सांगली : काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. मोहन वनखंडे यांनी शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश करून सत्तेची सावलीच विकासासाठी आवश्यक असल्याचे अधोरेखित करत असताना आगामी महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीची एकीकडे महायुतीतील घटक पक्ष मोर्चेबांधणी करत असताना सत्तेचे प्रबळ दावेदार असलेल्या काँग्रेसच्या पांढर्‍या हत्तीला मात्र जाग येईना अशी अवस्था झाली आहे. या घडामोडीकडे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील मात्र त्रयस्थेच्या नजरेतून पाहत असल्याचे दिसत आहे.

प्रा. वनखंडे कालपरवापर्यंत भाजपचे मिरज विधानसभा प्रमुख म्हणून कार्यरत होते. माजी मंत्री तथा मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांचे गेल्या दीड दशकातील अत्यंत निकटचे सहकारी म्हणून पक्षात व मतदार संघात कार्यरत होते. आ. खाडे यांनी जत विधानसभा निवडणूक पहिल्यांदा लढवून पश्‍चिम महाराष्ट्रात पहिला भाजपचा आमदार होण्याचा मान मिळवला. यावेळीही राजकीय मोर्चेबांधणी करत विजयाला कशी गवसणी घालायची याचे आडाखे बांधण्यात प्रा. वनखंडे यांचा वाटा महत्वाचा होता. मात्र आ. खाडे यांच्याकडे जिल्ह्याचे पालकत्व आल्यानंतर दोघांमध्ये बेबनाव निर्माण झाला, यातून एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हणून ओळख असलेली ही जोडी विभक्त झाली. लोकसभा निवडणुकीत भाजपचे संजयकाका पाटील यांना मिरज विधानसभा मतदार संघातून २५ हजाराची पिछाडी मिळाली. यामागे हा बेबनाव तर होताच, पण याचबरोबर भाजपकडून म्हणावे तसे कामही झाले नसल्याचा आरोपही केला जात होता. सहा महिन्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर आ. खाडे यांनी पुन्हा एकदा मिरजेवर आपलेच राज्य असल्याचे सिध्द करत विजय संपादन केला. मात्र, यावेळी त्यांच्यासोबत वनखंडे नव्हते.

यानंतर वनखंडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यासाठी त्यांना विधानसभेच्या उमेदवारीचा शब्द देण्यात आला होता. तथापि, महाविकास आघाडीच्या जागावाटपात मिरजेची जागा शिवसेना ठाकरे गटाला मिळाल्याने वनखंडे यांना उमेदवारीपासून वंचित राहावे लागले. मात्र, पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष पद असूनही पक्ष नेतृत्वाकडून अथवा पक्षाकडून वनखंडे यांना दुय्यमच वागणूक मिळत गेली. स्थानिक पातळीवर विरोधक असलेल्यांना पंगतीला आणि वनखंडेंना मात्र, सोबतीला अशीच अवस्था झाल्याने त्यांनी काँग्रेसचा त्याग करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. महायुतीमध्ये हाही गट असल्याने यावेळी महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीत एकत्र लढतात की स्वतंत्र यावर पुढील राजकीय भविष्य अवलंबून राहणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या तरी महायुती एकसंघपणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे प्रदेश पातळीवरील नेते सांगत असले तरी स्थानिक पातळीवर यामुळे कार्यकर्त्यांना उमेदवारी देताना येणार्‍या अडथळ्यांची शर्यत कशी पार करणार हाही महत्वाचा प्रश्‍न आहे. महायुतीतील सत्तावाटप भाजप व मित्र पक्ष ४८ टक्के शिवसेन (शिंदे) २९ आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष २३ टक्के अशी वाटणी निश्‍चित झाल्याचे सांगितले जाते. महायुतीमधील राष्ट्रवादीत फारशी संधी मिळणे अशक्य तर भाजपची दारे बंद यामुळे प्रा.वनखंडे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला असावा असे दिसते. मात्र, महायुतीच्या झेंड्याखाली किती जणांना संधी मिळणार आणि जागा वाटप कसे होणार हेही महत्वाचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे विधान परिषद सदस्य इद्रिस नायकवडी हेही महायुतीत आहेत, याचबरोबरच सांगली जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील या भाजपमध्ये तर सांगली मिरजेचे आमदार भाजपचे यामुळे महायुतीतच नेत्यांची गर्दी अधिक आहे. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटचे म्हणून ओळखले जाणारे आणि जिल्हा नियोजन मंडळावर वर्णी लागलेले जनसुराज्य शक्ती पक्षाचे समित कदमही आहेत. नेत्यांच्या भाऊ गर्दीमुळे महापालिका निवडणुकीत निवडून येण्यापेक्षा पाडापाडीचे राजकारणच महायुतीच्या मूळावर येते की काय अशी शंका व्यक्त होत असेल तर त्यात वावगे काय ?