अहिल्यानगर: कम्युनिस्ट पक्षाचे प्राबल्य मोडून काढत काँग्रेसने एकेकाळी नगर जिल्ह्याला बालेकिल्ला बनवले होते. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरही काँग्रेसला जिल्ह्यात काँग्रेसला मोठा हादरा बसला होता. मात्र त्या परिस्थितीतूनही सावरत काँग्रेसने पक्षाने जिल्ह्यातील साम्राज्य बऱ्यापैकी टिकवले होते. आता मात्र भाजप, अजित पवार गट व शिवसेनेचा शिंदे गट या महायुतीपुढे जिल्ह्यात काँग्रेसपुढे अस्तित्वाची लढाई सुरू झाली आहे.
जिल्ह्यातील सर्वच साखर कारखानदार पूर्वी काँग्रेसमध्ये होते. त्यानंतर ते शरद पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापना केल्यानंतर त्यांच्या पक्षात गेले. आता जिल्ह्यातील बहुसंख्य साखर कारखानदारांना सत्तेचा आधार लागत असल्याने महायुतीतील घटक पक्षांकडे गेले आहेत. त्यातही प्रामुख्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. सत्ताधारी आणि साखर कारखानदार यांचे समीकरण नेहमीच जुळलेले असते. त्याचेच चित्र नगर जिल्ह्यात दिसते आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जिल्हा परिषद-पंचायत समित्या, कृषी उत्पन्न बाजार समित्या, दूध संघ, खरेदी-विक्री संघ अशा प्रमुख सत्ता केंद्रांवर काँग्रेसचे वर्चस्व होते. या वर्चस्वाला केंव्हाच ओहोटी लागली आहे. जिल्ह्यात सध्या काँग्रेसचा केवळ एक आमदार निवडून आलेला आहे.
गेल्या सुमारे अडीच वर्षांच्या कालावधीत काँग्रेस पक्षाच्या चौथ्या जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिला. दोन दिवसांपूर्वी राजीनामा दिलेले जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांचे वडीलही रामनाथ वाघ पूर्वी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते. जयंत वाघ यांच्यापूर्वी जिल्हाध्यक्ष असलेले बाळासाहेब साळुंखे, करण ससाने, राजेंद्र नागवडे यांनी राजीनामे दिले. त्याहीपूर्वी सन २०१९ मध्ये काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन राधाकृष्ण विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यावेळीही त्यांच्याबरोबर त्यावेळचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती.
जिल्ह्यात काँग्रेस पक्षात राधाकृष्ण विखे व बाळासाहेब थोरात या दिग्गज नेत्यांचे दोन गट सक्रिय होते, त्यावेळेस काँग्रेस अधिक मजबूत होती. अर्थात त्यावेळी हे दोघेही नेते सत्ताधारी होते. विखे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर थोरात यांचे जिल्हा काँग्रेसवर एकहाती वर्चस्व निर्माण झाले होते. त्यामुळे त्यांना पक्षाची संघटनात्मक उभारणी करण्यासाठी मोठी संधी निर्माण झाली होती. मात्र जिल्हा, तालुका प्रमुख पदाधिकारी काँग्रेस पक्षाची साथ सोडू लागल्याने संघटनात्मक बांधणी अद्याप त्यांना शक्य झालेली नाही.
त्यातही विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर या बांधणीसाठी थोरात फारसे सक्रिय राहीले नसल्याची भावनाही कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत. ही परिस्थिती केवळ ग्रामीण भागातच आहे असे नाही तर शहरी भागातही फारसे वेगळे चित्र नाही. शहरासाठी स्वतंत्र जिल्हाध्यक्ष आहे. शहराचे पूर्वीचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी देत ठाकरे गटात प्रवेश केला. त्यानंतर बराच काळ पद रिक्त राहिले. दोन दिवसांपूर्वी या पदावर माजी महापौर दीप चव्हाण यांची नियुक्ती होत नाही तोच ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी राजीनामा दिला.
याशिवाय जिल्ह्यात तालुकाध्यक्षांची काही पदावरील काही नियुक्त्याही रखडलेल्या आहेत. या नियुक्त्यांसाठी बाळासाहेब थोरात यांनी जिल्हा दौरा सुरू केला होता. मात्र अखिल भारतीय व प्रदेश पातळीवरून त्यांच्याकडे अन्य जबाबदाऱ्या सोपवल्या गेल्याने हे दौरेही अर्धवट सोडावे लागले. त्याला पुन्हा मुहूर्त लागलेला नाही आणि पक्षाला लागलेली गळतीही थांबलेली नाही.
स्थानिक निवडणुकांचे आव्हान
अशा परिस्थितीतच आता कार्यकर्त्यांचा आधार असलेल्या जिल्हा परिषद-पंचायत समिती, महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुकांचे वेध लागलेले आहेत. संघटनात्मक बांधणीशिवाय या निवडणुकांना कसे सामोरे जाणार, त्यातून पक्षाचे अस्तित्व टिकवण्याचे आव्हान निर्माण झालेले आहे.