कोपरी-पाचपाखाडी

ठाणे : ‘शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना’, अशी ओळख असलेल्या ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लढत त्यांचे राजकीय गुरू आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांच्याशी होत आहे. शिंदे आतापर्यंत तीन वेळा या मतदारसंघातून निवडून आले असले तरी यंदा मुख्यमंत्री म्हणून रिंगणात असल्याने या मतदारसंघाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी शिवसेना घरोघरी पोहचविण्याचे काम केले. दिघे यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यातील पक्षाची धुरा हाती घेतली आणि त्यांनीही आपले वर्चस्व जिल्ह्यात निर्माण केले. यामुळेच शिवसेनेतील बंडानंतर जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी, लोकप्रतिनिधींनी त्यांची साथ दिली, तर माजी खासदार राजन विचारे आणि आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे हे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहिले. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांचा पराभव केला. या निवडणुकीत शिंदे यांनी ‘आपणच ठाणेदार’ असल्याचे दाखवून दिले होते.

हेही वाचा : लक्षवेधी लढत: जातीय ध्रुवीकरणामुळे भुजबळांसमोर कडवे आव्हान

आता विधानसभा निवडणुकीत शिंदे स्वत: रिंगणात आहेत. २००४ मध्ये ते ठाणे शहरातून आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून शिंदे तीन वेळा सलग निवडून आले आहेत. शिवसेनेतील बंडानंतर पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत ठाकरे गटाने खेळी खेळली आहे. आनंद दिघे यांचे ठाणे जिल्ह्यात वर्चस्व होते. दिघे यांच्या निधनानंतरही प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या नावाने प्रचार होतो आणि त्याचा फायदा शिवसेनेला होतो, हे आजवर दिसून आलेले आहे. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन शिंदे यांच्याविरोधात त्यांचे गुरू आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना ठाकरे गटाने उमेदवारी दिली आहे. या ठिकाणी शिंदे विरुद्ध दिघे अशी लढत करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात ठाकरे गट किती यशस्वी होतो, हे येत्या काळातच स्पष्ट होईल.

हेही वाचा : वादावर पडदा, RSS भाजपासाठी मैदानात; विधानसभेसाठी यंत्रणा कार्यान्वित!

निर्णायक मुद्दे

● वागळे इस्टेट परिसरात जुन्या इमारतींचा प्रश्न गंभीर आहे. समूह विकासाची शिंदे यांची योजना असली तरी त्याचे दृश्य परिणाम अजून दिसलेले नाहीत.

● या परिसरातील बहुतेक कारखाने बंद पडले. बेरोजगारी हा प्रश्न आहे.

● झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासाचा प्रश्न कायम आहे.

● समूह विकास व जुन्या इमारतींच्या पुनर्वसनावरून ठाकरे गटाने मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे.

हेही वाचा : २०१९ च्या त्या बैठकीत काय घडलं? कथित सत्तांतर घडवणारी बैठक कधी, केव्हा, कुठे झाली होती?

लोकसभेतील राजकीय चित्र

● महायुती – १,१०,९९१

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

● महाविकास आघाडी – ६६,६५३