मणिपूरमध्ये वर्षभरापासून कुकी आणि मैतेई या समाजांत संघर्ष सुरू आहे. त्याचा परिणाम आता लोकसभा निवडणुकीवरही दिसू लागला आहे. आज (बुधवार, २७ मार्च) पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. मात्र, अद्याप बाह्य मणिपूरच्या जागेसाठी कुकी समाजातील एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही. त्यामुळे विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मणिपूरमध्ये १९ एप्रिल व २६ एप्रिल अशा दोन टप्प्यांत मतदान होणार आहे.
हेही वाचा – कंगनाविरोधात हिमाचलमधील काँग्रेस नेत्यांबरोबरच ‘राजघराणी’ एकत्र?
२००९ पासून कुकी समाजातील उमेदवाराने नेहमीच लोकसभेची जागा लढवली आहे. मात्र, एक वर्षापासून सुरू असलेल्या जातीय संघर्षामुळे मणिपूरमधील कुकी आणि मैतेई हे दोन्ही समाज एकमेकांविरोधात उभे राहिले आहेत. सोमवारी संध्याकाळी कुकी समाजासाठी काम करणाऱ्या इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फोरमने एक परिपत्रक जारी करीत कुकी समुदायातील कोणत्याही व्यक्तीने उमेदवारी अर्ज दाखल करू नये, असे म्हटले आहे. तसेच आम्ही उमेदवार उभा करणार नसलो तरी लोकांनी त्यांना हव्या असलेल्या उमेदवाराला मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
२०२२ मध्ये स्थापन झालेल्या कुकी पीपल्स अलायन्स पक्षानेही लोकसभा निवडणुकीत उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना पक्षाचे सरचिटणीस लालम हँगशिंग म्हणाले, “आम्हाला कोणत्याही मोठ्या पक्षाचा पाठिंबा नाही. तसेच आमची संख्याही मर्यादित आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत आम्ही उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याशिवाय आम्हाला कुकी समाजाची १०० टक्के मते मिळणार नाहीत, अशी शंका आहे. जर आम्ही निवडणूक लढवली, तर इतर लहान संघटनाही निवडणूक लढण्यासाठी तयार होतील.”
याशिवाय या संदर्भात बोलताना कुकी आयएनपीआय मणिपूरचे प्रवक्ते थांगमिनलेन किपगेन म्हणाले, “निवडणूक न लढविण्याचा निर्णय म्हणजे आम्ही निवडणुकीवर बहिष्कार टाकतोय, असा याचा अर्थ नाही. खरं तर आम्ही आमच्या मतदानाच्या आणि निवडणूक लढविण्याच्या अधिकाराशी तडजोड करतो आहोत. कुकी समाजाचे जवळपास ३० टक्के नागरिक आपली घरं सोडून गेली आहेत. अशा परिस्थितीत उमेदवार उभे करणं शहाणपणाचं नाही. आमचा उमेदवार जिंकून येण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे.“
हेही वाचा – प्राप्तिकर विभाग काँग्रेसकडून १३५ कोटींनंतर ५२४ कोटी वसूल करण्याच्या तयारीत, निवडणुकीपूर्वीच मोठा फटका बसणार
मणिपूरमध्ये लोकसभेच्या ‘अंतर्गत मणिपूर’ व ‘बाह्य मणिपूर’ अशा दोन जागा आहेत. त्यासाठी अनुक्रमे १९ एप्रिल व २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यामध्ये अंतर्गत मणिपूर लोकसभा मतदारसंघांतर्गत राज्यातील एकूण ६० पैकी ३२ विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या ठिकाणी मैतेई समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे; तर बाह्य मणिपूर लोकसभा मतदारसंघाची जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव आहे. यापूर्वी कुकी आणि नागा समाजाच्या उमेदवाराने या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
काँग्रेसने बाह्य मणिपूरमध्ये उखरुलचे माजी आमदार अल्फ्रेड के. आर्थर यांना उमेदवारी दिली आहे; तर भाजपाने ही जागा त्यांचा मित्रपक्ष असलेल्या नागा पीपल्स फ्रंटला दिली आहे. त्यांनी या ठिकाणी भारतीय महसूल सेवेतील निवृत्त अधिकारी काचुई टिमोथी झिमिक यांना उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे दोन्ही उमेदवार नागा समुदायाचे आहेत.