-मोहनीराज लहाडे

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील बंडाचे सुप्त पडसाद आता नगर शहर आणि जिल्ह्यातही जाणवू लागले आहेत. जिल्ह्यात शिवसेनेचा सध्या एकही आमदार नसला तरी पक्षाची ताकद असलेल्या नगर शहरातील अनेक नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांमध्ये चलबिचल सुरू झाली असून यातील मोठा गट बंडाच्या उंबरठ्यावर असल्याचे मानले जात आहे.

अशा वेळी जिल्ह्यातील नेतृत्वाची उणीव सेनेला भासणारी आहे –

नगर शहर हा तसा एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला. पक्षाचे दिवंगत उपनेते माजी राज्यमंत्री अनिल राठोड यांनी नगर शहरावर दीर्घकाळ एकहाती वर्चस्व ठेवले. त्यामुळे शहरातील नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना महापालिकेच्या माध्यमातून दीर्घकाळ सत्तेचा लाभही झाला. त्यासाठी तत्कालीन शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी वेळोवेळी सक्रिय भूमिकाही बजावली. मात्र राठोड यांच्यानंतर जिल्ह्यात शिवसेनेचे एकमुखी नेतृत्व राहिले नाही. अपक्ष म्हणून निवडून आलेले आमदार शंकरराव गडाख यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला असला तरी जिल्हा शिवसेनेत त्यांचे नेतृत्व अद्याप प्रस्थापित झालेले नाही. त्यामुळे सध्याच्या बदलत्या राजकीय परिस्थितीत एकनाथ शिंदे यांच्या हाकेला ऐनवेळेला प्रतिसाद देणारे अनेक जण असतील, असेच संकेत सध्या मिळत आहेत. अशा वेळी जिल्ह्यातील नेतृत्वाची उणीव सेनेला भासणारी आहे. त्यातूनच जिल्ह्यात आमदारच नसल्याने शिवसेनेची झाकली मूठ तशीच राहिली आहे.

सलग दोनवेळा शिवसेनेचे उमेदवार निवडून आले असले तरी … –

नगर शहर आणि पारनेरचा अपवाद वगळता शिवसेनेचे अस्तित्व जिल्ह्यात फारसे नाही. आतातर नगर शहर आणि पारनेर हे दोन्ही मतदारसंघ देखील शिवसेनेच्या हातून निसटलेले आहेत. जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा मतदारसंघात सलग दोनवेळा शिवसेनेचे उमेदवार निवडून आले असले तरी तो सेनेचा म्हणणे धाडसाचे ठरते. कारण दोन्ही वेळेस सेनेला लागलेली ही लॉटरीच म्हणावी लागते. याशिवाय या मतदारसंघातील आपापल्या भागांवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजीमंत्री बाळासाहेब थोरात व भाजपचे ज्येष्ठ नेते, माजीमंत्री राधाकृष्ण विखे यांचेच वर्चस्व आहे.

शिंदे यांच्या सक्रियतेतून शिवसेनेला महापालिकेत सत्ता मिळाली –

एकेकाळी कम्युनिस्टांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा जिल्हा काँग्रेस, राष्ट्रवादी असा प्रवास करत भाजप-शिवसेना युतीच्या प्राबल्याखाली आला होता. युती तुटल्यानंतर तो पुन्हा राष्ट्रवादीच्या वर्चस्वाखाली गेला. यापूर्वीच्या शिवसेनेमधील बंडाला जिल्ह्यातून प्रतिसाद मिळाला नसल्याचे वास्तव असले तरी सध्याची शिवसेनेची जिल्ह्यातील परिस्थिती तशी राहिली नाही हेही एकनाथ शिंदे यांच्या उठावाने दाखवून दिले आहे. जसा सेनेला जिल्ह्यात हक्काचा मतदारसंघ नाही, तसा तो भाजपलाही (काही प्रमाणात पाथर्डी अपवाद वगळता) नाही. मात्र इतिहास असा आहे, की युती झाली तर मात्र जिल्ह्यात भाजप-सेनेचे प्राबल्य वाढते. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शिवसेना पदाधिकाऱ्यांशी, कार्यकर्त्यांशी एकनाथ शिंदे यांचा थेट फारसा संबंध आला नाही. मात्र तशी परिस्थिती नगर शहरात नाही. शिंदे व शिवसेनेच्या नगरसेवकांचा वेळोवेळी संपर्कात राहिले आहेत. शिंदे यांच्या सक्रियतेतून शिवसेनेला महापालिकेत सत्ता मिळालेली आहे. राठोड यांची ताकद कमी पडली तेथे शिंदे यांच्या ताकदीची मदत झाली आहे.

… त्यामुळे शिंदेंना प्रतिसाद देणारे अनेक जण पुढे येतील –

त्यातूनच सेनेतील बंडाच्या पहिल्या दिवशी स्वीकृत नगरसेवक मदन आढाव यांनी एकनाथ शिंदे यांच्या हाकेला प्रतिसाद दिला, नंतर श्रीमती शीला शिंदे यांना महापौर पद मिळवून दिल्याची जाणीव ठेवत ज्येष्ठ नगरसेवक अनिल शिंदे यांनीही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याचा आनंदोत्सव साजरा केला. बंड पुकारल्याबद्दल शिंदे यांचे अभिनंदन करणारा फलक बोल्हेगाव उपनगरातील शिवसैनिकांनी झळकावला. एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असताना त्यांनी महापौर रोहिणी संजय शेंडगे यांच्या प्रस्तावातील रस्त्यांसाठी ३५ कोटींचा निधी मंजूर केलेला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालावयाचे ठरवल्यास त्यांना प्रतिसाद देणारे अनेक जण पुढे येतील.

शहर सेनेत एक वेगळीच खदखद –

याशिवाय शहर सेनेत एक वेगळीच खदखद धुमसते आहे. राष्ट्रवादीच्या पाठबळावर सेनेने महापौर पद मिळवले आहे. केडगाव उपनगरातील शिवसैनिकांचे दुहेरी हत्याकांड घडल्यानंतर लगेचच हा पाठिंबा घेतला गेला, त्यावरून सेनेच्या एका गटात मोठी नाराजी आहे, ती वेळोवेळी व्यक्तही होत असते. सेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांच्या भूमिकेवर संशय घेत नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचा गट त्यांच्यावर जाहीरपणे आरोपही करतो आहे. त्यातूनच कोरगावकर यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहनही करण्यात आले. एकूणच एकनाथ शिंदे यांना पोषक असे वातावरण शहर शिवसेनेत तयार झालेले आहे. वात शिलखलेली आहे, केवळ ठिणगी चेतन्याची आवश्यकता आहे. भडका केव्हाही होऊ शकतो.