला नेमका किती आमदारांचा पाठिंबा?
“राहुल गांधींना हात तर लावून दाखवा”
बाळा दराडे यांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनीही संताप व्यक्त केला. राहुल गांधी यांच्याविषयी अशा पद्धतीने बोलणं योग्य आहे का? राज्यात सध्या जे काही सुरू आहे ते आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सुरू आहे का? असे प्रश्न यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केले आहेत. इतिहासामध्ये बदल होत नाही. राहुल गांधी हे सावरकरांविषयी जे बोलले आहेत, ते इतिहासावर आधारित आहे. आम्ही गांधीवादी विचारांचे असलो तरी आमच्या नेत्याला कोणी अशा पद्धतीने बोलणार असेल तर ते अजिबात खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा यशोमती ठाकूर यांनी बाळा दराडे यांना दिला आहे.
उद्धव ठाकरे गटाची भूमिका काय?
शिवसेना (उद्धव ठाकरे) नाशिक शहर उपप्रमुख बाळा दराडे यांनी राहुल गांधींच्या तोंडाला काळं फासण्याची भाषा केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने त्यांच्या या वक्तव्यापासून स्वत:ला दूर ठेवलं आहे. बाळा दराडे यांनी केलेलं विधान हे त्यांचे स्वत:चे विचार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाची ही अधिकृत भूमिका नाही, असं शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. ठाकरे गटाच्या इतर नेत्यांनीही बाळा दराडे यांच्या विधानावर प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. दरम्यान, नाशिकमधील काँग्रेसचे नेते आज पोलिस आयुक्तांची भेट घेणार असून दराडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहेत. त्यामुळे याप्रकरणात पोलिस काय कारवाई करणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.