Misogynistic remarks on Dimple Yadav उत्तर प्रदेशमध्ये धर्मगुरूंच्या स्त्री-विरोधी वक्तव्यांमुळे नवे वादळ निर्माण झाले आहे. वृंदावनच्या एका संतांच्या टिप्पणीनंतर वाद चांगलाच उफाळला आहे. त्याचदरम्यान ऑल इंडिया इमाम असोसिएशनचे अध्यक्ष मौलाना साजिद रशिदी यांनी एका वृत्त वाहिनीवरील चर्चेदरम्यान समाजवादी पक्षाच्या खासदार आणि अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांच्याबद्दल अश्लील टिप्पणी केली. त्यानंतर राजकीय गदारोळ निर्माण झाला. भाजपाने त्यांच्या वक्तव्याचा जोरदार निषेध केला आणि महिलांच्या सन्मानासाठी आपली भूमिका स्पष्ट करत समाजवादी पक्षावरदेखील आरोप केला. दुसरीकडे, राजकीय विश्लेषकांनी समाजवादी पक्षाच्या प्रतिसादाला व्होट-बँकच्या राजकारणाचा परिणाम असल्याचे म्हटले. नेमके हे प्रकरण काय? मौलानांच्या वक्तव्याने वाद का निर्माण झाला? भाजपाने नक्की काय आरोप केले? जाणून घेऊयात.
मौलाना नक्की काय म्हणाले?
- ऑल इंडिया इमाम असोसिएशनचे अध्यक्ष मौलाना साजिद रशिदी यांनी डिंपल यादव यांचा एक फोटो दाखवला. त्यात त्यांनी त्यांचे पती आणि पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्याबरोबर दिल्लीतील एका मशिदीतील कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली होती.
- हा फोटो दाखवत त्यांनी डिंपल यादव यांच्या कपड्यांवर टीका केली. त्यांनी डिंपल यादव यांनी परिधान केलेले कपडे आणि सपा खासदार इकरा हसन यांनी परिधान केलेल्या कपड्यांची तुलना केली. फोटोमध्ये इकरा हसन यांनी आपले डोके झाकले होते.
- त्यानंतर महिला-विरोधी म्हणत त्यांच्या वक्तव्याचा जोरदार निषेध करण्यात आला.
- समाजवादी पक्षाचे नेते प्रवेश यादव यांनी लखनौच्या विभूतीखंड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ही टिप्पणी केवळ डिंपल यादव यांचाच नाही तर सर्व महिलांचा अपमान आहे.
- त्यानंतर त्यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ७९ (महिलांच्या विनयभंगाचा प्रयत्न), १९६ (गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे), २९९ (धार्मिक भावना दुखावणे) आणि ३५२ (जाणीवपूर्वक अपमान) यांसारख्या अनेक कलमांखाली एफआयआर नोंदवण्यात आला.

भाजपाची यावर प्रतिक्रिया काय?
भाजपाने हा मुद्दा थेट संसदेत उपस्थित केला. एनडीएच्या खासदारांनी जोरदार निषेध करत महिलांच्या प्रतिष्ठेच्या बचावासाठी घोषणाबाजी केली. अनेक भाजपा नेत्यांनी फलक हातात धरून आम्ही एका महिला खासदाराचा अपमान सहन करणार नाही असे म्हटले. लोक जनशक्ती पार्टी (आर)च्या खासदार शंभवी चौधरी यांनी म्हटले, “एनडीएसाठी महिलांचा सन्मान आणि प्रतिष्ठा सर्वोच्च प्राधान्याचा विषय आहे.” डिंपल यादव यांनी स्वतः त्यांच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या सर्वांचे आभार मानले, त्यांनी भाजपाच्या प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी विचारले की, मणिपूरमध्ये महिलांवर होणाऱ्या हिंसाचार आणि अत्याचारांविरोधात भाजपाने असाच निषेध का केला नाही.
