प्रबोध देशपांडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सक्तवसुली संचालनालयाचा (ईडी) ससेमिरा मागे लागल्यापासून अडचणीत आलेल्या यवतमाळ-वाशीमच्या शिवसेना खासदार भावना गवळी अखेर शिंदे गटात सहभागी झाल्या आहेत. भावना गवळी यांनी कोट्यवधींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप करून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी वाशीम जिल्ह्यातील त्यांच्या संस्थांना भेटी दिल्या होत्या. या प्रकरणांत ‘ईडी’कडून चौकशी सुरू असल्याने वर्षभर भावना गवळी ‘बॅकफूट’वर होत्या. आता भाजपची ताकद मिळालेल्या शिंदे गटात सहभागी झाल्याने त्यांच्यावरील ‘ईडी’ कारवाईचे काय, असा प्रश्न चर्चिला जात आहे. केंद्रातील ‘महाशक्तीच्या’ पाठबळामुळे खासदार गवळींना देखील ‘क्लीनचिट’ मिळून त्यांचा मंत्रिपदाचा मार्ग मोकळा होईल, अशा ‘भावना’ त्यांच्या समर्थकांमधून व्यक्त होत आहेत.

हेही वाचा- सत्तांतरामुळे लातूर जिल्ह्यातील काँग्रेस टिकवण्याचे अमित देशमुख यांच्यासमोर आव्हान

वाशीम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून सलग पाचव्यांदा लोकसभेत निवडून आलेल्या भावना गवळी गेल्या वर्षभरापासून सक्तवसुली संचालनालयाच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकल्या आहेत. या काळात त्या मतदारसंघापासून लांब राहिल्या. ‘ईडी’कडून त्यांना चौकशीसाठी चार वेळा समन्स बजावण्यात आले. मात्र, त्या चौकशीसाठी उपस्थित राहिल्या नाहीत. दरम्यान, भावना गवळी यांच्या जनशिक्षण संस्था व महिला उत्कर्ष प्रतिष्ठान ट्रस्टमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप आहे. ‘ईडी’ने सप्टेंबर महिन्यात गवळी यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकले होते. त्यानंतर या प्रकरणात सईद खान याला अटक केली. त्याची मालमत्ता देखील जप्त केली. ट्रस्टला बेकायदेशीररित्या कंपनीमध्ये रूपांतरित करण्यासाठी सईद खान यांनी मध्यस्थी केल्याचा आरोप आहे. आपल्या स्वीय सहाय्यकाने संस्थेत कोट्यवधींचा अपहार केला आहे, अशी पोलीस तक्रार भावना गवळी यांनीच २०२० मध्ये केली होती. त्या आधारावर सोमय्या यांनी गवळी यांना लक्ष्य केले होते. सोमय्या यांनी २० ऑगस्ट २०२१ रोजी वाशीम जिल्ह्याचा दौरा करून भावना गवळींच्या संस्थांना भेटी दिल्या होत्या. भावना गवळी व त्यांच्या सहकाऱ्यांनी विविध कंपन्या स्थापन करून १०० कोटींचा घोटाळा केला व ५५ कोटींचा बालाजी पार्टीकल बोर्ड हा कारखाना २५ लाख रुपयात घेतला, असा आरोप, सोमय्या यांनी केला. भावना गवळींकडे इतके पैसे आले कुठून, असा प्रश्न करत १५ दिवसांत त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील, असे सोमय्या म्हणाले होते. त्यानंतर ‘ईडी’ने चौकशी सुरू केली आणि गवळी व सईद यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला. सोमय्या यांच्या वाशीम दौऱ्यात शिवसेना व भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा संघर्ष झाला होता.

हेही वाचा- शिंदे गटाला बेन्टेक्स अन् शिवसेनेला सोने म्हणणारे संजय मंडलिक शिंदे गटात

‘ईडी’ चौकशीच्या निमित्ताने भावना गवळींचे नाव गेले वर्षभर चर्चेत होते. मध्यंतरी त्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेना आमदारांनी पुकारलेल्या बंडानंतर गवळींनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहून भाजपशी युती करण्यासाठी गळ घातली होती. तेव्हापासूनच ‘ईडी’ पिडा टाळण्यासाठी त्या शिंदे गटामार्फत भाजपकडे झुकल्याचे स्पष्ट झाले. राज्यात राजकीय भूकंप आला असतानाच घोटाळे प्रकरणात अटकेत असलेले त्यांचे सहकारी सईद खान यांना मुंबई उच्च न्यायालयाने १ जुलै रोजी जामीन मंजूर केला. त्यामुळे गवळी यांना मोठा दिलासा मिळाला. बंड करताना एकनाथ शिंदे यांनी आपल्या पाठीमागे ‘महाशक्ती’ असल्याचे वक्तव्य केले होते. तीच ‘महाशक्ती’ आता भावना गवळी यांना ‘ईडी’ संकटातून बाहेर काढणार का, यावरून चर्चा रंगली आहे. शिवसेनेच्या १२ खासदारांचा गट एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेला आहे. त्यात सुरुवातीपासून पुढाकार घेणाऱ्या व वरिष्ठ खासदार म्हणून भावना गवळींना मानाचे स्थान आहे. केंद्रातील मंत्रिपदासाठी देखील त्यांचे नाव चर्चेत आहे. मात्र, तत्पूर्वी त्यांच्यावरील ‘ईडी’चौकशीचा डाग पुसला जाणे गरजेचे ठरेल. भाजप समर्थनामुळे भावना गवळींना ‘ईडी’ चौकशीतून ‘क्लीनचिट’ मिळणार का? कथित घोटाळा प्रकरणात खा. भावना गवळींवर कारवाईसाठी आग्रही असलेले व आक्रमक भूमिका घेणारे किरीट सोमय्या व इतर भाजप नेते आता नेमकी काय भूमिका घेणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mp bhavna gawali may get relief from ed enquiry after joining hands with eknath shinde group print politics news pkd
First published on: 22-07-2022 at 10:38 IST