एजाजहुसेन मुजावर

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील माढ्याचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ आमदार बबनराव शिंदे आणि मोहोळचे माजी आमदार राजन पाटील-अनगरकर यांनी सोमवारी नवी दिल्लीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यामुळे उभयतांच्या भाजप प्रवेशाची चर्चा प्रसार माध्यमांत सुरू झाली. परंतु दोघांनीही आपण राष्ट्रवादीतच आहोत असे सांगितले असले तरी भाजप प्रवेश केल्यास सर्वांना कळेलच, असेही स्पष्ट केल्यामुळे राष्ट्रवादीच्या या दोन्ही नेत्यांबद्दल तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

Sharad pawar ajit pawar
शरद पवारांची भाजपाबरोबरची युती का रखडली? अजित पवारांनी सांगितली अंदर की बात; म्हणाले, “चर्चेकरता निघालो, पण…”
sharad pawar group on prafull patel statement
“शरद पवार भाजपाबरोबर येण्यास अनुकूल”, प्रफुल्ल पटेलांच्या दाव्यावर राष्ट्रवादीच्या पवार गटाकडून स्पष्टीकरण; म्हणाले, “हा प्रस्ताव…”
Udayanraje Bhosale
“चुका करणारे लोक…”, ईडीच्या कारवायांवरुन उदयनराजेंचं वक्तव्य; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबत म्हणाले…
war Of words between amol kolhe and shivajirao adhalrao patil over shirur lok sabha constituency
शिवाजीराव आढळरावांच्या ‘राष्ट्रवादी’तील प्रवेशानंतर ‘शिरूर’मध्ये आता शब्दिक युद्ध

आमदार बबनराव शिंदे व राजन पाटील हे दोघेही सोलापूर जिलह्यातील राष्ट्रवादीचे मोठे नेते तसेच साखर कारखानदार आहेत. माढा मतदारसंघातून १९९५ सालापासून सलग सहाव्यांदा विधानसभेवर प्रतिनिधित्व करणारे आमदार बबनराव शिंदे यांच्या कुटुंबीयांचे तर सहकारी व खासगी असे लहानमोठे सहा साखर कारखाने आहेत. करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय शिंदे यांचे ते ज्येष्ठ बंधू आहेत. माढ्यातील बंद अवस्थेतील जगदंबा मागासवर्गीय शेतकरी सहकारी सूतगिरणीची किमती जमीन बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह यांनी खरेदी केली होती. यासह अन्य कथित आक्षेपार्ह प्रकरणांमध्ये शिंदे पिता-पुत्राना केंद्रीय सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अलिकडेच नोटीस बजावली होती. या नोटिशीनुसार दोघेही ईडी कार्यालयात चौकशीला सामोरे गेले होते. हे प्रकरण सध्या प्रलंबित आहे.

हेही वाचा… सोनियांच्या ‘’ईडी’’ चौकशी विरोधातील आंदोलनाला काँग्रेसचा ‘नैतिक मुलामा’

दुसरीकडे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील-अनगरकर हे आणि त्यांचे कुटुंबीयसुध्दा त्यांच्या नक्षत्र डिस्टलरी मद्य निर्मिती कारखान्यातील कथित आक्षेपार्ह प्रकरणात अडकले आहेत. त्यांच्याशी संबंधित लोकनेते बाबूराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या खासगीकरणाच्या प्रकरणातही शासनाकडे तक्रारी विरोधकांनी केल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर दुसरीकडे राजन पाटील यांना व त्यांच्या कुटुंबावर राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील हे सातत्याने टीकास्त्र सोडत आहेत. जनता दरबाराच्या नावाखाली उमेश पाटील मोहोळ तालुक्यात गावोगावी फिरून राजन पाटील यांच्यावर निशाणा साधत आहेत. त्याविषयी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे दाद मागूनही उमेश पाटील यांना पक्षश्रेष्ठींकडून साधी समजही दिली जात नाही. त्यामुळे राजन पाटील कुटुंबीय गेल्या काही महिन्यांपासून पक्षात अस्वस्थ आहेत. त्यांना उपद्रव देणारे उमेश पाटील हे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक मानले जातात.

