Salman Khurshid on BJP Restoring Article 370 : ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर काँग्रेसमधील काही नेते केंद्रातील भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या धोरणांना पाठिंबा देताना दिसून येत आहेत. दोन दिवसांपूर्वी, तिरुअनंतपूरमचे खासदार शशी थरूर यांनी पनामा दौऱ्यावर असताना ऑपरेशन सिंदूरचं कौतुक करून केंद्र सरकारवर स्तुतीसुमनं उधळली होती. आता काँग्रेसच्या आणखी एका ज्येष्ठ नेत्याने जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटविण्याच्या केंद्राच्या निर्णयाचं कौतुक केलं आहे. विरोधीपक्षातील नेते सत्ताधाऱ्यांचं कौतुक करीत असल्याने काँग्रेसमध्ये नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
‘ऑपरेशन सिंदूरनंतर’ पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी परदेशात गेलेल्या केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात काँग्रेसच्या दोन ज्येष्ठ नेत्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. तिरुअनंतरपूरमचे खासदार शशी थरूर यांच्याकडे एका शिष्टमंडळाचं नेतृत्व देण्यात आलं आहे. तर माजी परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद हे जेडीयूचे खासदार संजय कुमार झा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात भाग आहेत. शुक्रवारी इंडोनेशियाच्या जकार्ता शहरातील विचारवंत आणि शैक्षणिक समुदायाला संबोधित करताना सलमान खुर्शीद यांनी केंद्र सरकारच्या कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला.
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याकडून पंतप्रधानांच्या निर्णयाचं कौतुक
“काश्मीरमध्ये बऱ्याच काळापासून एक मोठी गंभीर समस्या होती. कलम ३७० मुळे असं वाटत होतं की, हा भाग देशाच्या इतर भागांपेक्षा वेगळा आहे; पण केंद्र सरकारने चांगला निर्णय घेऊन ही समस्या कायमची संपवली. या निर्णयानंतर जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका घेण्यात आल्या आणि त्यात ६५ टक्के मतदारांनी मतदान केले. आज काश्मीरमध्ये निवडून आलेलं सरकार सत्तेत आहे, त्यामुळे जे काही घडलं त्यावर लोक आनंदी आहेत. आम्हाला काश्मीरमधील समृद्धी परत आणायची आहे,” असं म्हणत सलमान खुर्शीद यांनी मोदी सरकारने घेतलेल्या कलम ३७० रद्दच्या निर्णयाचं कौतुक केलं आहे.
आणखी वाचा : ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर काँग्रेसमधील मतभेद चव्हाट्यावर का आले आहेत?
कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाला काँग्रेसचा विरोध?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने ऑगस्ट २०१९ मध्ये जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटविण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. काँग्रेसने सुरुवातीला या निर्णयाला विरोध केला. मात्र, त्यानंतर पक्षातील अनेक नेत्यांच्या मताचा विचार करून त्यांनी आपली भूमिका थोडक्यात बदलली. काँग्रेस पक्ष काही काळ जम्मू काश्मीरच्या ‘गुपकर’ आघाडीचा भाग होता. या आघाडीत नॅशनल कॉन्फरन्स, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी आणि पीपल्स कॉन्फरन्स पार्टीचाही समावेश होता. ऑगस्ट २०२० मध्ये या आघाडीने एक संयुक्त निवेदन जारी करून जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम पुन्हा बहाल करण्यासाठी प्रयत्न करणार, असे जाहीर केले. देशभरातून काँग्रेसवर टीकेची झोड उठल्यानंतर या आघाडीशी आमचा काहीही संबंध नाही असं त्यांनी स्पष्ट केले.
