नागपूर : बरोबर एक महिना आधी म्हणजे २० ऑगस्टला नवी दिल्लीत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या राज्यसभा सदस्य सुनेत्रा पवार या भाजप खासदार कंगणा रणौत यांच्या निवासस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महिला शाखा राष्ट्र सेविका समितीच्या बैठकीत सहभागी झाल्या होत्या. त्यावरून राजकीय वादळही उठले होते. त्यावर सुनेत्रा पवार यांनी खुलासा करताना.

“ या भेटीमागे कोणताही राजकीय हेतू नव्हता, तर संघटनेची कार्यपद्धती समजून घेण्यासाठी उपस्थित होते.” असे स्पष्ट केले होते. त्यानंतर आता एक महिन्याने राष्ट्रवादीचे चिंतन शिबीरच संघ मुख्यालयी म्णजे नागपुरात उद्या (१९ सप्टेबर) होत आहे. सुनेत्रा पवार यांना संघाचे कार्य आणि त्यांची कार्यपध्दती समजून घेण्याची ही उत्तम संधी आहे. त्यामुळे त्या किंवा त्यांच्या पक्षाचे नेते चिंतन शिबिराच्या निमित्ताने संघ मुख्यालयाला भेट देणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

पश्चिम महाराष्ट्रापुरता मर्यादित पक्ष, अशी हेटाळणी भाजपकडून पूर्वी एकसंघ राष्ट्रवादीची केली जात होती. त्याच राष्ट्रवादीत फूट पाडून अजित पवार गटाला भाजपने सत्तेत सहभागी करून घेतले. त्याच गटाचे चिंतन शिबीर शुक्रवारी संघ-भाजपच्या बालेकिल्ल्या होण हा सुद्धा या दोन पक्षातील परस्परांच्या आणखी निकट येण्याचे संकेत मानले जाते.

या पार्श्वभूमीवर, सुनेत्रा पवार यांची एक महिन्या पूर्वी दिल्लीतील आरएसएसच्या महिला शाखेच्या कार्यक्रमातील उपस्थिती आणि आता पक्षाचे शिबीरच संघ मुख्यालयी होणे याचा सबंध जोडला जात आहे. दिल्लीत ‘संघ’ आणि नागपूरमध्ये ‘चिंतन’ या अनुषंगाने राष्ट्रवादीच्या शिबिराकडे बघितले जात आहे. भाजपसोबत सत्तेत सहभागी झालो असलो तरी आम्ही फुले-शाहू-आंबेडकर यांची विचारधारा सोडली नाही, असे खुद्द अजित पवार यांनीच अनेकदा जाहीर केले आहे.

२०१४ नंतर केंद्र आणि राज्यात भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यापासून नागपूरच्या संघ मुख्यालयाला भेट देणाऱ्या अतिमहत्वाच्या व्यक्तींची संख्या वाढली आहे. संघ कार्य व त्यांचे सामाजिक उपक्रम समजून घेण्यासाठीच या भेटी असल्याचा दावा भेट देणारे करतात. सुनेत्रा पवार यांनी तर त्यांच्या दिल्लीतील संघ संस्थेच्या भेटी मागे सामाजिक कारणच होते हे स्पष्ट केले. त्यामुळे त्या नागपुरात आल्यावर संघ मुख्यालयी जाणार का हा प्रश्न उपस्थित होतो. .

दरम्यान दरवर्षी नागपूरमध्ये होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या काळात भाजप व सत्ताधारी पक्षाच्या आमदारांसाठी संघाच्या हेडगेवार स्मृती मंदिराला भेट हा कार्यक्रम ठरलेला असतो.भाजपसोबत राष्ट्रवादी सत्तेत सहभागी झाल्यानंतरही तो झाला, पण राष्ट्रवादीचे आमदार त्यापासून दूर होते. ते गेले हे विशेष. पण अलीकडच्या काळात राष्ट्रवादीच्याच अहिल्यानगर जिल्ह्यातील एका आमदाराने कट्टर हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे. याकडे पक्षात नवा विचार प्रवाह सुरू झाल्याचे संकेत मानले जाते. या सर्व अनुषंगाने राष्ट्रवादीच्या नागपूरच्या चिंतन शिबिराकडे बघितले जात आहे. जर अजित पवार गटाचे काही नेते रेशीमबागला गेले, तर हे त्यांचा भाजप-संघसोबतचा वाढता जवळिकेचा स्पष्ट संकेत ठरेल, अशी चर्चा आहे.