Pahalgam attack पहलगाम या ठिकाणी २२ एप्रिलला दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ पर्यटक मारले गेले. या हल्ल्याचा जगभरातून निषेध नोंदवण्यात आला. दरम्यान यानंतर जम्मू काश्मीरच्या विधानसभेत जे विशेष अधिवेशन झालं त्यात मुखमयंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केलेलं भाषण हे चर्चेत आलं आहे.
काय म्हणाले होते ओमर अब्दुल्ला?
मुख्यमंत्री आणि पर्यटन मंत्री म्हणून मी काश्मीरमध्ये सगळ्याच पर्यटकांना निमंत्रित केलं. यजमान या नात्याने पर्यटक त्यांच्या घरी सुखरुप गेले पाहिजेत ही जबाबदारीही माझी होती. मात्र तसं घडलं नाही. आता माफी मागण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. असं म्हणत जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी २८ एप्रिल रोजी विधानसभेत खेद व्यक्त केला.
काश्मीरच्या राजकारणावर परिणाम
ओमर अब्दुल्लांनी जम्मू काश्मीरच्या विधानसभेत केलेलं भाषण हे काश्मीरच्या मुख्य प्रवाहातील राजकारणावर कसा परिणाम झाला आहे हे दाखवतं आहे. जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा परत मिळावा अशी मागणी करणाऱ्या सरकारला आता काही काळ थांबावं लागणार आहे. काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीला सहा महिने उलटले आहेत. मागील महिन्यात जेव्हा अमित शाह यांनी काश्मीरचा दौरा केला होता. त्यावेळी लवकरच राज्याचा दर्जा आम्हाला मिळेल असं मला वाटतंय अशी अपेक्षा ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केली होती. पण २२ एप्रिलला जो हल्ला झाला आणि त्यानंतर जे भाषण ओमर अब्दुल्लांनी केलं त्यानंतर आता काही कालावधीसाठी तरी राज्याचा दर्जा मिळण्यासाठी जम्मू काश्मीरला वाट बघावी लागणार आहे.
बैसरनमध्ये २१ वर्षांनंतर इतका मोठा हल्ला
विधानसभेच्या विशेष अधिवेशनात बोलताना मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले होते, “या घटनेचा संपूर्ण देशावर परिणाम झाला आहे. आपण असे अनेक हल्ले यापूर्वी पाहिले आहेत. पहलगामच्या बैसरनमध्ये २१ वर्षांनंतर इतका मोठा हल्ला झाला आहे. मृतांच्या कुटुंबियांची माफी कशी मागावी हे मला समजत नाही. यजमान असल्याने, पर्यटकांना सुरक्षित परत पाठवणे हे माझे कर्तव्य होते. मी ते मी पार पाडू शकलो नाही. माझ्याकडे माफी मागण्यासाठी शब्द नाहीत.” असं अब्दुल्ला म्हणाले होते. पुढे ते म्हणाले, “काश्मीरच्या मशिदींमध्येही दहशतवादाविरुद्ध निषेध व्यक्त करण्यात आला आहे. ही काश्मीरमधील दहशतवादाच्या अंताची सुरुवात आहे. लोक जेव्हा आपल्याला पाठिंबा देतील तेव्हाच दहशतवाद संपेल. ही त्याची सुरुवात आहे. आपण असे काहीही बोलू नये किंवा दाखवू नये ज्यामुळे या चळवळीला हानी पोहोचेल. जेव्हा लोक आपल्याला पाठिंबा देतील तेव्हाच दहशतवाद संपेल. आणि आता असे दिसते की लोक त्या टप्प्यावर पोहोचत आहेत.” असं ओमर अब्दुल्ला यांनी म्हटलं होतं.
ओमर अब्दुल्लांना नको आहे संघर्ष
ओमर अब्दुल्ला यांना सध्या केंद्र सरकारशी संघर्ष वगैरे नको आहे. यांना केंद्राशी संघर्ष नको आहे आणि ते योग्य आवाज उठवत आहेत, विशेषत: कारण त्यांना परिस्थितीचे गांभीर्य माहित आहे आणि त्यांना माहित आहे की पहलगामवरून केंद्र सरकारला घेरल्यास ते त्यांच्याविरोधात उभे राहतील. जम्मू-काश्मीरचा राज्याचा दर्जा परत मिळावा ओमर अब्दुल्ला आग्रही असले तरीही सत्तेवर आल्यापासून त्यांनी या मुद्द्यावरुन केंद्राशी संघर्ष टाळला आहे. तसंच हा मुद्दा पुढे करुन केंद्रावर टीका करणंही टाळलं आहे.
पहलगामचा मुद्दा संपूर्ण देशासाठी भावनेचा मुद्दा
पहलगामचा मुद्दा हा फक्त काश्मीरसाठीच नाही तर केंद्र सरकारसह संपूर्ण भारतासाठी भावनिक मुद्दा आहे. त्यावर राजकारण करणं योग्य नाही. निवडून आलेल्या सरकारकडे कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी नसल्याने हा हल्ला घडला असं म्हणणं मूर्खपणाचं ठरेल. केंद्र सरकारला काय भारतातल्या एकाही माणसाला हे पटणार नाही. केंद्राशी आम्हाला संघर्ष नको आहे तर जे करायचं असेल ते एकत्र काम करुन करू असं नॅशनल कॉन्फरन्सच्या एका नेत्याने सांगितलं. पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरचं राजकारण वेगळ्या दिशेने जातं आहे असंच यावरुन दिसतं आहे.