आगामी लोकसभा निवडणुकीत विजयी कामगिरी करता यावी म्हणून काँग्रेसने तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून या निवडणुकीच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे समजल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेश राज्यामध्ये काँग्रेसने महत्त्वाचे बदल केले आहेत. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना हटवून आता उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदाची जबाबदारी राज्यसभेचे खासदार अविनाश पांडे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे उत्तर प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून या निर्णयामुळे आम्हाला आश्चर्य वाटलेले नाही, असे म्हटले आहे.

उत्तर प्रदेश काँग्रेसमध्ये नेमका काय बदल?

प्रियांका गांधी यांच्याकडे सप्टेंबर २०२० पासून उत्तर प्रदेश काँग्रेसच्या प्रभारीपदाची जबाबदारी होती. प्रियांका गांधी यांची आक्रमक भूमिका आणि धडाडी वृत्ती यामुळे उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला पुनरुज्जीवन मिळेल, अशी आशा होती. मात्र, सप्टेंबर २०२० पासून उत्तर प्रदेशच्या काँग्रेसमध्ये खास बदल किंवा प्रगती झालेली नाही. याच कारणामुळे राष्ट्रीय काँग्रेसने प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेशच्या प्रभारी पदापासून दूर करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रियांका गांधी यांची जागा आता अविनाश पांडे हे घेतील.

PM Narendra Modi On Rahul Gandhi
‘युवराज’ उत्तर प्रदेशातली जागा वाचवू न शकल्याने केरळमध्ये आले; मोदींचा राहुल गांधींवर हल्ला
narendra modi rahul gandhi lalu yadav
“मुघलांच्या मानसिकतेतून…”, राहुल गांधी – लालू यादवांच्या ‘त्या’ व्हिडीओवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
Chaudhary Birendra Singh from Haryana rejoined Congress
हरियाणामध्ये भाजपला धक्का; प्रभावी जाट नेते ब्रिजेंद्र सिंह यांची काँग्रेसमध्ये घरवापसी
owaisi apana dal pdm
अखिलेश यांच्या ‘पीडीए’ सूत्राला ओवेसींचे ‘पीडीएम’ देणार टक्कर? उत्तर प्रदेशात तिसरी आघाडी

सप्टेंबर २०२०, संपूर्ण उत्तर प्रदेशची जबाबदारी

उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला उभारी मिळावी म्हणून प्रियांका गांधी यांनी २०१८ सालापासून या राज्यात काम सुरू केले होते. सुरुवातील त्या फक्त अमेठी आणि रायबरेली या दोन लोकसभा मतदारसंघापुरतेच काम करत होत्या. त्यानंतर जानेवारी २०१९ मध्ये त्यांच्याकडे पूर्व उत्तर प्रदेशचे प्रभारीपद सोपवण्यात आले. ज्योतीरादित्य शिंदे यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला. त्यानंतर प्रियांका गांधी यांच्याकडे पश्चिम उत्तर प्रदेशच्या प्रभारी पदाचीही जबाबदारी आली. पुढे सप्टेंबर २०२० मध्ये प्रियांका गांधी यांच्याकडे उत्तर प्रदेशचे संपूर्ण प्रभारीपद सोपवण्यात आले.

सुरुवातीच्या काळात धडाडीने काम

पूर्ण उत्तर प्रदेशची जबाबदारी आल्यानंतर प्रियांका गांधी यांनी सुरुवातीच्या काळात धडाडीने काम करण्यास सुरुवात केली होती. लखिमपूर खेरी या ठिकाणी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या पुत्राने शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणानंतर प्रियांका गांधी यांनी पीडित कुटंबांची भेट घेतली होती. तसेच सुरुवातीच्या काळात प्रियांका गांधी उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारवर सडकून टीका करताना दिसत होत्या.

विधानसभा निवडणुकीत अपयश

प्रियांका गांधी यांच्याच नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक लढवण्यात आली होती. या निवडणुकीत प्रियांका गांधी यांनी ४० टक्के जागांवर महिला उमेदवारांना तिकीट दिले होते. ‘लडकी हूँ, लढ सकती हूँ’ या मोहिमेअंतर्गत हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, काँग्रेसला या निवडणुकीत मोठ्या नामुष्कीला सामोरे जावे लागले होते. या राज्यातील एकूण ४०३ जागांपैकी फक्त दोन जागांवर काँग्रेसचा विजय झाला होता.

उत्तर प्रदेशच्या नेत्यांकडून निर्णयाचे स्वागत

उत्तर प्रदेशच्या नेत्यांनी या निर्णयाचे स्वागत केल्याचे दिसत आहे. “२०२२ सालच्या निवडणुकीनंतर प्रियांका गांधी उत्तर प्रदेशमध्ये सक्रिय नव्हत्या. त्यामुळे या निर्णयामुळे आम्हाला आश्चर्य वाटले नाही. आम्ही अविनाश पांडे यांचे काम पहिलेले आहे. आम्हाला त्यांच्यासारखाच नेता हवा होता. गेल्या काही वर्षांत उत्तर प्रदेशमधील काँग्रेसला अनेक दिग्गज सोडून गेलेले आहेत. जे चेहरे पक्षात होते, त्यांनी सक्रियपणे मैदानावर उतरून काम केलेले नाही; त्यामुळे राज्यात पक्षाचा जनाधार कमी झालेला आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदाची जबाबदारी अविनाश पांडे यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे. त्यांच्या येण्याने उत्तर प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल, अशी आशा आहे”, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने दिली.

अविनाश पांडे राहुल गांधी यांचे जवळचे सहकारी

दरम्यान, पांडे हे पक्षाचे खंदे कार्यकर्ते आहेत. विद्यार्थीदशेपासून त्यांनी काँग्रेसचे काम केलेले आहे. त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्यासोबत उत्तर प्रदेशमध्ये काम केलेले आहे. पांडे हे राहुल गांधी यांचे जवळचे सहकारी मानले जातात. पांडे हे ब्राह्मण समाजातून येतात. त्यामुळे पांडे यांची प्रभारीपदी नेमणूक करून काँग्रेसने उत्तर प्रदेशमध्ये जातीय समीकरण साधण्याचा प्रयत्न केल्याचेही म्हटले जात आहे.