गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते तथा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची मोठी मुलगी भाग्यश्री आत्राम यांचा बंडामुळे अहेरी विधानसभेचे राजकीय समीकरण बदलले आहे. आजपर्यंत आत्राम काका पुतण्यात असलेल्या लढाईत आता मुलीने उडी घेतल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यामुळे मंत्री आत्राम यांच्यासमोर दुहेरी आव्हान निर्माण झाल्याचे चित्र आहे.

अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी गडचिरोली जिल्ह्यात राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. यामध्ये राजकीय दृष्ट्या ‘वजनदार’ समजल्या जाणाऱ्या अहेरी विधानसभेत मात्र महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. अशात मंत्री आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेत वडिलांनाच आव्हान दिल्याने मोठे राजकीय वादळ निर्माण झाले आहे.

हेही वाचा >>> राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच; ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे स्पष्टीकरण

आत्राम राजघराण्याचे वर्चस्व असलेल्या या विधानसभेचे काही अपवाद वगळल्यास आजपर्यंत आत्राम राजघराण्यातील व्यक्तीनेच नेतृत्व केले आहे. या ठिकाणीही आत्राम काका पुतण्यामध्ये टोकाचा राजकीय संघर्ष बघायला मिळतो. मात्र, यात आता मंत्री आत्राम यांच्या मुलीने उडी घेतल्याने यावेळी पहिल्यांदा आत्राम राजघराण्यातील तिघे एकमेकांविरोधात उभे राहणार आहेत.

मधल्या काळात बदललेल्या राजकीय समीकरणामुळे मंत्री आत्राम महायुतीत आले. तेव्हापासून भाजपच्या गोटात अस्वस्थता आहे. त्यामुळे या क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट विरुद्ध भाजप असेच चित्र दिसून आले आहे. २०१९ मध्ये भाजपचे माजी राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांचा धर्मरावबाबा आत्राम यांनी मोदी लाटेतही पराभव केला होता. हा पराभव अम्ब्रीशराव आत्राम यांच्या समर्थकांच्या चांगलाच जिव्हारी लागला. तेव्हापासून दोन्ही नेत्यांच्या समर्थकांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत असतात.

हेही वाचा >>> मुख्यमंत्रिपदाच्या ‘बिहार पॅटर्न’ची अफवा; अजित पवार यांचे स्पष्टीकरण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गडचिरोली-चिमूर लोकसभेवर मंत्री आत्राम यांनी महायुतीकडून दावा केला होता. परंतु त्यांना ऐनवेळेवर उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे महायुतीकडून अहेरी विधानसभेवर त्यांचा दावा अधिक मजबूत आहे. त्यांनी विधानसभेची तयारी सुरू केली असून ते दररोज संपूर्ण क्षेत्र पिंजून काढत आहेत. दुसरीकडे पक्ष बदलाच्या चर्चेत काही काळ शांत बसलेले भाजपचे अम्ब्रीशराव आत्राम पुन्हा सक्रिय झाले आहे. त्यांनी ठिक ठिकाणी भाजप पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेणे सुरू केले आहे. त्यामुळे दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून महायुतीकडून कोणाला उमेदवारी मिळणार यासाठी नेत्यांसह नागरिकांमध्येही उत्सुकता आहे.