छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील आठपैकी सात मतदारसंघातील प्रमुख पक्षाचे उमेदवार जाहीर झाले आहेत. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे घोडे अडलेलेच आहे. ही जागा शिवसेनेच्या शिंदे गटाला सुटली आणि उमेदवारांची नावे बदलत गेली. विनोद पाटील, संदीपान भुमरे, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांची नाव चर्चेत आले. पण उमेदवाराचे नाव काही जाहीर होत नसल्याने महायुतीमध्ये ‘प्रचार शांतता’ आहे.

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीची तयारी जवळपास १६ महिन्यापूर्वी सुरू झाली. भाजपने केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान केंद्रनिहाय कार्यकर्त्यांची फळी निर्माण करण्यात आली. डॉ. भागवत कराड यांनी आखलेले बहुतांश कार्यक्रम मतदारसंघ बांधणीसाठी घेण्यात आले. पुढे मंत्री अतुल सावे यांचे नाव चर्चेत आले. मग ही जागाच शिंदे गटाची असे सांगण्यात आले. भाजपचे कार्यकर्ते शांत झाले. अजूनही डॉ. भागवत कराड यांनी प्रयत्न सुरूच ठेवले आहेत. दुसरीकडे शिवसेनेच्या शिंदे गटाकडून मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढा देणाऱ्या विनोद पाटील यांचे नाव चर्चेत आणले. त्याला भाजपच्या नेत्यांनी विरोध केला. रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे यांचे नाव पुढे आले. एक दोन दिवसात त्यांची उमेदवारी जाहीर होईल असे सांगण्यात आले. त्यांचे नाव पुढे येताच त्यांनी व त्यांच्या नातेवाईकांनी मद्य दुकानाचे आठ- नऊ परवाने मिळविल्याचा आरोप सुरू झाला. समाजमाध्यमांमध्ये त्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या. त्यानंतर पुन्हा पुढे सारे काही शांत,शांत असेच चित्र दिसून येत आहे. ‘ सध्या काही हालचाल नाही’ असे भाजपचे नेते सांगत आहेत. उमेदवार कोण हे न ठरल्याने मतदारसंघातील प्रचार तसा लटकलेला आहे.

हेही वाचा… भाजपाने किरण खेर यांचे तिकीट कापण्यामागे नेमके कारण काय?

एका बाजूला महायुतीचा उमेदवार ठरत नसल्याने शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमदेवार चंद्रकांत खैरे यांनी ग्रामीण भागात गाठीभेटी घ्यायला सुरुवात केली आहे. शहरातील संपर्कही त्यांनी वाढवला आहे. दरम्यान एमआयएमच्या वतीने इम्तियाज जलील आणि अपक्ष म्हणून हर्षवर्धन जाधव यांनी पुन्हा निवडणुकीच्या मैदानात आपण उतरू असे जाहीर केले आहे. त्यामुळे ‘ महायुती’ मधील शिंदे गटाला उमदेवार ठरवताना संभ्रमावस्थेतून जावे लागल्याचे चित्र राजकीय पटलावर कायम आहे.