मनोज सी जी, एक्सप्रेस वृत्त
नवी दिल्ली : देशभरातील अनुसूचित जातीच्या लोकांना अजूनही देशभरात भेदभावाला सामोरे जावे लागते अशी टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना व्यक्त कली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आदिवासी असल्याने आणि माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद दलित असल्यामुळे भाजप सरकारने त्यांचा अपमान केला आहे. मुर्मू यांना अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि नवीन संसद इमारतीच्या उद्घाटनाला आमंत्रित करण्यात आले नव्हते तर कोविंद यांना नवीन संसद इमारतीच्या पायाभरणी समारंभाला आमंत्रण नव्हते अशी टीका खरगेंनी केली.
‘इंडियन एक्सप्रेस’च्या ‘आयडिया एक्सचेंज’ कार्यक्रमात खरगे यांनी, “काँग्रेस पक्ष राजकीय कारणामुळे राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या कार्यक्रमापासून दूर राहिला”, हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप खोडून काढला. अनेक मंदिरांमध्ये दलितांना अजूनही प्रवेश नसल्याचा युक्तिवाद करताना खरगे यांनी विचारले की, “जर मी (अयोध्येला) गेलो असतो तर त्यांना ते सहन झाले असते का?” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली ‘४०० पार’ची घोषणा खरगे यांनी खोडून काढली. लोकांना बदल हवा आहे त्यामुळे तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण होणार नाही. भाजपचे नेते आतापासूनच राज्यघटना बदलण्याची भाषा करत आहे असा इशाराही त्यांनी दिला.
आणखी वाचा-चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या कामगारांना अनुसूचित जातीचा दर्जा मिळणार? आसामात काय आहेत राजकीय समीकरणं?
काँग्रेसने राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहायला हवे होते अशी पश्चातबुद्धी होते का असा प्रश्न विचारला असता खरगे म्हणाले की, “ही वैयक्तिक श्रद्धा आहे. ज्याची इच्छा आहे ते त्या दिवशी, दुसऱ्या दिवशी किंवा कोणत्याही दिवशी जाऊ शकते. ते (मोदी) पुजारी नाहीत. त्यांनी राममूर्तीची पूजा, स्थापना यासाठी पुढाकार का घ्यावा, त्यांनी हे केवळ राजकीय उद्देशाने केले. एक-तृतियांश मंदिराचे बांधकाम अद्याप पूर्ण झालेले नाही. हा राजकीय कार्यक्रम आहे की धार्मिक कार्यक्रम? तुम्ही धर्म आणि राजकारण एकत्र का करत आहात?”
स्वतः दलित असलेले खरगे म्हणाले की, “माझ्या लोकांना अजूनही मंदिरात प्रवेश करू दिला जात नाही. राम मंदिर सोडा, तुम्ही कुठेही जा, प्रवेशासाठी भांडावे लागते… खेड्यांमधील लहान मंदिरे, ते प्रवेश करू देत नाहीत. तुम्ही पाणी पिण्याची परवानगी देत नाही, तम्ही शैक्षणिक संस्थांना परवानगी देत नाही, तुम्ही अगदी लग्नाच्या वरातीत वराला घोड्यावरून मिरवणूक काढू देत नाही… लोक त्यांना खाली ओढतात आणि मारतात. मिशी ठेवण्याचा मुद्दा… त्यांना मिशी काढायला लावतात. तर तुम्ही माझ्याकडून अपेक्षा करता… जर मी गेलो असतो तर त्यांना ते सहन झाले असते का?”
“किंवा त्यांनी माझ्याबरोबर अन्य लोकांनाही आमंत्रण द्यायला हवे होते. उक्ती ही एक गोष्ट आहे, तो निवडणूक अपप्रचार आहे… हा काही राजकीय पक्षाचा कार्यक्रम नाही. हा एक शुद्ध धार्मिक कार्यक्रम आहे आणि सश्रद्ध लोकांचा कार्यक्रम आहे. ते जाऊ शकले असते. माझे कोणत्याही लोकांबरोबर कोणतेही वैमनस्य नाही. आपले ३३ कोटी देवी-देवता आहेत. जर त्यांनी माझ्या लोकांना पूजेची परवानगी दिली तर आम्ही सर्व ३३ कोटी देवी-देवतांची पूजा करू” असे खरगे यांनी यावेळी सांगितले.
