दिगंबर शिंदे

सांगली : माणदेशातील आटपाडीच्या माणगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्तांतर झाले असून या निवडणुकीच्या निमित्ताने भाजप आणि शिवसेनेचा एकनाथ शिंदे गट यांच्यातील संघर्ष टळला आहे. याला भाजपच्या देशमुख गटाने अखेरच्या क्षणी घेतलेली माघार हे प्रथमदर्शनी कारण दिसत असले तरी यामागे राष्ट्रवादीची कूट नीतीच भारी ठरली असल्याचा आरोप खुद्द देशमुख गटाकडून केला जात आहे. राष्ट्रवादीत असतानाही देशमुख गटाने पक्षांतर्गत गटबाजीपासून अलिप्त राहण्याचाच प्रयत्न केला, त्याचीच हे फळ आहे का अशी शंका या निमित्ताने पुढे येत आहे.

MNS workers are active in the campaign of Sunetra Pawar In Baramati
बारामतीत मनसेचे कार्यकर्ते सुनेत्रा पवारांच्या प्रचारात सक्रीय
thane lok sabha marathi news, thane bjp sanjay kelkar marathi news
ठाण्यात भाजपच्या जुन्या-नव्यांमध्ये रस्सीखेच
Congress, Nana Patole car accident,
“विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपाला निवडणूक जिंकायची आहे का?”, नाना पटोलेंच्या अपघातावरून काँग्रेसचा सवाल
Dhairyasheel Mane
मित्रपक्षांच्या नेत्यांची नाराजी दूर करण्याचे हातकणंगलेमध्ये खासदार धैर्यशील माने यांच्यासमोर आव्हान

दुष्काळी भाग असतानाही स्व. बाबासाहेब देशमुख यांनी माणगंगा साखर कारखान्याची उभारणी केली. पाच वर्षापासून हा कारखाना आर्थिक कारणातून बंद आहे. चार वर्षापुर्वी थकित कर्जापोटी जिल्हा बँकेने या कारखान्याचा ताबा घेतला आहे. सध्या संचालक मंडळ नामधारी असूनही या नामधारी संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी राजकीय प्रतिष्ठा पणाला लावण्यात आली होती. बँकेकडे या कारखान्याचा ताबा असल्याने या कारखान्याचा लिलाव करायचा की भाडेकराराने चालविण्यासाठी द्यायचा याचा अधिकार बँकेला आहे. मात्र, एकंदरितच या कारखान्यातून संस्थापक असलेल्या देशमुख गटाला हद्दपार करण्याचाच प्रयत्न या निमित्ताने जिल्ह्यातील मातब्बर शक्तीने केला असल्याचा आरोप देशमुख गटाकडून होत आहे.

कारखान्याची सभासद संख्या १०,५०० आहे. यापैकी पन्नास टक्के सभासद आटपाडी तालुक्यातील तर, ४५ टक्के सभासद सांगोला तालुक्यातील आणि उर्वरित पाच टक्के सभासद माण तालुक्यातील आहेत. माणगंगा कारखान्याची उभारणी करीत असताना आणि गेली ३७ वर्षे कारखाना माजी आ. राजेंद्र देशमुख यांच्या ताब्यात होता. याला सांगोल्यातून स्व.गणपतराव देशमुख यांचीही साथ होती. आतासुध्दा स्व. आबांचे नातू बाबासाहेब देशमुख यांच्याकडून मदत मिळेल असे प्रारंभी वाटत होते. संचालक मंडळातील पाच संचालकांची नावे सांगोल्यातील देशमुख गटाने सुचवायची आणि उर्वरित संचालकांची नावे आटपाडीच्या देशमुखांनी निश्‍चित करायची असा अलिखित करार गेली तीन दशके पाळण्यात आला. आता मात्र, अखेरच्या क्षणी सांगोल्याच्या देशमुख गटाने सत्ताधारी पॅनेलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, आणि पाचजणांची उमेदवारी मागेही घेतली. कारखाना ताब्यात ठेवण्यासाठी सांगोल्याची रसद मिळणार नाही हे स्पष्ट होताच देशमुखांनीही अखेरच्या १५ मिनिटांत माघारीचा निर्णय घेउन कारखाना राजकीय विरोधक असणार्‍या शिवसेना शिंदे गटाचे तानाजी पाटील यांच्या ताब्यात गेला.

कारखाना आटपाडी तालुक्यात असला तरी सत्तासूत्रे सांगोला तालक्यातून निश्‍चित झाली. याला काँग्रेस, शेकाप आणि राष्ट्रवादीने साथ देत शिवसेनेचे पाटील यांचा कारखाना निवडणूक जिंकण्याचा मार्ग निर्धोक केला. सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील, दीपकआबा साळुंखे आणि स्व. गणपतराव देशमुख यांचे नातू बाबासाहेब देशमुख यांनी एकत्रित येउन आटपाडीकरांना खिंडीत गाठून नामोहरम करण्याचा प्रयत्न केला. कारखाना निवडणुक अविरोध करण्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या काही जागा देण्याचा प्रस्ताव देशमुखाकडून शिवसेनेपुढे ठेवण्यात आला होता. चर्चेच्या पातळीवर बोलणी सुरू असतानाच पडद्यामागे देशमुख घराणे सहकारातून हद्दपार करण्याचे प्रयत्न सुरू होते. यामागे राष्ट्रवादीचा राजकीय दबाव होता असा आरोपही होत असून कारखाना सुरू होउ नये यासाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातूनही प्रयत्न केले गेले याचे दाखलेही दिले जात आहेत.

गेल्या वर्षी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजेंद्र देशमुख यांची भाजप पॅनेलमधून उमेदवारी होती. मात्र सोसायटी गटातून तानाजी पाटील हे निवडून आले. राष्ट्रवादीने यावेळी आघाडी धर्माचे पालन केले असे सांगत देशमुखांना जिल्हा बँकेत येण्याचा प्रयत्न हाणून पाडला. गतवर्षी कारखाना भाडे कराराने देण्यासाठी बँकेने निविदा प्रसिध्द केली होती. रितसर अनामतपोटी ८५ लाखांंचा भरणा करूनही ही निविदा उघडण्यात आली नाही. कारखाना भाडेकराराने चालू करण्याची तयारी देशमुखांनी केली होती. मात्र, कारखाना पुन्हा देशमुखांकडे जातोय असे दिसताच निविदाच उघडण्यात आली नाही. यामागे सूत्रबध्द राजकीय डावपेच दिसतात.

आजच्या घडीला कारखान्याची अविरोध निवडणुक जिंकणारे तानाजी पाटील हे आ. अनिल बाबर यांचे समर्थक म्हणून ओळखले जात असले तरी याचे पडसाद आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत उमटणार आहेत. आ. बाबर यांना आटपाडीत मताधिक्य मिळवून देण्यासाठी पाटलांची मदत होते. यामुळे त्यांना पाठबळ द्यावेच लागणार. मात्र, आता उंटाला घरात घेतले आहे. लहानगा आहे तोपर्यंत गोंडस दिसणारा उंट उद्या माझंच घर म्हणू लागला तर आ. बाबर यांनाही अडचणीच ठरणार आहे.