पुणे : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील शिवसेना (शिंदे) पक्षाच्या वाढीसाठी माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी ‘कसबा पॅटर्न’प्रमाणे कामाला सुरुवात केल्याने शहरातील भाजपमध्ये अस्वस्थता पसरू लागली आहे. शिवसेना (ठाकरे), काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या तिन्ही पक्षांमध्ये धंगेकर यांनी काम केले असल्याने या पक्षांतील काही पदाधिकारी हे धंगेकरांच्या संपर्कात असल्याने भाजपकडील प्रवेश भरतीला धंगेकरांमुळे अडथळा येत आहे. पुण्यात भाजप स्वबळावर लढण्यासाठी आग्रही असताना मित्रपक्षातील धंगेकर यांना रोखायचे की, त्यांची साथ घ्यायची, याबाबत भाजप आता संभ्रमात पडली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

काँग्रेसचे माजी आमदार धंगेकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांना पुणे महानगरप्रमुख पद देण्यात आले. त्यामुळे पुणे शहरात धंगेकर आणि शहराध्यक्ष नाना भानगिरे असे दोन प्रमुख पदाधिकारी आहेत. भानगिरे यांचे कार्यक्षेत्र हे हडपसर आणि कोंढवा परिसर आहे. मात्र, धंगेकर यांनी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढविल्याने त्यांचा शहरात लोकसंपर्क आहे. आता त्यांनी ‘कसबा पॅटर्न’ प्रमाणे कामाला सुरूवात केली आहे. धंगेकर यांची पक्षाच्या कामकाजाची स्वतंत्र पद्धत आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांची फळी त्यांच्याकडे आहे. फक्त पक्षावर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या कार्यकर्त्यांवर जबाबदारी टाकून काम फत्ते करण्याची त्यांची पद्धत आहे. तसेच विरोधी पक्षातील काही जण त्यांचे खास मित्र असतात. त्यांच्याशी हातमिळवणी करून ते मतदार संघात प्रभाव वाढवित असतात. कसबा विधानसभा मतदार संघात ते या पद्धतीने काम करत आले आहेत. त्यामुळे यांच्या या कामकाजाच्या पद्धतीला ‘कसबा पॅटर्न’ असे संबोधले जाते.

काँग्रेसमध्ये असताना ते या पद्धतीचा अवलंब करत होते. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर ते फार विसंबून रहात नव्हते. त्यांची ही कार्यपद्धती काँग्रेसच्या जुन्या पदाधिकाऱ्यांना पटत नव्हती. त्यामुळे धंगेकर यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. आता शिवसेना शिंदे गटात आल्यानंतर त्यांनी पुन्हा ‘कसबा पॅटर्न’प्रमाणे कामाला सुरुवात केली आहे. धंगेकरांनी शिवसेना (ठाकरे), मनसे आणि काँग्रेस या तीन पक्षांत काम केले असल्याने त्या ठिकाणचे काही पदाधिकारी हे धंगेकर यांच्या संपर्कात आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहरात भाजप ही स्वबळावर महापालिकेच्या निवडणुका लढण्यासाठी तयारी करत आहे. पुणे महापलिकेत ४१ बहुसदस्यीय प्रभाग आहेत. त्यामध्ये चार सदस्यीय ३९ आणि दोन प्रभागांमध्ये प्रत्येकी तीन नगरसेवक अशी नगरसेवकांची संख्या १६२ आहे. या प्रत्येक ठिकाणी उमेदवार उभे करण्याच्यादृष्टीने भाजप तयारीला लागली आहे. गेल्या आठवड्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पश्चिम महाराष्ट्रातील तयारीचा आढावा घेतला. त्यामध्ये पुणे महापालिकेतील तयारीची माहिती घेण्यात आली. पुण्यात स्वबळावर लढण्याच्यादृष्टीने बहुतांश पदाधिकारी हे आग्रही आहेत. मात्र, युतीचा निर्णय हा राज्य पातळीवरील नेत्यांकडून घेतला जाणार आहे. युती न झाल्यास १६२ उमेदवार उभे करावे लागणार आहेत. त्यासाठी भाजपकडून प्रत्येक प्रभागांमध्ये चाचपणी करण्यात येत आहे. त्यामध्ये धंगेकर हे अडथळा ठरत आहेत. धंगेकरांचे समर्थक हे भाजपच्या हाती लागत नसल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे मित्रपक्षातील धंगेकर यांना रोखण्याचे आव्हान भाजपपुढे उभे राहिले आहे.