Maharashtra Top 5 Political Breaking News Today : आज दिवसभरात महाराष्ट्रात अनेक महत्वाच्या राजकीय घडामोडी घडल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी धाराशिवमध्ये भाजपा आणि शिंदे गटातील वाद चव्हाट्यावर आला. २०२९ पर्यंत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना स्वगृही परतल्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा दावा आमदार रोहित पवार यांनी केला. भाजपाच्या नेत्या नवनीत राणा यांना अज्ञात व्यक्तीने सामूहिक अत्याचाराची व जीवे मारण्याची धमकी दिली. वंदे मातरम बंधनकारक करणे योग्य नाही नसल्याचे म्हणणाऱ्या अबू आझमी यांच्यावर भाजपाच्या नेत्यांनी टीकेचा भडिमार केला. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शेतकरी आंदोलकांची भेट घेऊन राज्य सरकार सूचक इशारा दिला. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…

भाजपा शिंदे-गटात वादाची घंटा

राज्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे. या निवडणुकीआधी सत्ताधारी महायुतीतील भाजपा आणि शिंदे गटात वादाची घंटा वाजली आहे. धाराशिव शहरातील ११६ कोटी रुपये रस्ते निर्माणाच्या कार्यरंभ आदेशास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागाने स्थगिती दिली आहे. शिंदे गटाचे नेते तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दोन वेळा लेखी तक्रार केल्यानंतर ही स्थगिती देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. तत्पूर्वी हा निधी आपण आणला म्हणून भाजापचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे गावभर अभिनंदनाचे फलक लावले होते. या घटनेमुळे पाटील आणि सरनाईक यांच्यातील वादाचा तिसरा अंक सुरू झाल्याचे मानले जात आहे.नगरपालिका व जिल्हा परिषदा निवडणुकीपूर्वी सत्ताधाऱ्यांमधील वाद चव्हाट्यावर आल्याने धाराशिवच्या भाजपच्या मंडळीमध्ये अस्वस्थता आहे.

शिंदे-पवार स्वगृही परतणार?

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा दावा केला. “भारतीय जनता पक्षाला आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची गरज राहिलेली नाही, त्यामुळे २०२९ पर्यंत त्यांना स्वगृही परतण्याशिवाय पर्याय नाही. भाजपा हा वापर करून फेकून देणारा पक्ष आहे. राजकारणाची समज असलेल्या प्रत्येक व्यक्तीला याची जाणीव आहे. केंद्रीय गृहमंत्री मुंबईत येऊन महाराष्ट्रात भाजपाला कुणाच्या कुबड्याची गरज नसल्याचे म्हणतात.याचा अर्थ अजितदादा व एकनाथ शिंदे यांची गरज आता भाजपाला राहिलेली नाही”, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. दरम्यान, बनावट आधार कार्ड तयार केल्याच्या संदर्भात भाजपाच्या कार्यकर्त्याने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आमदार रोहित पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

आणखी वाचा : नितीश कुमार यांचा शिंदे होणारच नाही; महाराष्ट्राचा दाखला देत आरजेडीच्या नेत्याने काय सांगितले?

नवनीत राणा यांना गँगरेपची धमकी

भाजपाच्या नेत्या आणि अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांना हैदराबादमधील एका व्यक्तीने सामूहिक अत्याचार तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. स्पीड पोस्टद्वारे ही धमकी देण्यात आली असून याप्रकरणी राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जावेद नावाच्या व्यक्तीने पाठवलेल्या या पत्रात ‘माझ्याकडे ५० जणांची टोळी (गँग) आहे, तुझ्यावर गँगरेप करून मारून टाकू,’ असा आक्षेपार्ह मजकूर आहे. नवनीत राणा यांची ही पहिली वेळ नसून यापूर्वीही त्यांना अनेकदा धमक्या आल्या आहेत. सध्या हा गुन्हा धमकी व भडकावणाऱ्या पत्रव्यवहाराचा प्रकार म्हणून नोंदवण्यात आला आहे. तपासादरम्यान आरोपीचा प्रत्यक्ष संपर्क किंवा अन्य ठोस पुरावे मिळाल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

अबू आझमींवर भाजपाचे नेते संतापले

देशाचे राष्ट्रीय गाण ‘वंदे मातरम्’च्या निर्मितीला १५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने ३१ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर या कालावधीत राज्यातील शाळांमध्ये वंदे मातरम् या गीताच्या सर्व कडव्यांचे गायन, गीताचा इतिहास सांगणाऱ्या प्रदर्शनाचे आयोजन करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले. मात्र समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी त्यावर आक्षेप घेतला असून वंदे मातरम बंधनकारक करणे योग्य नसल्याचे म्हटले. त्यांच्या या भूमिकेवर भाजपाच्या नेत्यांनी संताप व्यक्त केला असून मंगलप्रभात लोढा आणि नवनाथ बन यांनी आझमींना लक्ष्य केले आहे. भारत माता की जय आणि वंदे भारतची ॲलर्जी असेल तर अबू आझमी यांनी देश सोडून पाकिस्तानात जावे, अशी टीका त्यांनी केली आहे.

हेही वाचा : Ranjitsinh Naik Nimbalkar : महिला डॉक्टरच्या आत्महत्येवरून रणजितसिंह निंबाळकर का अडचणीत आले?

शेतकरी आंदोलनातून जरांगें सरकारला इशारा

प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी आंदोलन सुरू केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर चर्चा होऊनही या आंदोलनावर अद्याप तोडगा निघालेला नाही. यादरम्यान मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी ‘शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळालीच पाहिजे’ अशा घोषणा देण्यात आल्या. माध्यमांशी संवाद साधताना जरांगे यांनी राज्य सरकारवर टीकेचा भडिमार केला. “गेल्या ७५ वर्षांत सर्वांनी मिळून शेतकऱ्यांना लुटले आहे. शेतकऱ्यांच्या न्याय हक्क मिळवण्यासाठी सरकारविरोधात प्रतिडाव टाकला गेला आहे. सरकारला प्रतिडाव टाकून प्रतिउत्तर देण्याची गरज आहे”, असे जरांगे यांनी म्हटले. दरम्यान, संतप्त शेतकऱ्यांनी सरकारविरोधात उद्या रेल रोको आंदोलनाची घोषणा केली होती. मात्र उच्च न्यायालयाने आदेश जारी करत या आंदोलनाला ब्रेक लावला आहे.