राजन पाटील यांचे वडील बाबूराव पाटील-अनगरकर हे शेकापचे नेते होते. मोहोळ तालुक्यात त्यांचा मोठा दरारा आणि दबदबा होता. अनेकवेळा ते आमदार झाले होते. त्यांच्या पश्चात पुत्र राजन पाटील यांनी १९८५ पासून सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून सार्वजनिक जीवनात पदार्पण केले होते. सुरुवातीला पुरेसा अनुभव नसतानाही ते सलग पाच वर्षे जिल्हा बँकेचे अध्यक्ष होते. १९९५ साली ते प्रथमच विधानसभेवर निवडून गेले. २००९ साली त्यांचा हक्काचा मोहोळ मतदारसंघ राखीव झाल्याने त्यांची आमदारकीची मालिका खंडित झाली. तथापि, पुढे त्यांच्याच ताकदीमुळे मोहोळमधून रमेश कदम व माजी मंत्री लक्ष्मण ढोबाळे हे विधानसभेवर निवडून गेले. विद्यमान आमदार यशवंत माने यांनाही निवडून आणण्याचे प्रमुख श्रेय राजन पाटील यांनाच दिले जाते. मागील २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीचा पडता काळ असतानाही राजन पाटील यांनी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निष्ठा राखली होती. तद्पश्चात राज्यात सत्तेवर येऊनही राष्ट्रवादीकडून राजन पाटील यांचे योग्य पुनर्वसन न केल्याची खंत त्यांच्या समर्थकांना आहे. त्यातच आता उमेश पाटील हे सातत्याने राजन पाटील व कुटुंबावर टीकास्त्र सोडत आहेत. दरम्यान, राज्यात नुकत्याच झालेल्या सत्तांतरानंतर राजन पाटील यांच्या मुलांनी समाज माध्यमांमध्ये सक्रिय होऊन भाजप प्रवेशाचे संकेत दिले आहेत.

हेही वाचा… शिवसेनेला ४८ तासात हादरेही अन् निष्ठावंतांमुळे दिलासाही

माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांचे वडील विठ्ठलराव शिंदे हेदेखील पूर्वी आमदार होते. त्यांच्या निधनानंतर शिंदे कुटुंबीयांना राजकारणात मर्यादा आल्या होत्या. ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली बबनराव शिंदे पुढे सक्रिय होऊन जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा परिषद, जिल्हा दूध संघ या माध्यमातून त्यांना संधी मिळत गेली. त्यात पुन्हा १९९५ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत माढ्याचे तत्कालीन शरदनिष्ठ आमदार विनायकराव पाटील यांच्या विरोधात बबनराव शिंदे यांनी बंड केले. या वेळी मोहिते-पाटील यांनी ताकद दिल्यामुळे अपक्ष आमदार म्हणून ते निवडून आले. यानंतर शिंदे यांनी मागे फिरून बघितले नाही. दरम्यान, शिंदे हे मोहिते-पाटील यांची साथ सोडून शरद पवार यांच्या गटात गेले. पवारांनीही जिल्ह्यातील राजकारणात मोहिते-पाटील गटाला शह देण्यासाठी बबनराव शिंदे व त्यांचे बंधू संजय शिंदे यांना मोठे बळ दिले.

सध्याच्या बदलत्या राजकीय वातावरणात शिंदे कुटुंबीयांना माढा तालुक्यात भाजपने घेरण्याचा प्रयत्न चालविला आहे. मागील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बबनराव शिंदे हे राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मानसिकतेत होते. आता माढ्यात स्थानिक पातळीवरील शिंदे विरोधक संजय कोकाटे, शिवाजी कांबळे आदींना रसद पुरविली जात आहे. विशेषतः शिवाजी कांबळे यांच्या गळ्यात भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाची माळ घालण्याच्याही हालचाली सुरू झाल्या आहेत. यातच ईडीच्या चौकशीचा फेरा असल्यामुळे शिंदे कुटुंबीय भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे.

दरम्यान नवी दिल्लीत महाराष्ट्र सदनामध्ये माढ्याचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ आमदार बबनराव शिंदे व मोहोळचे माजी आमदार राजन पाटील-अनगरकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यामुळे उभयतांच्या भाजप प्रवेशाची चर्चा जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार बबनराव शिंदे यांना विचारले असता त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिल्यामुळे त्यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाच्या सार्वत्रिक चर्चेला बळ मिळाले आहे. त्यांच्या या भेटीवेळी माढ्याचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे देखील उपस्थित होते. त्यांनीही आमदार शिंदे व राजन पाटील आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीत भाजप प्रवेशावर चर्चा झाली नाही. मात्र योग्य वेळ आल्यानंतर त्यांचा भाजप प्रवेश नक्की होईल, असेही स्पष्ट केले.

दरम्यान, माढा तालुक्यात शिंदे कुटुंबीयांनी भाजप प्रवेशाची चर्चा निराधार असून आपली निष्ठा शरद पवार व अजित पवार यांच्यावर कायम असल्याचा निर्वाळा दिला आहे. मात्र त्याचवेळी माढ्यात शिंदे समर्थकांनी समाज माध्यमांमध्ये ‘जय श्रीराम’ चा पाठ चालविला आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत निश्चितच काही राजकीय घडामोडी घडणार असल्याची अटकळ राजकीय विश्लेषकांनी बांधली आहे.