मौलानांच्या या टिप्पणीनंतर उत्तर प्रदेश आणि त्यापलीकडेही मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त झाला. सोशल मीडियावर संत आणि मौलवी दोघांचाही निषेध करणारे हॅशटॅग अनेक दिवस ट्रेंड होत होते. अनेक नागरिकांनी म्हटले की, धार्मिक नेत्यांकडून दया आणि नैतिक मार्गदर्शन अपेक्षित आहे, लैंगिक भेदभावपूर्ण भाषेत बोलणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले. राजकारणी असोत, सामान्य नागरिक असोत किंवा आचार्य असोत, महिलांवरील अपमानास्पद टिप्पणी अस्वीकार्य असल्याचे लोकांनी म्हटले.
समाजवादी पक्षाचे मौन का?
समाजवादी पक्षाने या संपूर्ण प्रकरणावर जाणीवपूर्वक मौन बाळगले. एफआयआर दाखल केल्यानंतरही पक्षाच्या नेतृत्वाने रशिदी यांचा थेट निषेध करणे टाळले. सपाचे ज्येष्ठ नेते अवधेश प्रसाद यांनी एक कठोर विधान जारी केले. त्यांनी म्हटले, “अशी टिप्पणी फक्त एक वेडा माणूसच करू शकतो. या संतांनी आणि मौलवींनी हे लक्षात ठेवावे की त्यांचे शब्द लाखो मनांवर परिणाम करतात.” असे असूनही पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाकडून मजबूत आणि एकजूट भूमिका न घेतल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.
राजकीय तज्ज्ञ काय म्हणतात?
निरीक्षकांचा असा विश्वास आहे की, यावरून पक्षाचे मुस्लीम मतांवरील अवलंबित्व दिसून येते. लखनौमधील एका ज्येष्ठ राजकीय विश्लेषकाने म्हटले, “जर अशी टिप्पणी एखाद्या हिंदू पुजारी किंवा भाजपा नेत्याने केली असती तर सपाने रस्त्यावर उतरून निषेध केला असता. पण, गुन्हेगार मुस्लीम मौलवी असल्यामुळे पक्षाने संकोच केला.” डॉ. भीमराव आंबेडकर विद्यापीठातील राजकीय विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. शशिकांत पांडे यांनी यातील धोका स्पष्ट केला. ते म्हणाले, “या राज्यात महिला जवळपास निम्म्या मतदार आहेत आणि अशा प्रभावशाली व्यक्तींकडून वारंवार होणाऱ्या लैंगिक भेदभावपूर्ण टिप्पणीमुळे एक मोठा मतदार वर्ग दुरावण्याचा धोका आहे. समाजवादी पक्षाचा प्रतिसाद व्होट-बँकेचे राजकारण दर्शवतो, पण त्यांना याची किंमत मोजावी लागते. महिला आणि तरुण मतदार राजकीय नेत्यांकडून स्पष्टतेची अपेक्षा करतात. अशा प्रकरणांमध्ये मौन साधल्यास, विशेषतः २०२७ च्या निवडणुकीच्या तोंडावर याचा उलट परिणाम होऊ शकतो.”
ही टिप्पणी म्हणजे महिलांचा अपमान
डिंपल यादव या भारतीय राजकारणातील सर्वात सभ्य आणि प्रतिष्ठित व्यक्तींपैकी एक आहेत. त्यांच्या साध्या साड्या, त्यांचा शांत स्वभाव आणि त्यांची साधी पण संयमित सार्वजनिक उपस्थिती, यामुळे त्यांना सर्वत्र आदर मिळाला आहे; त्यामुळेच रशिदी यांची टिप्पणी अधिक धक्कादायक ठरते. सोशल मीडियावर एका टिप्पणीत म्हटले आहे, “दबावाखालीही शांत राहून डिंपल यांनी आपली सभ्यता दाखवली. पण, त्यांच्या सभोवतालच्या लोकांचे मौन त्याहून अधिक त्रासदायक गोष्ट आहे.”