आणखी वाचा-ब्राह्मण ते ठाकूर, दलित ते मुस्लिम; उत्तराखंडमध्ये जातीय समीकरणावरच निकालाचे गणित
“हे माझे दैव आहे. तुम्ही पंतप्रधानांबरोबर (राष्ट्रपीत द्रौपदी) मुर्मू यांना परवानगी का दिली नाही? त्या देशाच्या प्रथम नागरिक आहेत. तुम्ही त्यांना परवानगी दिली नाही. त्याचवेळी (नवीन) संसद इमारतीच्या उद्घाटनाला तुम्ही त्यांना येऊ दिले नाही आणि उद्घाटन करू दिले नाही. (माजी राष्ट्रपती रामनाथ) कोविंद, तेही होते…. दलित राष्ट्रपती. तुम्ही त्यांना संसदेची पायाभरणी करू दिली नाही. त्यांच्या जागी अन्य समुदायाचे (जातीचे) लोक असते तर तुम्ही या नियमांचे कधीही उल्लंघन केले नसते. पण ते दलित आणि आदिवासी असल्यामुळे, तुम्ही याबद्दल इतके बोलता, आमच्या हक्कांबद्दल बोलता, तुम्ही अपमान करता आणि तुम्ही प्रत्येकाला सांगता की काँग्रेसचे लोक आले नाहीत,” असे खरगे पुढे म्हणाले.
खरगे यांनी यावेळी म्हणाले की, “काँग्रेसने आपल्या लोकांना सांगितले होते की, ज्यांची श्रद्धा असेल त्यांनी नक्की जा. आम्हाला ज्यावेळी जायचे आहे, त्यावेळी आम्ही जाऊ. पण माझी समस्या ही आहे की माझ्या लोकांना कुठेही जाऊ दिले जात नाही. माझ्या लोकांचा अपमान केला जातो, त्यांना चिरडले जाते, शोषण केले जाते. त्यामुळे त्यांना खरे स्वातंत्र्य मिळत नाही तोपर्यंत मी कुठे जाऊ शकतो?”
मोदींच्या ‘४०० पार’ मोहिमेबद्दल बोलताना खरगे म्हणाले की, “मोदीजी काहीही बोलले तरी त्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. त्यांच्यापूर्वीचे पंतप्रधान कधीही खोटे बोलत नसत आणि असे अतिशोयक्तीपूर्ण आकडे देत नसत. ते म्हणतात ‘४०० पार’. ते ‘६०० पार’ म्हणत नाहीत ही चांगली गोष्ट आहे कारण आपल्या संसदेचे (लोकसभा) संख्याबळ ५४३ आहे. अन्यथा ते म्हणाले असते, ‘६०० पार’.”
आणखी वाचा-Election 2024: राजकीय पक्षांसाठी काम करणारे पगारी कार्यकर्ते
खरगे पुढे म्हणाले की, “पण त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात येणार नाही. त्यांना अडवण्यासाठी आवश्यक संख्याबळ आम्ही जमा करत आहोत आणि आम्ही त्यांना दाखवून देऊ की विरोधी पक्षांना नाही तर या देशातील लोकांना बदल हवा आहे. लोक असंतुष्ट आहेत. आधी ते एका राज्यात एक किंवा दोन सभा घेत असत, आता तर गल्लोगल्ली फिरावे लागत आहे. ते अगदी एखाद्या नगरसेवकाच्या पक्षप्रवेशासाठीही उपस्थित राहून त्याला हार घालत आहेत. एकेकाळी ज्यांना भ्रष्ट म्हटले अशा सर्व लोकांना ते आपल्याकडे घेत आहेत…. त्यामुळे तुम्ही भाजपमधील अस्वस्थतेची कल्पना करू शकता. मोदी स्वतःच धास्तावले आहेत. ‘इंडिया’ आघाडीला चांगले संख्याबळ मिळेल आणि ही संख्या त्यांचा पराभव करण्यासाठी पुरेशी असेल.”
मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील याची विरोधकांना धाकधूक वाटत आहे याबद्दल विचारले असता खरगे म्हणाले की, “त्यामध्ये धोका आहे. सत्तेत येण्यापूर्वीच ते म्हणत आहेत की, ‘आम्हाला दोन-तृतियांश बहुमत द्या, म्हणजे आम्ही राज्यघटना बदलू.’ हे मी म्हणत नाही. त्यांचे खासदार (अनंतकुमार) हेगडे म्हणाले आहेत, सरसंघलाचक म्हणाले आहेत, उत्तर प्रदेशातील अनेक खासदार म्हणाले आहेत. त्यांचे उमेदवार उघडपणे तसा प्रचार करत आहेत आणि मोदी शांत आहेत. ते कारवाई का करत नाहीत? या लोकांची पक्षातून हकालपट्टी का केली गेली नाही, त्यांना तिकीट का नाकारण्यात आले नाही? जर राज्यघटनेच्या विरोधात कोणी बोलत असेल तर तुम्ही त्यांना देशद्रोही मानता. पण राज्यघटना बदलण्याची किंवा त्यामध्ये बदल करण्याची चर्चा करणाऱ्यांविरोधात मोदी कारवाई करत नाहीत”
समाजातील दुर्बळ घटक, महिलांना चिरडण्याचा कट आहे आणि आम्ही हे स्वीकारणार नाही, असे खरगे यांनी सांगितले.