भाजपा नेत्यांकडून काँग्रेसवर टीका
दरम्यान, सलमान खुर्शीद यांनी काश्मीरमधून कलम ३७० हटविण्याच्या केंद्राच्या निर्णयाचं जाहीरपणे समर्थन केल्यानंतर भाजपा नेत्यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं. पुरीचे खासदार व भाजपा प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले की, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचं हे वक्तव्य लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींपर्यंत पोहोचवलं पाहिजे. भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला म्हणाले, “सलमान खुर्शीद यांनी कलम ३७० हटविण्याच्या निर्णयाचं स्वागत केल्यानंतर काँग्रेस त्यांना भाजपाचा ‘सुपर प्रवक्ता’ म्हणून घोषित करणार नाही अशी मी आशा करतो.” पुनावाला यांचं हे वक्तव्य काँग्रेस प्रवक्ते उदित राज यांना उद्देशून होतं. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी केंद्र सरकारचं कौतुक केल्यानंतर उदित राज यांनी त्यांना थेट ‘भाजपाचे सुपर प्रवक्ते’ म्हणून संबोधलं होतं.
पाकव्याप्त काश्मीर भारतात सामील होणार?
‘दी इंडियन एक्स्प्रेस’ने यासंदर्भात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. ‘एएनआय’च्या वृत्तानुसार, जकार्ता येथे बोलताना सलमान खुर्शीद यांनी असेही सांगितले, “पाकिस्तानने पाकव्याप्त काश्मीर रिकामा करून तो भारताला परत दिला पाहिजे, असा ठराव भारतीय संसदेत मंजूर करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर जम्मू-काश्मीरच्या विधानसभेतही त्या भागासाठी राखीव जागा ठेवण्यात आलेल्या आहेत. पाकव्याप्त काश्मीर भारतात सामील करून घेण्याचे केंद्र सरकारचे प्रयत्न आहेत.”
हेही वाचा : Maharashtra Politics : एकनाथ शिंदे-अजित पवारांच्या बालेकिल्ल्यावर भाजपाचा डोळा? महायुतीत नेमकं काय घडतंय?
“पाकिस्तानने भारताबरोबर विश्वासघात केला”
पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर भारताने केलेल्या लष्करी कारवाईचा उल्लेख करताना सलमान खुर्शीद म्हणाले, “देशातील प्रत्येक कुटुंब सुरक्षित राहावं यासाठी आम्ही ही कारवाई केली आहे. दहशतवाद्यांना खतपाणी घालू नका, अन्यथा गंभीर परिणामाला सामोरे जावे लागेल, असा इशाराच भारताने पाकिस्तानला दिला आहे. “काश्मीरच्या मुद्द्यावरून भारताने पाकिस्तानबरोबर अनेकदा चर्चा व वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला गेला, पण प्रत्येकवेळी त्यांनी भारताचा विश्वासात केला. पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांची तळे करण्यासाठीच ऑपरेशन सिंदूर राबविण्यात आले. पाकिस्तानने या कारवाईला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला मात्र, भारतीय जवानांनी तो यशस्वीरित्या हाणून पाडला,” असंही सलमान खुर्शीद यांनी यावेळी सांगितलं.
ऑपरेशन सिंदूर’नंतर काँग्रेसमध्ये फूट?
दरम्यान, केंद्र सरकारच्या शिष्टमंडळाबरोबर परदेशात गेलेल्या काँग्रेसच्या दोन ज्येष्ठ नेत्यांनी केंद्र सरकारचं कौतुक केल्याने विरोधीपक्षावर टीका करण्यासाठी भाजपाच्या हाती आयतं कोलीत सापडलं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार शशी थरूर यांच्यापाठोपाठ माजी परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’चे कौतुक केल्यामुळे भाजपाच्या नेत्याला विरोधकांवर टीका करण्याची आणखीच संधी मिळाली. थरूर यांनी मोदी सरकारच्या दहशतवादविरोधी भूमिकेचं मुद्देसूद समर्थन केल्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी आहे. तिरुवनंतपुरमचे खासदार शशी थरूर हे “भाजपाचे सुपर प्रवक्ते” होण्यासाठी पात्र आहेत, अशी विखारी टीका काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी केली. त्यामुळे ऑपरेशन सिंदूरनंतर काँग्रेसमध्ये फूट पडली आहे का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.